मुंबई : ‘खरीप पिकांसाठी चालू हंगामात किमान हमी भावात मोठी वाढ करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या ऐतिहासिक निर्णयामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव मिळवून देण्याची भारतीय जनता पक्ष सरकारची घोषणा प्रत्यक्षात आली आहे. शेतकऱ्यांना न्याय दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो,’ असे भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांनी चार जून रोजी सांगितले.
दानवे म्हणाले, ‘शेतमालाचा उत्पादन खर्च विचारात घेताना सरकारने मजुरी, यंत्राच्या वापराचा खर्च, बियाणे, खते, किटकनाशके यांचा खर्च, सिंचनाचा खर्च असा सर्व प्रकारचा खर्च ध्यानात घेतला आहे. कुटुंबाच्या श्रमाची किंमत तसेच शेतीसाठी होणारा इतर खर्चही ध्यानात घेऊन किमान हमी भावात वाढ केली आहे. ज्वारी, बाजरी, कापूस, तूर, मूग, सूर्यफूल अशा विविध प्रकारच्या पिकांसाठीचा किमान हमी भाव वाढवला आहे. शेतकऱ्यांना त्याचा मोठा लाभ होईल. २०२२पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले पाहिजे, असा मोदी सरकारचा प्रयत्न आहे, त्यादृष्टीने आजचा निर्णय हे खूप महत्त्वाचे पाऊल आहे.’
‘शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव मिळाला पाहिजे, अशी शेतकऱ्यांची अनेक वर्षांची मागणी होती. भाजपने लोकसभा निवडणुकीत तसे आश्वासन दिले होते व यंदाच्या अर्थसंकल्पात त्याची घोषणाही केली होती. त्यानुसार केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतमालाच्या हमीभावात भरघोस वाढ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला,’ असे दानवे यांनी सांगितले.
‘पंतप्रधान पीक विमा योजना ही अत्यंत कमी विमा हप्त्याची मोदीजींनी लागू केलेली योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरली आहे. त्याचप्रमाणे नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट, सॉइल हेल्थ कार्ड अशा विविध योजना सरकारने यापूर्वीच सुरू केल्या आहेत,’ अशी माहिती ही दानवे यांनी या वेळी दिली.