Next
‘अभिजात मराठी’साठी...
BOI
Tuesday, February 27 | 02:30 PM
15 0 0
Share this story


मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी गेली काही वर्षे प्रयत्न सुरू आहेत. आज मराठी राजभाषा दिन साजरा करत असताना या बाबीचा उल्लेख होणे ओघानेच येते. यासाठी राज्य सरकारतर्फे तयार करण्यात आलेल्या रंगनाथ पठारे समितीचे समन्वयक प्रा. हरी नरके यांनी याविषयी मूलभूत काम केले आहे. त्यांनी ‘अभिजात मराठी’बद्दल दिलेली ही माहिती...
..............
अभिजात भाषेची संकल्पना
- २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिन आपण मराठी भाषक ‘मराठी गौरव दिन’ म्हणून साजरा करतो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी बऱ्याच वर्षांपासून आपले जे प्रयत्न सुरू आहेत, त्याला यश मिळावे अशी आपल्या सर्वांचीच इच्छा आहे. केंद्र सरकारने साधारण १० ते १२ वर्षांपूर्वी तमिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यानंतर इतर भाषकांनीही आपल्या भाषेला हा दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न सुरू केले. तमिळनंतर संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि उडिया अशा एकूण सहा भाषांना हा दर्जा मिळाला आहे. मराठीसाठी राज्य सरकारने नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीमार्फत चार वर्षांपूर्वी केंद्र सरकारकडे याबाबतचा एक प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. हा प्रस्ताव केंद्राने छाननीसाठी भाषा तज्ज्ञांकडे पाठवला होता. त्यावर मराठीसाठीची ही मागणी रास्त असल्याचे मत भाषातज्ज्ञांनी मांडले आहे.  

अभिजात भाषा म्हणजे नेमके काय, याचा खुलासा या निमित्ताने नक्कीच झाला पाहिजे. साधारणतः पूर्वी, उच्चवर्णीय लोक बोलतात ती भाषा अभिजात, असा सर्वसाधारण निकष होता. परंतु प्रबोधनकाळानंतर यात बदल झाला. त्यानंतर, ज्या भाषेतील साहित्य श्रेष्ठ, अशी भाषा अभिजात भाषा म्हटली जाईल, असा निकष लावण्यात आला. यासाठी केंद्र सरकारने घालून दिलेले चार निकष आहेत. त्यापैकी पहिला निकष म्हणजे, अर्थातच त्या भाषेतील साहित्य श्रेष्ठ दर्जाचे असले पाहिजे. सुदैवाने आपल्याला लाभलेले निष्णात, प्रतिभाशाली मराठी साहित्यिक, ज्यांनी अमाप असे उच्च दर्जाचे साहित्य मराठीत निर्माण केले आहे. यामुळे साहित्य दर्जा हा पहिला निकष आपण नक्कीच पूर्ण केला आहे. 

दुसरा निकष आहे प्राचीनता. ती भाषा किती जुनी आहे हा मुद्दा इथे येतो. साधारणतः १५०० ते २००० वर्षे इतकी ती भाषा जुनी असावी. त्यासाठी त्या भाषेतील तेवढे जुने दस्तऐवज मिळावेत अशी अपेक्षा आहे. प्राचीनतेचा हा निकष मराठी पूर्ण करील का, अशी शंका बहुतेकांना होती. परंतु पठारे समितीमार्फत यासाठी आम्ही सादर केलेल्या अहवालात मराठीच्या प्राचीनतेबाबत भरपूर पुरावे दिले आहेत. तिसरा निकष म्हणजे ही भाषा इतर कोणत्याही भाषेची कार्बन कॉपी अथवा नक्कल असता कामा नये. या निकषाचा मराठीबाबत विचार करता, मराठी ही संस्कृत भाषेची नक्कल आहे का, तिच्यापासून जन्मली आहे का, असे प्रश्न पडले होते; मात्र मराठी ही पूर्णतः वेगळी भाषा असून, ती संस्कृतपेक्षाही जुनी आहे. याबाबतचे असंख्य पुरावे आम्ही सादर केले आहेत आणि विशेष म्हणजे भाषातज्ज्ञांनीही ते मान्य केले आहेत. 

कोणतीही भाषा ही प्रवाही असते. तिच्यामध्ये सातत्याने बदल होत जातात. पूर्वीसारखीच ती राहत नाही. परंतु असे असले तरी तिचे मूळ रूप आणि आताचे रूप याचे काहीतरी नाते असले पाहिजे, संबंध असला पाहिजे आणि तोही मराठीच्या बाबतीत होतो. मराठी भाषेचे वय हे साधारण दोन हजार वर्षांचे आहे, असे रंगनाथ पठारे समितीने म्हटलं आहे. यासाठी आवश्यक ते सर्व पुरावेही सादर करण्यात आले आहेत. यात विशेषतः शिवनेरी किल्ल्याजवळ असलेल्या नाणेघाटात २२०० वर्षांपूर्वीचा ब्राह्मी लिपीतला एक शिलालेख मिळाला आहे. या शिलालेखात ‘महारठींनो’ असा मराठी भाषिकांसाठी केलेला उल्लेख आहे. याचाच अर्थ मराठी भाषिक होते म्हणजे मराठीही होती. याव्यतिरिक्त तमिळ भाषेतील साहित्यातही आणि श्रीलंकेतही मराठी भाषेचे आणि भाषकांचे उल्लेख आढळतात. हे सर्व पुरावे आम्ही याबाबतच्या अहवालात सादर केले आहेत. 

अभिजात दर्जा मिळाल्याने काय होईल?
- मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, असे पहिल्यांदा कोणी मांडले, असा विचार केला, तर सर्वप्रथम दुर्गाबाई भागवतांचे आजोबा महामहोपाध्याय राजारामशास्त्री भागवत यांचे योगदान लक्षात घ्यावे लागेल. त्यांनी १८८५मध्ये मराठीत दोन ग्रंथ लिहिले. त्यांच्या या अभ्यासाचे सहा खंड दुर्गाबाईंनी अलीकडेच प्रकाशित केले आहेत. याच्या प्रस्तावनेत, मराठी ही संस्कृतपेक्षा जुनी असल्याचे या अभ्यासातून स्पष्ट होते, असे दुर्गाबाईंनी म्हटले आहे. खरे तर राजारामशास्त्री संस्कृत पंडित होते. संस्कृत हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. परंतु असे असतानाही त्यांनी मराठीचे अस्तित्व मांडले आहे. 

मराठीला ५२ बोलीभाषा आहेत. तिला एक समृद्ध असा वारसाही आहे. मराठीला हा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, तर ती आणखी समृद्ध होईल, करता येईल. हा दर्जा मिळाल्यानंतर केंद्र सरकारकडून दर वर्षी मराठीच्या विकासासाठी महाराष्ट्राला ५०० कोटी रुपये इतका प्रचंड निधी मिळेल. आज महाराष्ट्र सरकार यासाठी वर्षाला १० कोटी रुपये देते. हा दर्जा मिळाल्यानंतर त्याचे ५१० कोटी होतील. हा खरे तर खूप मोठा फायदा होणार आहे. या माध्यमातून मराठीसाठी असंख्य उपक्रम राबवता येतील. कित्येक कामांना बळ देता येईल. 

युवकांना मराठीकडे वळवण्यासाठी मराठी भाषेत रोजगार निर्माण झाले पाहिजेत. त्यासाठीही प्रयत्न करता येतील. ‘जी भाषा रोजगार देते, ती भाषा जगते’ असे भाषांचा अभ्यास केलेल्या ‘ग्रीअर्सन’ने म्हटले आहे. उद्योगात, व्यापारात, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मराठीला महत्त्व द्यायचे असेल, तर त्यासाठी आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि हा दृष्टिकोन आर्थिक पाठबळाशिवाय बदलू शकणार नाही, असे वाटते. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर ती एक जागतिक दर्जाची भाषा होईल. तसे झाल्यास आपल्याकडे मराठीबाबत जो न्यूनगंड आहे, तो बदलेल. पालक आपल्या पाल्याला मराठी शाळांमध्ये घालतील. त्यांना मराठी शिकवतील. मराठीसाठी अजून भरपूर काम होणे गरजेचे आहे. तिला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर यासाठी अधिक बळ मिळेल, अधिक ऊर्जा मिळेल, असा विश्वास वाटतो. 

(शब्दांकन, व्हिडिओ : मानसी मगरे)

(मराठी राजभाषा दिनानिमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध झालेले सर्व लेख, कविता आणि व्हिडिओ https://goo.gl/qgDdWU या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध असतील.) 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link