Next
‘नाशवंत मालाच्या शाश्वत भावासाठी सर्वसमावेशक धोरण’
BOI
Monday, November 20 | 06:03 PM
15 0 0
Share this story

सोलापूर : ‘भाजीपाला, फळे, फुले यांच्या उत्पादनात महाराष्ट्र राज्य देशात अग्रेसर आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ व चांगला भाव मिळणे गरजचे आहे. नाशवंत मालाला शाश्वत भाव मिळावा यासाठी राज्य शासन सकारात्मक असून याबाबत लवकरच सर्वसमावेशक धोरण आखले जाईल,’ असे पणन, सहकार व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.

नाशवंत शेतमालाचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळण्याच्या दृष्टीने शासनास उपाययोजना सुचविण्यासाठी गठीत समितीची बैठक येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रात झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला पुणे येथील महाराष्ट्र राज्य कृषी मंडळाचे सरव्यवस्थापक डॉ. दीपक शिंदे, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. के. पाल, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक अविनाश महागावकर, समिती सदस्य अंकुश पडवळे, प्रभाकर चांदणे, विलास शिंदे, श्रीराम गाढवे, गोविंद हांडे, कृषी सहसंचालक श्री. जमदाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांच्यासह डाळिंब संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ आणि शेतकरी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या उत्पादित केलेल्या मालाचा योग्य मोबदला मिळून त्याच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी शासन नेहमीच सकारात्मक आहे. शेतकऱ्याने उत्पादित केलेल्या नाशवंत मालावर त्याच परिसरात प्रक्रिया उद्योग उभारण्याबाबत नजीकच्या काळात प्रयत्न केले जातील. याबाबतीत शेतकरी, शेतकरी गट पुढे आल्यास त्याला शासन स्तरावरुन आवश्यक ती सर्व मदत केली जाईल. प्रक्रिया उद्योग याबरोबरच निर्यात व्यवस्था महत्वाची असल्याने शासन पणन विभागामार्फत निर्यातीची साखळी निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे.’

‘संकटे आव्हान व संधी मानून याचा समर्थ मुकाबला शेतकऱ्यांनी करावा. आपल्या मालाचा दर्जा, गुणवत्तेची माहिती थेट ग्राहकापर्यंत पोचण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत. शासनाने सुरू केलेल्या आठवडा बाजारात थेट ग्राहक भेटतो या संधीचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. पणन विभागामार्फत शेतकऱ्यांना भाजीपाला काढणी तंत्रज्ञान, बियाण्यांची निवड, भाजीपाला तोडणी, साठवणूक, पॅकिंग, मालाची प्रतवारी याबाबत प्रशिक्षण देण्यात येईल. राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या फळ, भाजीपाला पिकास कोणत्या ठिकाणी जास्त मागणी आहे, याचा अभ्यास करण्यात येत आहे. देशातील अन्य राज्यात व परदेशात पणन विभागामार्फत यासाठी प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात येणार आहे,’ असेही देशमुख यांनी सांगितले.

समिती सदस्य चांदणे यांनी शेतकऱ्यांना फळ, भाजीपाला काढणी तंत्रज्ञान, बियाण्यांची निवड, भाजीपाला तोडणी, साठवणूक, पॅकिंग, मालाची प्रतवारी याबाबत प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याचे सांगितले. ‘राज्यात पिकानुसार धोरण असावे, मार्केटिंगसाठी व्यवस्था व्हावी, महाराष्ट्रातील फळांचे ब्रॅण्डिंग व्हावे यासाठी शासनाने प्रयत्न करावेत,’ असे विलास शिंदे यांनी सांगितले.

डॉ. शिंदे म्हणाले, ‘तंत्रज्ञान व सुविधा नसल्याने फळ, भाजीपाला पिकांची वाहतुक व साठवणुकीमध्ये नुकसान होत आहे. पणन विभागामार्फत यावर उपाययोजना आखल्या जात असून शेतकऱ्यांनी नाविण्यपूर्ण संकल्पना सुचविल्यास त्यांचा विचार केला जाईल.’

प्रारंभी डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. पाल यांनी प्रास्ताविक केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link