Next
अॅटलांटाची मराठी शाळा...
BOI
Thursday, March 01 | 12:30 PM
15 0 0
Share this story

अॅटलांटा मराठी शाळा De Sana Middle School येथे भरते.

महाराष्ट्रातील मराठी शाळा बंद होत असल्याचे दुर्दैवी वास्तव आपण सध्या अनुभवतो आहोत. या पार्श्वभूमीवर, परदेशात राहणारी मराठी मंडळी आपल्या पुढच्या पिढीला मराठी अवगत होण्यासाठी तिकडे अत्यंत चांगल्या प्रकारे मराठी शाळा चालवत आहेत. अॅटलांटा मराठी शाळा हे त्याचेच एक उदाहरण. गेली अनेक वर्षे सुरू असलेल्या या शाळेबद्दल शाळेतील शिक्षिका रीना चव्हाण यांनी लिहिलेला हा लेख, नुकत्याच होऊन गेलेल्या मराठी राजभाषा दिनानिमित्ताने प्रसिद्ध करत आहोत. 
...........
प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ या म्हणीचा अर्थ खरा करून दाखवणाऱ्या आणि सामूहिक प्रयत्नांना आलेल्या यशाचे एक उत्तम उदाहरण म्हणजे आमची अॅटलांटा मराठी शाळा. आज नॉर्थ अमेरिकेतील मराठी शाळांपैकी सर्वांत मोठी मराठी शाळा म्हणून आमची शाळा नावाजली गेली आहे. साता समुद्रापार वसलेल्या नव्या पिढीला आपली मातृभाषा लिहिता व वाचता यावी हे ध्येय, त्यासाठीची दूरदृष्टी आणि नऊ-दहा वर्षांच्या परिश्रमांचे फळ म्हणजे, जॉर्जिया राज्याचे प्रमाणन (Accreditation) मिळालेली आमची मराठी शाळा.  

या मराठी शाळेची कल्पना वृंदा पित्रे आणि शैलेंद्र पित्रे यांची. अमेरिकेत राहणाऱ्या मुलांना आपल्यासारखे मराठी बोलता, किंबहुना थोड्या प्रमाणात लिहिता आणि वाचता आले तर किती बरे होईल; अगदी आपल्यासारखे नाही, तरी आपली ५० टक्के बोलीभाषा जरी यांना कळली तरी बरे होईल असे त्यांना वाटू लागले आणि त्यांनी आपली ही कल्पना चिन्मय मिशनच्या कमिटीवर काम करणारे शेखर कानिटकर यांच्यासमोर मांडली. त्यांनी सहमती दिल्यावर शिक्षकांची शोधाशोध सुरू झाली. अंजली देशपांडे यांनी शिकविण्याची तयारी दर्शविली. अशा प्रकारे ऑगस्ट २००९मध्ये अॅटलांटात २६ मुले, एक वर्ग आणि एकमेव शिक्षिका अंजली यांच्यासमवेत मराठी शाळा सुरू झाली. मदतीसाठी वृंदा, शैलेंद्र आणि विजय देशपांडे हे बरोबरीला होतेच. अभ्यासक्रमसुद्धा त्यांनीच स्वतः आखला. सुरुवातीला फक्त एकच वर्ग असल्याने लहान मुले आणि मोठी मुले एकत्र असत.

लहानं मुलांना शिकविताना त्यांच्या कलाने घेणे हे फार महत्त्वाचे होते. त्यासाठी त्यांना एक चित्र दाखून त्यावरून त्यांना बोलते कसे करता येईल, याकडे लक्ष दिले जात असे. हेच चित्र मोठ्या मुलांना दाखवून त्यांना त्यावरून मराठी भाषेबद्दल शिकविले जात असे. मराठी शाळेचे मुख्य उद्दिष्ट होते आणि अजूनही आहे ते म्हणजे मुलांनी मराठीत बोलणे. लिखाणावर भर तसा कमीच. 

याचदरम्यान म्हणजेच (२००९-२०१०) असे लक्षात आले, की अॅटलांटा मराठी शाळेसारख्या अजून अनेक शाळा अमेरिकेतील बऱ्याच शहरात आहेत. संपूर्ण अमेरिकेतील मराठी शिकणाऱ्या मुलांना एकच अभ्यासक्रम असावा, असा प्रयत्न सुनंदाताई टुमणे करतात. सुनंदाताईंनी हा अभ्यासक्रम भारती विद्यापीठाच्या सहयोगाने आणि सहमतीने तयार केला होता. अभ्यासक्रम प्रमाणित असावा, परीक्षा घेतल्या जाव्यात अशी पालकांचीही मागणी होतीच. त्यानुसार सुनंदाताईंशी संपर्क साधून आणि वैभव साठे यांच्या मदतीने बृहन्महाराष्ट्र मंडळ (बीएमएम) आणि भारती विद्यापीठ यांच्या वतीने तयार केलेला अभ्यासक्रम शाळेला मिळाला. सुनंदाताईंनी ‘बीएमएम’ परीक्षेसाठी अभ्यासक्रम पाठवला आणि मराठी शाळेत ‘बीएमएम’च्या परीक्षा घेणे अधिकृतपणे सुरू झाले. मराठी शाळेसाठी ही एक महत्त्वाची पायरी होती

मे २०११पर्यंत मराठी शाळा ‘चिन्मय मिशन’तर्फे भरविण्यात येत होती; पण ‘चिन्मय मिशन’च्या बदलत्या नियमानुसार फक्त मराठी भाषा शिकविण्यासाठी, सणवार साजरा करण्यासाठी चिन्मय मिशन उपलब्ध नव्हती. मराठी भाषा शिकण्यावर भर देण्यात यावा, असे बऱ्याच पालकांना वाटत होते. त्यासाठी शाळेच्या कार्यकर्त्यांनी शाळेसाठी दुसरी जागा शोधायला सुरुवात केली. शाळेतील मुले, शिक्षक आणि वर्ग वाढू लागले. शाळेच्या व्यवस्थापनात सुसूत्रता यावी म्हणून २०११मध्ये मराठी शाळेची समिती स्थापन केली गेली. या समितीमध्ये शैलेंद्र पित्रे, अंजली देशपांडे, वृंदा पित्रे, पल्लवी आमडेकर, विजय देशपांडे, सुखदा तपशाळकर, सुरेंद्र तपशाळकर आणि सुदर्शन देसाई असे सभासद होते. 

२०११-१२ या वर्षासाठी अॅटलांटाजवळच्या कमिंगमधील (Cumming) ‘पायने ग्रूव्ह मिडल स्कूल’मध्ये (Piney Grove Middle School) मराठी शाळेचे वर्ग भरू लागले. त्या शाळेच्या नियमानुसार लायबिलिटी इन्शुरन्स - विमा घेणे आवश्यक होते. अॅटलांटा महाराष्ट्र मंडळाच्या समितीने आणि विश्वस्तांनी यासाठी मदतीचा हात पुढे केला आणि मराठी शाळेसाठी विमा उपलब्ध करून दिला. शाळा अजूनही छोट्या प्रमाणात सुरू होती आणि शाळेनेच तयार केलेला अभ्यासक्रम शिकवला जात असे. 

मुलांची संख्या हळूहळू १००च्या वर जाऊ लागली. शिक्षक, स्वयंसेवक म्हणून त्यांचे नवीन विचार आणि कल्पना घेऊन पुढे येऊ लागले. ‘पायने ग्रूव्ह’मध्येच भरणाऱ्या तमिळ शाळेला तेव्हा जॉर्जिया राज्याचे प्रमाणन मिळाले होते. त्यापासून स्फूर्ती घेऊन वृंदा पित्रे आणि राज परांजपे यांनी खूप प्रयत्नांनी २०१६मध्ये अॅटलांटा मराठी शाळेला प्रमाणन मिळवून दिले. मराठी शाळेचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर हायस्कूलसाठी विद्यार्थी फॉरीन लँग्वेज चे क्रेडिट घेऊ शकतात. मराठी शाळेसाठी ही अजून एक जमेची बाजू होती. २०१६पासून मराठी शाळा ‘डी सना मिडल स्कूल’मध्ये (De Sana Middle School) दर रविवारी सकाळी १० ते दुपारी १२पर्यंत भरते. 

मुलांना आपली संस्कृती जपता यावी, त्यांना सणवार भारतीय पद्धतीने साजरे करता यावेत, यासाठी आपले सगळे सण (संक्रांत, गुढीपाडवा, गणपती, दसरा आणि दिवाळी) शाळेत साजरे केले जातात. या सणांचे महत्त्व, त्यामागील पौराणिक कथा, सामाजिक महत्त्व विद्यार्थ्यांना आवर्जून सांगितले जाते. कंदील, पणती, झेंडूची फुले, आपट्याची पाने, गणपतीची मूर्ती, मोदक आदी मुलांकडून हस्तकलेतून करून घेतले जाते.

आता आमची मराठी शाळा झपाट्याने मोठी होत आहे. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षामध्ये जवळपास १६० विद्यार्थी पटावर आहेत. ३० शिक्षक आणि आठ शिक्षक सहायक (Teaching Assistants) स्वयंसेवक म्हणून आपला वेळ देतात. जे विद्यार्थी शाळेचा अभ्यासक्रम पूर्ण करतात, ते पुढील वर्षी शिक्षक सहायक म्हणून काम करण्यासाठी शाळेत येतात. तसे काम करताना या माजी विद्यार्थ्यांनासुद्धा खूप मजा येते आणि त्यांचे काम बघून, पुढची पिढी मराठी भाषेच्या वृद्धीसाठी काम करताना पाहून एक समाधानही मिळते. वर्गातल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार किमान दोन शिक्षक आणि एक शिक्षक सहायक मिळून वर्गाचे काम पाहतात. 

शाळेचे स्वतःचे एक सुसज्ज ग्रंथालयदेखील आहे. मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून गोष्टीची, अथवा अभ्यासाची पुस्तके शाळेने उपलब्ध करून दिली आहेत. कविता कामत आणि मोनाली नायक या दोघी ग्रंथालयाचे काम पाहतात. आज आमच्या ग्रंथालयात जवळजवळ एक हजारपेक्षा जास्त पुस्तके उपलब्ध आहेत. फिरते ग्रंथालय वर्गा-वर्गातून फिरून मुलांना पुस्तके घेऊन जाण्यासाठी उद्युक्त करते.

‘मी शिकणार मराठी’ असा अॅटलांटा मराठी शाळेचा छान लोगो आहे. www.atlantamarathishala.org हे शाळेचे स्वतंत्र असे संकेतस्थळ आहे. शाळेच्या कामकाजाची माहिती, ऑनलाइन ट्यूशन फी पेमेंट्स, प्रत्येक वर्गाचे आठवड्याचे अहवाल, शाळेचे कॅलेंडर अशा अनेक सुविधा पालकांना आणि विद्यार्थ्यांना या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

२०१७-१८मध्ये शाळेच्या समितीमध्ये बदल करण्यात आले. वृंदा पित्रे, अंजली देशपांडे आणि विजय देशपांडे ही अनुभवी मंडळी आता शाळेचे विश्वस्त म्हणून काम पाहातात. रसिका जोशी या मुख्याध्यापिका आणि राज परांजपे हे व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. अश्विनी रेगे, कविता कामत, पल्लवी चव्हाण, मनीषा सबनीस, मेघनाद चित्रे आणि राहुल जोग हे समिती सभासद शाळेच्या कामात मदत करतात.

आज एक मराठी शाळेची शिक्षिका म्हणून हा लेख लिहिताना आणि मराठी शाळा कशी घडली हे तुम्हा सर्वांना सांगताना खूप अभिमान वाटतो. मी गेली सहा वर्षे अॅटलांटा मराठी शाळेत शिकवत आहे. माझा प्रवास किलबिल वर्गापासून ते ‘बीएमएम’पर्यंतचा. मुलांना शिकवताना मलासुद्धा खूप काही शिकायला मिळाले. या मुलांशी आणि या शाळेशी माझे ऋणानुबंध जुळले गेले. माझी लेखणी आणि माझा आत्मविश्वास मला पुन्हा मिळाला. अशा या मराठी शाळेचा आम्हा अॅटलांटावासीयांना खूप अभिमान आहे.

(मराठी राजभाषा दिनानिमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध झालेले सर्व लेख, कविता आणि व्हिडिओ https://goo.gl/qgDdWU या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध असतील.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Mrunal Gosavi About 263 Days ago
Very nice idea implemented congratulations.please contact me if I can anyways be a part of project living in India Pune
0
0
गोरखनाथ माने About 289 Days ago
खुपच छान! आपली मराठी भाषा तिथंही अभ्यासली जातेय. नियोजन करनारे आहेत त्याचं अभिनंदन.
2
0
संगिता गुर्जर About 290 Days ago
अभिमानास्पद उपक्रम. काळाची गरज. अभिनंदन!
2
0
Dr Sushama Shripad Wagh About 290 Days ago
मला खूप अभिमान वाटतो तुमच्या कार्याचा. साता समुद्रापलिकडे मराठी भाषेचा झेंडा फडकवल्या बद्दल विशेष कौतुक. शिक्षक, शिश्य आणि पालक यांच्या आपल्या मात्रुभाषे वरिल प्रेम पाहून धन्यता वाटली.
2
0
Shyam desai About 290 Days ago
Very good concept , proud of you guys
2
0
Shankar Ankush About 291 Days ago
फारच छान! इथं महाराष्ट्रात मराठी शाळांना मरताना पाहून तुम्ही परदेशात तीला जिवंत ठेवत आहात हे खरोखरच कौतुकास्पद आहे. सर्वांना शुभेच्छा!
2
0

Select Language
Share Link