Next
सिद्धांत बांठिया : नवा टेनिस स्टार
BOI
Friday, January 05 | 06:45 AM
15 0 0
Share this story

सिद्धांत बांठिया

भारतात एके काळी टेनिस या क्रीडा प्रकारात फार कमी नावं होती. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही पातळ्यांवर टेनिस खेळणाऱ्यांची संख्या हळूहळू वाढत गेली. अनेक नवीन खेळाडू ज्युनिअर आणि सीनिअर गटांमध्ये दाखल झाले. सध्या भारताच्या ज्युनिअर टेनिस क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असणारा पुण्याचा सिद्धांत बांठिया हा त्यापैकीच एक. ‘क्रीडारत्ने’ या साप्ताहिक सदरात आजचा लेख टेनिसपटू सिद्धांतबद्दलचा...
..............................................

सिद्धांत बांठियाभारताच्या टेनिस क्षेत्रात एकेकाळी लिएंडर पेस, महेश भुपती, रोहन बोपन्ना, महिलांमध्ये सानिया मिर्झा या नावांच्या पुढे आपली गाडी जातच नव्हती. काळ बदलला आणि याच खेळाडूंकडून प्रेरणा घेत नवनवीन खेळाडू ज्युनिअर गटापासून मोठ्या गटापर्यंत दाखल झाले. अशाच खेळाडूंमध्ये पुण्याच्या टेनिस क्षेत्रात एक नाव सध्या धुमाकुळ घालत आहे. तो खेळाडू म्हणजे सिद्धांत बांठिया. भारताच्या ज्युनिअर टेनिस क्रमवारीत सध्या पहिल्या क्रमांकावर असणारा सिद्धांत लवकरच मोठ्या गटात (पुरूष) भारताचे प्रतिनिधित्व करेल असा विश्वास वाटतो, तोदेखील त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे.

सिद्धांत त्याच्या आईसोबतघरातील कोणीही क्रीडाक्षेत्राशी संबंधित नसताना, सिद्धांतने इथवर मारलेली मजल निश्चितच कौतुकास्पद आहे. आज तो केवळ सतरा वर्षांचा आहे. समोर खूप मोठी कारकीर्द आहे आणि टेनिसमध्ये करिअर हेच त्याचे ध्येय असल्याने येत्या काळात पेस आणि भुपतीसारखाच सिद्धांतही भारताकडून खेळून आंतरराष्ट्रीय टेनिस क्षेत्र गाजवण्यासाठी तयारी करत आहे. दहावीच्या परीक्षेत ८४ टक्के गुण मिळवून विज्ञान शाखा निवडणारा सिद्धांत अकरावीनंतर याच शाखेला कंटाळला आणि त्याने शाखा बदलून वाणिज्य शाखेला प्रवेश घेतला. केवळ टेनिसवर लक्ष केंद्रित करता यावे यासाठी हे होते.

वयाच्या आठव्या वर्षी सिद्धांतने पुण्याची टेनिसस्टार राधिका तुळपुळे हिच्याकडे टेनिसचे प्राथमिक धडे गिरवण्यास सुरुवात केली. त्यानंतर राष्ट्रीय विजेता संदीप किर्तने, केदार शहा यांचेही त्याने काही काळ मार्गदर्शन घेतले. सध्या तो सोलारीस क्लबमध्ये आदित्य मडकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. ही युती चांगलीच फलदायी ठरली. मडकेकर यांच्या मौलिक मार्गदर्शनामुळे व अत्यंत सातत्यपूर्ण खेळाच्या जोरावर आज सिद्धांत भारताच्या ज्युनिअर क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे.  सलग ८४ सामने जिंकल्यानंतर तो जेव्हा मोठ्या गटात पराभूत झाला, तेव्हा मात्र त्याचा तणाव वाढला होता. परंतु त्याने हार मानली नाही. जोमाने पुन्हा तयारी केली. चुका सुधारल्या आणि विम्बल्डन ज्युनिअर स्पर्धेत बाजी मारत गमावलेला आत्मविश्वास परत मिळवला. या स्पर्धेनंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. तेव्हापासून त्याच्या यशाचा आलेख आजपर्यंत उंचावलेलाच राहिला आहे. हेच सातत्य सामान्य खेळाडूला महान बनवत असते.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव महत्त्वाचा असतो आणि म्हणूनच सिद्धांत दरवर्षी किमान दहा ते बारा स्पर्धा भारताबाहेर खेळतो. आजवरची त्याची भारताबाहेरची कामगिरीही चक्रावून टाकणारी आहे. कॅनडात एक, थायलंडमध्ये दोन आणि मोरोक्कोत दोन स्पर्धा जिंकत टेनिस समीक्षकांच्या प्रशंसेसही तो पात्र ठरला आहे. विम्बल्डन राष्ट्रीय ज्युनिअर २०१४ची स्पर्धा व त्यातील विजेतेपद हे त्याच्या आजवरच्या कारकीर्दीतील मैलाचा दगड ठरले आहे. ज्युनिअर डेव्हीस करंडक स्पर्धेतही त्याने बाजी मारताना देशाच्या मोठ्या गटात प्रतिनिधित्व करण्याचे आपले लक्ष्य आहे, हेच दाखवून दिले आहे.

परिपूर्ण व्यावसायिक टेनिसपटू होण्याची त्याची इच्छा असून ‘लक्ष्य’ फाऊंडेशनचे त्याला सातत्याने सहकार्य लाभत आहे. परंतु हे इतकेच पुरसे नाही, कारण हा खेळ सराव, रॅकेटस्, परदेशातील सामन्यांत सहभाग घेणे हे सगळे प्रचंड खर्चिक आहे. त्यामुळे आणखी काही प्रायोजकांनी पुढे येत मदतीचा हात द्यावा तरच हा खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा लौकिक वाढवेल. हरयाणा, कर्नाटक या राज्यांप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही अशा खेळाडूंसाठी सढळ हस्ते मदत करावी म्हणजे सिद्धांतलाच नव्हे, तर सर्वच उदयोन्मुख खेळाडूंना लोकाश्रयाबरोबरच राजाश्रयही मिळेल.

महाराष्ट्र लॉन टेनिस संघटना, तेथील सचिव सुंदर अय्यर यांच्यापासून सर्व पदाधिकाऱ्यांचे सिद्धांतला सातत्याने सहकार्य लाभत आहे, पण खासगी प्रायोजक पुढे आले तर दुधात साखर पडल्यासारखे होईल. २०१६ मध्ये त्याने पाच स्पर्धा जिंकल्या. केवळ भारतातच नव्हे तर देशाबाहेरही त्याने आपल्या खेळाचा ठसा उमटविला. बारा आणि अठरा वर्षाखालील गटात दुहेरीचे विजेतेपद, तर चौदा आणि सोळा वर्षाखालील गटात एकेरीचे विजेतेपद मिळवत त्याने आपली गुणवत्ता आणि दर्जा दोन्ही सिध्द केले आहे. त्याने या मोसमात ज्युनिअर गटात एकेरीची २१ तर दुहेरीची २४ विजेतेपदं मिळवली आहेत.  आजवरच्या कारकीर्दीत सत्तर एकेरीची तर त्रेपन्न दुहेरीची विजेतेपदं मिळवली आहेत. टेनिस कोर्टमधील ‘हार्ड कोर्ट’ हे त्याचे आवडते कोर्ट आहे आणि इथेच राज्य करण्यासाठी तो सराव करत आहे. राष्ट्रकुल ज्युनिअर स्पर्धेचे विजेतेपद हे त्याच्या कारकीर्दीचा कलासाध्य ठरले.

महाराष्ट्र लॉन टेनिस संघटनेने अत्यंत सुंदर रितीने डेव्हिस करंडक स्पर्धेचे पुण्यात आयोजन केले होते. या स्पर्धेत भारताचे नामांकित खेळाडू सहभागी झाले होते. याच खेळाडूंचा खेळ जवळून व बारकाईने पाहण्याची संधी सिद्धांतला मिळाली. मोठ्या स्पर्धेत, मोठे दडपण कसे हाताळायचे, प्रतिस्पर्धी खेळाडूंचे कमकुवत दुवे कसे शोधायचे व त्यावर आपला खेळ कसा आखायचा, त्यानुरूप आपला खेळ कसा उंचवायचा. हे सगळं सिद्धांतला अनुभवायला व सरावादरम्यान शिकायला मिळालं.

लहान असताना सिद्धांत ज्या सोसायटीत राहत होता, तिथे क्रिकेट खेळायचा पण वारंवार कोणीतरी सोसायटीत खेळू नका म्हणून ओरडायचे म्हणून त्याने क्रिकेटला रामराम केला. क्रिकेट व्यतिरिक्त बॅडमिंटनमध्येही त्याने हातपाय मारायला सुरूवात केली खरी पण त्याची खरी आवड टेनिस होती आणि आज त्याची कामगिरी पाहता टेनिसमध्येच कारकीर्द घडली याची साक्ष मिळते. आता तो बारावीची परीक्षा द्यायला सज्ज झाला आहे.  तो सेंट विन्सेंट महाविद्यालयात शिकत आहे. शैक्षणिक कर्तबगारीबरोबरच किंबहुना टेनिसमधील कर्तबगारी याला त्याच्या दृष्टीने जास्त महत्त्व आहे. आता त्याला खरी गरज आहे ती प्रायोजकांची. अद्ययावत सोई-सुविधांची आणि सर्वच स्तरांवरून मिळणाऱ्या सहकार्याची. हे सगळे योग जुळून आले, तर हा वरवर सामान्य वाटणारा खेळाडू बघता बघता महान खेळाडू बनण्याच्या वाटेवर चालायला लागलेला दिसेल.

- अमित डोंगरे
ई-मेल : amitdongre10@gmail.com

(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. ‘क्रीडारत्ने’ या लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)

(सिद्धांत बांठियाच्या आजवरच्या खेळावर प्रकाश टाकणारा एक व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link