Next
क्रॉसकंट्रीची नवी स्टार : संजीवनी
BOI
Friday, April 20, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

संजीवनी जाधव

२०१३मध्ये मलेशिया येथे झालेल्या आशियाई शालेय स्पर्धेत संजीवनीने पंधराशे आणि तीन हजार मीटर स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते. हीच घटना तिच्या कारकीर्दीला कलाटणी देणारी ठरली होती. त्याच वर्षी ब्राझीलमध्ये झालेल्या ‘जागतिक शालेय स्पर्धे’तही तिने रौप्यपदक पटकावत जाणकारांना आश्चर्याचा धक्का दिला होता... ‘क्रीडारत्ने’ या साप्ताहिक सदरात आजचा लेख आंतरराष्ट्रीय क्रॉसकंट्री खेळाडू संजीवनी जाधवबद्दल...
.......................................
संजीवनी जाधवचीनमध्ये नुकत्याच झालेल्या ‘आशियाई क्रॉसकंट्री स्पर्धे’त नाशिकच्या वीस वर्षीय संजीवनी जाधवने इतिहास घडवला.  महिलांच्या आठ किलोमीटर अंतराच्या शर्यतीत कांस्य पदक जिंकणारी संजीवनी पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरली.  याच स्पर्धेत भारताने सांघिक गटातही कांस्य पदक मिळवत आणखी एक योग जुळवून आणला.

संजीवनी ही नाशिकच्या ‘भोसला मिलीटरी स्कुल’ची विद्यार्थीनी आहे. सध्या ती विजेंदरसिंग यांच्याकडे सराव करते. २०१३मध्ये मलेशिया येथे झालेल्या आशियाई शालेय स्पर्धेत संजीवनीने पंधराशे आणि तीन हजार मीटर स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते. हीच घटना तिच्या कारकीर्दीला कलाटणी देणारी ठरली होती. त्याच वर्षी ब्राझीलमध्ये झालेल्या ‘जागतिक शालेय स्पर्धे’तही तिने रौप्यपदक पटकावत जाणकारांना आश्चर्याचा धक्का दिला होता. चीनमध्ये नुकत्याच झालेल्या स्पर्धेत कांस्य पदक मिळवताना तिने २८ मिनीटे १९ सेकंद अशी वेळ दिली. केवळ काही सेकंदांनी तिचे रौप्यपदक हुकले.

२०१७ हे वर्ष संजीवनीसाठी स्वप्नवत ठरले आहे. दक्षिण कोरियात झालेल्या ‘जागतिक विद्यापीठ स्पर्धे’त तिने वीस वर्षांखालील गटात दहा हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रमाला गवसणी घातली. त्यानंतर भुवनेश्वर येथील स्पर्धेत पाच हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्य  पदकाची कमाई केली. त्यानंतर तैवानमधील स्पर्धेत रौप्यपदक मिळवले. ही स्पर्धा जागतिक स्पर्धा होती, म्हणूनच तिच्या पदकाचे महत्त्व जास्त ठरले. या स्पर्धेत तिने स्वतःची सर्वोत्तम वेळ ३३ मिनीटे २२ सेकंद अशी नोंदवली होती. आंतरविद्यापीठ स्तरांवर ज्या स्पर्धा होतात, त्यात संजीवनी आता पुण्याचे प्रतिनिधित्व करते. यात तिने सलग तीन वर्षे पाच आणि दहा हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले आहे.  

या वर्षी गंटूर येथे झालेल्या ‘५७व्या राष्ट्रीय आंतरराज्य स्पर्धे’तही तिने दहा हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावले आहे. एकूण काय तर ललिता बाबरप्रमाणे संजीवनीच्या रूपाने महाराष्ट्राला आणखी एक ‘लाँग डिस्टन्स रनर’ गवसली आहे.  चीनमधील ‘एशियन क्रॉसकंट्री स्पर्धे’तील कांस्य पदकाने आज संजीवनी खऱ्या अर्थाने स्टार बनली आहे. या स्पर्धेत चीनच्या ली डॅनने सुवर्णपदक तर जपानच्या अॅबे युकारीने रौप्यपदक पटाकावले. या आठ किलोमीटर अंतराच्या शर्यतीत एकूण पंधरा स्पर्धक सहभागी झाल्या होत्या. क्रॉसकंट्री स्पर्धेसाठीचा रस्ता यंदा वेगळाच होता. टेकडया, सपाट रस्ता पुन्हा टेकडी अशा रस्त्यांवरून ही स्पर्धा झाली. त्यात अखेरच्या क्षणी संजीवनी मागे राहिली आणि तिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.

या स्पर्धेच्या सांघिक गटातही भारताने कांस्य पदक पटकावले. त्यातही संजीवनीचा मोठा वाटा आहे. वैयक्तिक शर्यतीतील एकाच देशाच्या सर्वोत्तम तीन खेळाडूंच्या कामगिरीवरून सांघिक पदक ठरले. भारतीय संघात संजीवनीसह ललिता बाबर, स्वाती गाढवे आणि झुम्मा खातून या नामांकित खेळाडूदेखील होत्या. ललिताने ३२ मिनीटे ५३ सेकंद, झुम्माने ३२ मिनीटे १४ सेकंद, स्वातीने ३० मिनीटे १८ सेकंद अशी वेळ दिली.  

संजीवनीने जी वेळ दिली त्याच्या जवळपास जरी या तिघींनी वेळ नोंदवली असती, तरी भारताला सांघिक गटातही सुवर्ण अथवा रौप्य पदक मिळवता आले असते. जपानने बारा गुणांसह सुवर्ण, चीनने १४ गुणांसह रौप्य तर भारताने २८ गुणांसह कांस्य पदक मिळवले. गुणांचा हाच फरक चांगली कामगिरी करूनही संजीवनीला निराश करणारा ठरला.

खरे तर या स्पर्धेत संजीवनीपेक्षा जास्त अपेक्षा ललिता बाबर आणि स्वाती गाढवे यांच्याकडून होत्या. रिओ ऑलिंपिक स्पर्धेत ललिता ‘स्टीपलचेस’ प्रकारात अंतिम फेरीत पोहोचली होती, त्यामुळे तीच चमत्कार घडवेल, असे वाटले होते. खूप काळानंतर स्वाती आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळत होती, त्यामुळे तिच्यावर साहजिकच दडपण होते. मात्र हेच दडपण असताना अनपेक्षितपणे संजीवनी जाधवने जाणकारांना आश्चर्याचा धक्का देत वैयक्तिक कांस्य पदक पटाकवले. 

१९९१मध्ये वैयक्तिक गटात भारताला चार पदके मिळाली होती. त्यानंतर इतक्या वर्षांनी संजीवनीने देशाला पदक मिळवून दिले. कविता राऊतला जे प्रशिक्षण देतात तेच विजेंदरसिंग संजीवनीलादेखील प्रशिक्षण देतात. तिच्या आजवरच्या वाटचालीत ओरिसातील ‘आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धे’तील अपयश तिला सलत होते. त्याची भरपाई तिने आता चीनमध्ये केली. तिची आदर्श पी. टी. उषा असली, तरी शंभर मीटर शर्यतीपेक्षा लाँग डिस्टन्स शर्यतीत कारकीर्द करण्याचे तिचे ध्येय आहे. दिल्ली मॅरेथॉनमध्ये जेव्हा ती दुसरी आली, तेव्हाच तिने आपली सहकारी पुनम राऊत आणि ललिता बाबर यांना आव्हान दिले होते.

सध्या ती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षण घेत असून विद्यापीठ स्तरावर ती पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करते. केवळ पाच फूट उंची असलेली ही खेळाडू ‘मुर्ती लहान पण किर्ती महान’ अशा ट्रॅकवर आहे.

- अमित डोंगरे
ई-मेल : amitdongre10@gmail.com

(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. ‘क्रीडारत्ने’ या लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search