Next
‘महायुती सरकारच्या विकासकामांमुळेच नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश’
प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन
BOI
Tuesday, July 30, 2019 | 06:02 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : ‘भारतीय जनता पक्ष महायुती सरकारने गेल्या पाच वर्षांत राज्यात केलेल्या विकासकामांमुळे जनतेमध्ये भाजपविषयी प्रचंड विश्वास निर्माण झाला असून, त्यामुळेच अन्य पक्षांतील अनेक नेते व कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत,’ असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रस्तावित महाजनादेश यात्रेच्या बोधचिन्हाचे अनावरण चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर, प्रदेश माध्यम विभागप्रमुख प्रवक्ते केशव उपाध्ये आणि प्रवक्ते अवधूत वाघ उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ‘गेल्या पाच वर्षांत राज्यातील सिंचनाखालील क्षेत्र ३४ लाख हेक्टरवरून वाढून ४० लाख हेक्टर झाले. अशा प्रकारे विविध क्षेत्रांत विकास झाला आहे. शहरी व ग्रामीण भागातील विकासकामांचा अनुभव सामान्य माणूस घेत आहे. परिणामी त्या-त्या भागातील लोकप्रतिनिधींना भाजपमध्ये प्रवेश करावा असे वाटते. आगामी १५ वर्षे काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येणार नाही. आपल्या भागाचा विकास करण्यासाठी नेत्यांना भाजपसोबत यावेसे वाटते. भाजपमध्ये घाणेरडे राजकारण होत नाही, याची अन्य पक्षांतील नेत्यांना जाणीव झाली आहे.’

माजी केंद्रीय मंत्री व माजी राज्यपाल राम नाईक पुन्हा राजकारणात सक्रीय होत असून, ३० जुलैला त्यांनी भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केला आहे. नाईक यांनी पाच वर्षांपूर्वी राज्यपालपदी नियुक्ती होत असताना भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, सकाळी दहा वाजता मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा रथ मंगळवारी मुंबईतून अमरावती जिल्ह्याकडे रवाना झाला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search