Next
‘नृत्य आपल्या जीवनात परिवर्तन घडवते’
प्रेस रिलीज
Wednesday, January 30, 2019 | 03:04 PM
15 0 0
Share this storyपुणे : ‘नृत्य आपल्या जीवनात परिवर्तन घडवते. त्यासाठी मेहनत, साधना खूप असली, तरी आवड असल्याने आपण मेहनत करतो आणि व्यक्तिमत्व बदलून जाते,’ असा सूर आंतरराष्ट्रीय भारतीय नृत्य महोत्सवातील परिसंवादात उमटला.

‘नृत्य क्षेत्रातील कारकिर्दीच्या संधी आणि आव्हाने’ या विषयावरील परिसंवादाचे २७ जानेवारी २०१९ रोजी आयोजन करण्यात आले होते. यात ज्येष्ठ नृत्यगुरू रोशन दात्ये, स्वाती दातार, प्राजक्ता राज या सहभागी झाल्या होत्या. नेहा मुथियान यांनी या सर्वांशी संवाद साधला. हा कार्यक्रम सेनापती बापट रस्त्यावरील भारतीय विद्या भवन येथे झाला.

या वेळी बोलताना ज्येष्ठ नृत्यगुरू रोशन दात्ये म्हणाल्या, ‘जुनी पिढी समर्पित भावनेने काम करीत आली. नृत्य कार्यक्रमाच्या मानधनाबाबत जुनी पिढी आग्रही नव्हती; मात्र मानधनाबाबत आपण अपेक्षा किमान बोलून दाखवली पाहिजे.’

स्वाती दातार म्हणाल्या, ‘खूप लहान वयात नृत्याची आवड पालकांनी मुलांवर लादू नये. चिमुकल्या वयात नृत्याचा विक्रम वगैरे कल्पना घेऊन पालक येतात, तेव्हा समजावून सांगणे अवघड होते. कारकिर्दीच्या अनेक संधी नृत्य क्षेत्रात उपलब्ध होत आहेत. त्यात मेहनत आणि साधना अधिक आहे. त्या तुलनेत पैसे मिळतीलच असे नाही.’

‘नृत्य शिक्षणात आपल्या लय, ताल, सूर, मेहनत, समय व्यवस्थापनासह अनेक गोष्टी शिकतो. यापलीकडे व्यक्तिमत्व विकसन या पातळीवर बरेच परिवर्तन घडत असते. नृत्याबरोबर आपण भोवतालच्या अनेक गोष्टी शिकत जातो,’ असे प्राजक्ता राज यांनी सांगितले.

नृत्यप्रशिक्षणाला सुरवात केली की लगेच परीक्षा, स्टेज शो व्हाव्यात अशी अपेक्षा असते, त्याबाबत पालकांचेच समुपदेशन करावे लागते, असा अनुभवही मान्यवरांनी या परिसंवादात सांगितला.

दरम्यान, रविवारी सकाळच्या सत्रात मयुरी हरिदास (पुणे) यांचे कथ्थक, अक्षय श्रीनिवासन (मुंबई), अबोली धायरकर (पुणे) यांचे कथ्थक, उन्नती अजमेरा (मुंबई) यांचे मोहिनी अट्टम, पूजा काळे यांचे ओडिसी, मिनाझ खान यांचे कथ्थक, सुष्मिता बिस्वाई (भुवनेश्वर) यांचे ओडिसी नृत्य अशा नृत्यातील विविध प्रकारांचे सादरीकरण करण्यात आले. या सर्व सादरीकरणांना चांगला प्रतिसाद मिळाला.

परिसंवादातील मान्यवरांचा सत्कार भारतीय विद्या भवनचे मानद संचालक प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी केला. या वेळी नृत्य क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, विद्यार्थिनी या वेळी उपस्थित होते. संयोजक रसिका गुमास्ते यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link