मुंबई : ‘टाटा केमिकल्स लिमिटेड’ने भारतातील पहिले ब्रँडेड सोडिअम बाय कार्बोनेट – मेडिकार्ब बाजारात दाखल करत असल्याची घोषणा २१ मार्च रोजी केली. हे उत्पादन औषधनिर्मितीमधील सक्रिय घटक म्हणून (फार्मा एपीआय) तसेच, औषधी संयुगांमधील आवश्यक घटक म्हणून उपयुक्त असून एफडीए प्रमाणित अत्यंत अद्ययावत अशा उत्पादन केंद्रांमध्ये त्याची निर्मिती केली जाईल. ही उत्पादनकेंद्रे भारतामध्ये औषधनिर्मितीसाठी आखून दिलेल्या सर्व निकषांना पात्र ठरणारी आहेत.
टाटा केमिकल्स लिमिटेडच्या इंडिया केमिकल्स ऑपरेशन विभागाचे सीओओ संजीव लाल म्हणाले, ‘मेडिकार्ब हे भारतातील पहिले ब्रँडेड, सर्वोत्तम दर्जाचे सोडियम बायकार्बोनेट आहे. या नव्या निर्मितीमुळे भारतीय औषध उत्पादकांना विश्वासार्ह ब्रँडद्वारे निर्मित, अद्ययावत एफडीए प्रमाणित उत्पादन केंद्रांमध्ये बनविण्यात आलेले उच्च दर्जाचे उत्पादन उपलब्ध होणार आहे. आमच्या खास नेमलेल्या वितरकांच्या नेटवर्कद्वारे मेडिकार्ब उपलब्ध करून दिले जाणार आहे. आरोग्य सेवा, वैयक्तिक देखभाल, अन्न, पशुखाद्य आणि औद्योगिक उपयोजनेच्या क्षेत्रातील ग्राहकांच्या वेगवेगळ्या गरजा भागविण्यासाठी, खास या क्षेत्रांच्या गरजांबरहुकुम बनविलेल्या उत्पादनांच्या माध्यमातून मूल्यवर्धित सेवा पुरविण्याच्या दिशेने आम्ही उचललेले हे आणखी एक पाऊल आहे.’
मेडिकार्बचे उत्पादन जीएमपी तत्त्वांनुसार तयार करण्यात आलेल्या उच्च दर्जाच्या यांत्रिक, स्वयंचलित उत्पादन प्रक्रियेद्वारे तयार केले जाईल. टाटा क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टमकडून प्रत्येक टप्प्यावर केल्या जाणाऱ्या तपासणीद्वारे, अंतिम उत्पादनाच्या दर्जाची खात्री करून घेतली जाईल. यात परवाना आणि कार्यान्वयनासाठीच्या मार्गदर्शक सूचीनुसार या उत्पादनाची निर्मिती, प्रक्रिया, पॅकिंग आणि वितरण अशा सर्व टप्प्यांचा समावेश असेल. याशिवाय ग्राहकांना टाटाच्या अंतर्गत संशोधन आणि विकास प्रक्रियेच्या आणि तांत्रिक सेवा पथकाच्या तांत्रिक विक्री मार्गदर्शनाचे पाठबळही मिळेल. ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार लहान प्रमाणांत हे उत्पादन मागवता येईल व त्याच्या वेगवान वितरणाची यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली आहे.
शुद्धतम दर्जाचे सोडियम बायकार्बोनेट हे औषधनिर्मिती उद्योगामध्ये अल्कली म्हणून वापरले जाते. सोडियम बाय कार्बोनेट हा फसफसणारी अँटासिड्स, वेदनाशामक गोळ्या आणि पावडरी, व्हिटॅमिन सप्लिमेंट्स, इंजेक्टेबल पावडर्स, टूथपेस्ट आणि अँटासिड जेल संयुगांच्या निर्मितीमधील एक महत्त्वाचा घटक आहे. रक्तशुद्धीकरणाच्या प्रक्रियेमध्ये पीएच घटकांचे संतुलन राखण्यासाठी, बाय कार्बोनेटमधील इयॉन्स पुरविणारा बफरिंग एजंट अर्थात् आघातप्रतिबंधक माध्यम म्हणूनही त्याचा वापर होतो.
टाटा केमिकल्सविषयी :शंभर बिलियन अमेरिकन डॉलर्स मोलाच्या टाटा ग्रुपचा एक भाग असलेली टाटा केमिकल्स लिमिटेड ही एक जागतिक कंपनी असून, ती जीवनशैली, उद्योग, शेतीसाठी अत्यावश्यक उत्पादने यांच्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या व्यवसायांमध्ये प्रामुख्याने रस घेते. विज्ञानाने हाती दिलेल्या फलितांचा केवळ व्यापारासाठी नव्हे, तर त्याहीपलीकडची लक्ष्ये साध्य करण्यासाठी वापर करण्याच्या विविध प्रयोगांमध्ये, या कंपनीच्या यशोगाथेचे सार सामावलेले आहे. आपल्या लिव्हिंग एसेन्शियल अर्थात जीवनासाठी अत्यावश्यक उत्पादनांच्या श्रेणीद्वारे कंपनीने भारतातील लक्षावधी लोकांच्या जगण्यात सकारात्मक परिवर्तन घडवून आणले आहे. सुपरब्रँड्सच्या पाहणीनुसार, टाटा केमिकल्सला भारतातील सर्व उद्योग व ग्राहकोपयोगी ब्रँडच्या गटांमधील पहिल्या दहा टक्के व्यापारी व ग्राहकोपयोगी ब्रँडमध्ये स्थान मिळाले आहे.