Next
मुंबई-गोवा आंग्रिया क्रूझचे १२ ऑक्टोबरला उद्घाटन
कोकणातील बंदरांवर थांबे मिळण्यासाठी प्रयत्न
BOI
Wednesday, October 03, 2018 | 02:53 PM
15 0 0
Share this article:

फोटो : http://angriyacruises.com

रत्नागिरी :
देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आंग्रिया या लक्झरी क्रूझसेवेचा शुभारंभ १२ ऑक्टोबर २०१८ रोजी मुंबईत होणार आहे. केंद्रीय नौकानयनमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. मुंबई ते गोवा या मार्गावरील या सेवेमुळे बोट वाहतूक क्षेत्रातील नवे पर्व सुरू होणार आहे. प्रत्यक्ष नियमित वाहतूक १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

या क्रूझमुळे कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचा रोजगार निर्माण होईल. या क्रूझमधे स्विमिंग, स्पा, जिम, बार रेस्टॉरंट आदी सोयी उपलब्ध असतील. सायंकाळी पाच वाजता मुंबईतून सुटलेली क्रूझ दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता गोव्याला पोहोचेल. यातून एका वेळी पाचशे प्रवासी प्रवास करू शकतात आणि तिकीट दर सुमारे सात हजार रुपये असेल. सागरी वाहतूक क्षेत्रातील जाणकार कॅप्टन नितीन धोंड यांच्या ‘आंग्रिया सी ईगल’ या कंपनीमार्फत ही सेवा सुरू होत आहे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील आरमाराचे सरखेल म्हणजेच सेनापती कान्होजी आंग्रे यांच्या नावावरून क्रूझला आंग्रिया हे नाव देण्यात आले आहे. 

या सेवेमुळे गोव्याच्या पर्यटनाबरोबरच कोकणाचे सौंदर्य, जैवविविधता, इतिहास या गोष्टीही जागतिक नकाशावर येणार आहेत. त्यामुळे कोकणातील रत्नागिरी, विजयदुर्ग, मालवण आदी महत्त्वाच्या बंदरांवर क्रूझला थांबा मिळण्याबाबत रत्नागिरीतील अॅड. विलास पाटणे आधीपासून प्रयत्नशील आहेत. बंदरे मालाची चढ-उतार करण्यासाठी तयार केली जातात. नव्या गरजेनुसार नितीन गडकरी यांनी कोकणातील महत्त्वाच्या बंदरांवर क्रूझ टर्मिनल उभारण्याचे आदेश जलवाहतूक मंत्रालयाला दिले आहेत. तसेच कोकणात गुंतवणूकदार पुढे येत नसल्याने बोट खरेदीसाठी केंद्राच्या शिपिंग कॉर्पोरेशनने ८०० कोटींचा निधी मंजूर केला आहे.

क्रूझ पर्यटनवाढीच्या दृष्टीने जगभर समुद्राचे मार्केटिंग केले जात आहे. कोकणातील नितांतसुंदर समुद्रकिनारे, सुंदर निसर्ग ही जमेची बाजू आहे. क्रूझमुळे पर्यटन क्षेत्रात नव्याने संधी उपलब्ध होतील. मुंबईत दोन फ्लोटिंग रेस्टॉरंटही सुरू करण्यात येत आहेत. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाबरोबर क्रूझ सेवा सुरू करून कोकणाच्या विकासाचे नवे पर्व सुरू केल्याबद्दल अॅड. विलास पाटणे यांनी नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.

क्रूझसेवेविषयी अधिक माहितीसाठी वेबसाइट : http://angriyacruises.com
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search