Next
महाबळेश्वर येथे होणार देशातील पहिले ‘हनी पार्क’
प्रेस रिलीज
Monday, May 21, 2018 | 03:21 PM
15 0 0
Share this article:

जागतिक मधुमक्षिका दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झालेले खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती विशाल चोरडिया, नाना क्षीरसागर व रमेश सुरुंग

पुणे : ‘आज शहरी भागात मधुमक्षिकांचे पोळे दिसले, की ते पेस्टकंट्रोल करून पाडले जाते अथवा ते नष्ट केले जाते. मधुमक्षिकांबद्दल असलेली अपुरी माहिती आणि गैरसमाज यांतून हे प्रकार वाढले असून, मधुमक्षिकांचे संरक्षण व संवर्धन व्हावे याबरोबरच मधुमक्षिका पालन या उद्योगासंदर्भात जनजागृती व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र सरकारच्या खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने ‘मधुमक्षिका मित्र’ हा उपक्रम राबविला जाणार आहे’, अशी घोषणा मंडळाचे सभापती विशाल चोरडिया यांनी केली. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ व हातकागद संस्था, संशोधन, प्रशिक्षण विभाग यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

‘महाबळेश्वर येथे दोन एकर जागेत लवकरच देशातील पहिले ‘हनी बी पार्क’ सुरु करण्याची आमची योजना असून, यामध्ये मधुमक्षिका पालन कसे करावे, कसे केले जाते, त्याच्या पद्धती, मध कसा काढावा, मधाचे पोळे कसे असते, मधुमक्षिकांचे काम कसे चालते यांसारख्या अनेक महत्त्वाच्या गोष्टींची माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. मधुमक्षिकांबद्दलच्या जागृती बरोबरच या ठिकाणी एक टूरिस्ट हब कम माहिती केंद्र बनविण्याचा आमचा हा एक प्रयत्न असेल’, असेही चोरडिया यांनी नमूद केले.  

संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत नुकताच २० मे हा दिवस जागतिक मधुमक्षिका दिन म्हणून जाहीर करण्यात आला. त्या निमित्ताने मंडळाच्या वतीने हातकागद संस्थेच्या आवारात असलेल्या महाखादी परिसरात पहिल्या जागतिक मधुमक्षिका दिनाचे औचित्य साधत तीन दिवसीय मधुमक्षिकापालन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन चोरडिया यांच्या हस्ते करण्यात आले. सीबीआयआरटी अर्थात केंद्रीय मधुमक्षिका संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे संचालक दीप वर्मा, मध उद्योग तज्ज्ञ नाना क्षीरसागर, मध उद्योजक प्रशांत सावंत, सारिका सासवडे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी अनिल खेडकर, हातकागद संस्थेचे संचालक रमेश सुरुंग आदी या वेळी उपस्थित होते.

चोरडिया पुढे म्हणाले, ‘मधुमक्षिका हा मनुष्याला उपयुक्त असा कीटक आहे. मात्र, त्याबद्दल अनेक गैरसमजही आहेत. परागीकरणाबरोबरच मधनिर्मिती, मेण निर्मिती यांसारख्या अनेक गोष्टींसाठी मनुष्याला त्याचा उपयोग होत असतो. मधुमक्षिकांकडून आपल्याला तब्बल १९ प्रकारचे मध मिळतात इतकेच नाही, तर मधुमक्षिका पालनाशिवाय आपण त्याच्याशी संबंधित तब्बल ४६ प्रकारचे उद्योगही करू शकतो. मधुमक्षिकांची हीच उपयुक्तता आपण सामान्य नागरिकांना समजावून सांगणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या पुढाकाराने खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने ‘मधुमक्षिका मित्र’ हा उपक्रम आम्ही हाती घेत असून, या अंतर्गत प्राणीमित्र, सर्पमित्र यांसारखेच मधुमक्षिकांच्या रक्षणासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी लवकरच एक कॉल सेंटरही उभारण्यात येणार आहे. ज्याच्या मदतीने एखाद्या ठिकाणी मधमाशांचे पोळे आढळल्यास त्याला इजा न पोहोचविता मधमाशांचे शास्त्रीय पद्धतीने स्थलांतर करत त्यांचे संरक्षण व संवर्धन करणे शक्य होणार आहे. याबरोबरच पुणे शहराला ‘हनी बी फ्रेंडली सिटी’ करण्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत. नजीकच्या भविष्यात राज्याच्या महत्त्वाच्या शहरांमध्ये देखील आम्ही हा उपक्रम पोहोचवत, मधुमक्षिका वाचाविण्याबरोबरच त्यांच्याशी संबंधित माहिती गोळा करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.’ 

पहिल्या मधुमक्षिका दिनानिमित्त तीन दिवसीय मधमाशापालन महोत्सवाला शिवाजीनगर येथील हातकागद संस्थेच्या आवारात असलेल्या महाखादी परिसरात सुरुवात झाली असून, या अंतर्गत येत्या सोमवार २१ मेपर्यंत मधुमक्षिकापालन साहित्य प्रदर्शन, शुद्ध मध कसा ओळखावा याबाबतचे प्रात्यक्षिक; तसेच शेती व पर्यावरणा संदर्भात मधव्यवसायाचे महत्त्व  यावरील माहितीपट अशा अनेक या विषयांवर चर्चासत्रे व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुले असून, याचा फायदा जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन हातकागद संस्थेचे संचालक रमेश सुरुंग यांनी केले.
 एन. के. पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले, तर रमेश सुरुंग यांनी आभार मानले.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search