Next
‘बंदमध्ये सहभागी होणार नाही’
रत्नागिरी जिल्हा शिक्षण संस्थाचालक संघाचा बैठकीत निर्णय
BOI
Monday, October 29, 2018 | 11:36 AM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी जिल्हा शिक्षण संस्थाचालक संघातर्फे आयोजित बैठकीत बोलताना म्हाडाचे अध्यक्ष, आमदार उदय सामंत. शेजारी संघाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. विलास पाटणेआणि शिक्षण संस्थाचालक.

रत्नागिरी : ‘राज्यातील सर्व शिक्षण संस्थाचालकांनी विविध मागण्यांसाठी दोन नोव्हेंबरला शाळा बंदची हाक दिली होती; मात्र हा परीक्षांचा काळ असल्याने या बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय रत्नागिरी जिल्हा शिक्षण संस्थाचालक संघटनेने घेतला आहे,’ अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. विलास पाटणे यांनी दिली.

माळनाका येथील शासकीय विश्रामगृहामध्ये २८ ऑक्टोबर २०१८ला संस्थाचालकांची बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी देवरुख येथील सदानंद भागवत, मालगुंड येथील डॉ. नाना मयेकर, राजापूर येथून जावेद ठाकूर, चिपळूण येथील सुधीर दाभोळकर, मंडणगड येथील विनोद दळवी, जिल्हा शिक्षण संस्थाचालक संघाचे सचिव श्रीराम भावे, प्रताप सावंतदेसाई, नरेंद्र पाटील, साखरपा येथील आबा सावंत यांसह ८० संस्थाचालक उपस्थित होते.

अ‍ॅड. पाटणे म्हणाले, ‘कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ, किनारपट्टीवर मत्स्य विद्यापीठ यांसह अन्य अनेक मागण्या प्रलंबित आहेत. विनाअनुदानित शाळांचे प्रश्‍न गंभीर आहे. हे प्रश्‍न सोडवण्यासाठी नजीकच्या काळात मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात येणार आहे; मात्र मागण्या मान्य न झाल्यास निर्णायक आंदोलनासाठी संस्थाचालकांनी सज्ज व्हावे.’

मेरीटाइम विद्यापीठाचे उपकेंद्र रत्नागिरीत होण्याबाबत, पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीला विरोध, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या शिक्षकेतर कर्मचारी भरतीवरील बंदी तात्काळ उठविण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. शिष्यवृत्तीसाठीचे महाडिबीटी पोर्टल सुरू होत नाही, छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती व ओबीसींना मिळणारी फी सवलत वेळेवर मिळत नाही, रोस्टरनुसार आरक्षण नसताना कोणत्याही प्रवर्गाचा अतिरिक्त उमेदवार शिक्षण खात्याकडून घेण्याबाबत सक्ती केली जाते, यावरही संस्थाचालकांनी आपापली मते मांडली.

विनाअनुदानित शाळांना पाठ्यपुस्तके व पोषण आहार मिळत नाही, वेतनेतर अनुदान पुरेसे मिळत नाही, शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये नियमित मुख्याध्यापक भरण्यात प्रशासकीय अडचणी आहेत. कनिष्ठ महाविद्यालयांच्या बायोमॅट्रीक्स हजेरीमुळे अध्यापनावर परिणाम होतो. शिक्षक भरती बंदी काळात संस्थानी आस्थापनेवर नेमलेल्या शिक्षकांच्या सेवेचा विचार शासन पातळीवर व्हावा, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन व समावेशन परस्पर मुख्याध्यापकांना न कळविता ते संस्थेला कळवून व्हावे, शिक्षकांची संख्या मागील वर्षीच्या पायाभूत पदानुसार न ठरविता उपलब्ध विद्यार्थी संख्येनुसार व आरटीई अ‍ॅक्टनुसार मंजूर करावी, अशा मागण्या या वेळी केल्या.

‘शिक्षण क्षेत्रातील प्रश्‍नांसाठी मी कायम संस्थाचालकांबरोबर आहे. सर्व आमदारांना बरोबर घेऊन संस्थाचालकांचे प्रश्‍न मार्गी लावू,’ असे आश्वासन म्हाडाचे अध्यक्ष, आमदार उदय सामंत यांनी दिले. सामंत यांनी संस्थाचालकांच्या मागण्या ऐकून त्या सोडवणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search