Next
अण्णा भाऊ साठेंचे टपाल तिकीट एक ऑगस्टला प्रकाशित होणार
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
BOI
Wednesday, July 17, 2019 | 11:24 AM
15 0 0
Share this article:

मुंबई : आपल्या साहित्यातून सामान्य माणसांच्या दु:खाला वाचा फोडणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जन्मशताब्दी शासन साजरी करत आहे. या निमित्ताने एक ऑगस्ट २०१९ रोजी त्यांचे टपाल तिकीट प्रकाशित करणार असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

१६ जुलैला मुनगंटीवार यांनी विशेष साह्य योजनांचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाप्रित्यर्थ राज्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अर्थसंकल्पात १०० कोटी रुपयांचा निधी राखून ठेवला असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. विशेष साह्य अंतर्गत येणाऱ्या केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांमधील लाभार्थींना दर दोन महिन्यांनी नियमित अनुदान मिळेल अशी व्यवस्था विभागाने तात्काळ करावी, अनुदानापासून गरीब जनतेस, निराधार जनतेला वंचित न ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

‘विशेष साह्य योजनांचे लाभार्थी, त्यांची नावे आणि याद्या या सगळ्या बाबी संगणकीकृत कराव्यात. लाभार्थींचे बँक खाते आधारलिंक केल्यास डुप्लिकेशन टाळता येईल, त्यामुळे सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष साह्य योजनेतील लाभार्थींची खाती आधारलिंक करण्यास गती द्यावी. विशेष साह्य योजनांच्या काही लाभार्थींचे खाते हे इंडियन पोस्टल पेमेंट बँकेत आहे. त्यांचीही एकदा बैठक आयोजित करावी,’ अशा सूचनाही मुनगंटीवार यांनी दिल्या.

विशेष साह्य योजनांच्या आढावा बैठकीत बोलताना सुधीर मुनगंटीवारयोजनांचे लाभ देताना जिल्हाधिकारी आणि मंत्रालय यामधली यंत्रणा म्हणून प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट निर्माण केल्यास विशेष साह्य योजनांचे लाभ लाभार्थींना सुरळितपणे देणे शक्य होईल. यासंबंधीचा प्रस्ताव लवकरच राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर करणार असल्याचे श्री. वाघमारे यांनी यावेळी सांगितले. महाडीबीटी पोर्टलवरून विशेष साह्य योजनांच्या लाभार्थींना अनुदान वितरित करण्याबाबत विभाग काम करत असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले.

विभागाच्या वतीने मुनगंटीवार यांच्यासमोर संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना या योजनांचे सादरीकरण करण्यात आले. योजनांची माहिती, लाभार्थींची संख्या आणि अनुदानाचे स्वरूप यावर त्यात माहिती होती.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search