Next
श्री लक्ष्मीनारायण मंदिरात कल्याणोत्सव साजरा
देवाच्या विवाहसोहळ्यात रंगले भक्तजन
BOI
Monday, February 25, 2019 | 03:54 PM
15 0 0
Share this story


पुणे :  ‘श्री लक्ष्मीनारायण भगवान की जय’, ‘राधे राधे बोलो राधे राधे’, ‘विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठल’चा जयघोष, वाद्यांचा गजर, पारंपरिक पोशाखात सजलेले भाविक, फुलांनी सजलेले मंदिर, लग्नमंडप, हे दृश्य होते रविवार पेठेतील कापडगंज भागात असलेल्या श्री लक्ष्मीनारायण मंदिरातील. रविवारी येथे रंगला होता श्री लक्ष्मी आणि श्री नारायणाचा  विवाहसोहळा म्हणजेच कल्याणोत्सव. मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने हा विवाहसोहळा साजरा करण्यात आला. 


हे मंदिर स्थापन झाल्यापासून दर वर्षी ‘ब्रह्मोत्सव’ साजरा केला जातो. यात महत्त्वाचा सोहळा असतो तो कल्याणोत्सव. यंदा या उत्सवाचे ९०वे वर्ष होते. १९ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी दरम्यान ‘ब्रह्मोत्सव’ सोहळा झाला. रविवारी, २४ फेब्रुवारी रोजी श्री लक्ष्मी आणि श्री नारायणाचा  विवाहसोहळा म्हणजेच कल्याणोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. 


पारंपरिक राजस्थानी पोशाख केलेल्या महिला, पुरुष, मार्गदर्शकाच्या भूमिकेतील आजी-आजोबा, धार्मिक विधी कुतूहलाने पाहणारी तरुणाई आणि लहान मुले यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा रंगला. या दिवशी संध्याकाळी पाच वाजता मुख्य मंदिरातून श्री नारायणाची पालखी खांद्यावर घेऊन तरुण मंडळींनी लग्न मंडपाकडे प्रस्थान ठेवले. भजनाच्या तालावर पालखीसमोर महिला, ज्येष्ठांसह सर्वांनीच फेर धरले, फुगड्या घातल्या. त्यानंतर या सोहळ्यासाठी खास चेन्नईहून आलेले पुजारी वीर राघवन आणि पुजारी श्रीधराचारी यांनी ‘माला परिवर्तन’ हा पारंपरिक विधी केला. या वेळी ‘के अँड क्यू’ परिवारातील ३१ विवाहित जोडप्यांनी सांकेतिक विवाह केला. ‘के लक्ष्मी परिणिजे’, ‘झुक जाओ राजकुमार झुकनो पडसीजी’ या पारंपरिक भजनांच्या तालावर यजमान जोडप्यांनीही ‘माला परिवर्तन’ केले. 


या बाबत अधिक माहिती देताना आयोजक घनश्याम लढ्ढा आणि ‘के अँड क्यू’ चे सत्येंद्र राठी म्हणाले, ‘विवाहित जोडप्यांना देवासमोर लग्न करण्याचा आनंद मिळवा म्हणून पुण्यातल्या ब्रह्मोत्सवात ही परंपरा आम्ही पाळतो. विविध वयांची विवाहित यजमान जोडपी ‘माला परिवर्तन’ विधीनंतर परस्परांना हार घालतात. हे त्यांचे सांकेतिक लग्न होते. त्यानंतर लग्नातील सर्व विधी प्रातिनिधिक स्वरूपात केले जातात.’


ब्रह्मोत्सवाबद्दल पुजारी वीर राघवन म्हणाले, ‘ब्रह्मदेवाने भूलोकात हवन केले. त्यामुळे श्री नारायण प्रकट झाले. देवाच्या प्रकट होण्याचा आनंदोत्सव साजरा करणे म्हणजेच ब्रह्मोत्सव.  दक्षिण भारतात वर्षाला १२ म्हणजे दर महिन्यातील नक्षत्रानुसार हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवात १२ दिवस वेगवेगळ्या वाहनांवर आरूढ झालेल्या विष्णू भगवानांची पालखी काढली जाते. या वेळी सर्व देवांना आवाहन केले जाते.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link