Next
‘चित्रपटाशी संबंधित प्रत्येक घटकाने चित्रपटाला मान दिला पाहिजे...’
प्रख्यात हिंदी चित्रपट दिग्दर्शक जानू बरूआ यांचे प्रतिपादन
BOI
Thursday, December 27, 2018 | 04:29 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘भारताचा इतिहास आणि इथली संस्कृती हे दोन्हीही खूप समृद्ध आहेत. भारतातल्या खेड्या-खेड्यांत आणि चौका-चौकांत नानाविध गोष्टी लपून राहिलेल्या आहेत. या सगळ्याबद्दल आपण मोठ्या प्रमाणात अनभिज्ञ आणि निष्काळजी असल्याने आपण पाश्चात्य चित्रपट सृष्टीतून गोष्टी उधार घेतो, हे खेदजनक आहे’, असे मत राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त प्रख्यात हिंदी चित्रपट दिग्दर्शक जानू बरूआ यांनी व्यक्त केले. 

‘आशय फिल्म क्लब’तर्फे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात आयोजित नवव्या आशियाई चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन जानू बरूआ यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. १५ वर्षांत मराठी चित्रपट सृष्टीला ५० चित्रपट देणारे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांचा या वेळी विशेष सन्मान करण्यात आला. उद्‌घाटनानंतर काझीम ओझ दिग्दर्शित ‘झेर’ हा तुर्की चित्रपट उद्‌घाटनाचा चित्रपट म्हणून दाखवण्यात आला. 

या महोत्सवाचे आयोजन महाराष्ट्र शासनाचा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या सहयोगाने, तर राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय), फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया आणि एशियन फिल्म फाऊंडेशन, मुंबई यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून रसिकांना १५ आशियाई देशांमधील ४०पेक्षा जास्त चित्रपटांचा आस्वाद घेता येणार आहे. 

‘प्रत्येक चित्रपट सृष्टीला ओळख आणि चेहरा आहे. परंतु आशियाई चित्रपट ती ओळख प्राप्त करण्यासाठी संघर्ष करत आहे. चित्रपटाशी संबंधित प्रत्येक घटकाने चित्रपटाला मान द्यायला शिकले पाहिजे. पाश्चात्य चित्रपट सृष्टीशी तुलना केली असता, त्यांच्याकडे सांगण्यासारखी गोष्ट नाही. त्या तुलनेत भारत हा विविधतेने नटलेल्या संस्कृतीचा देश आहे. शिवाय कैक भाषा इथे बोलल्या जातात. त्यामुळे आपल्याकडे भरपूर  गोष्टी सहज मिळू शकतात. पाश्चात्यांकडून उधारीवर घेतलेल्या संकल्पनांवर चित्रपट तयार करण्यापेक्षा आपल्याकडील अस्सल आणि वास्तवदर्शी गोष्टींवर चित्रपट निर्मात्यांनी काम केले पाहिजे’, असे मत बरुआ यांनी व्यक्त केले.

दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनीही या वेळी मोकळेपणाने आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘या क्षेत्रातील माझा तिसरा अंक सुरू असून मी या माध्यमाकडे अधिक सजगपणे आणि परिपक्वतेने पाहण्यास शिकतो आहे. गेल्या काही काळात तंत्रज्ञान आणि आशय या बाबतीत आपला सिनेमा अतिशय झपाट्याने बदलला आहे, याचा मी साक्षीदार आहे. १५ वर्षांत ५० चित्रपटांची निर्मिती यामध्ये आकड्यांवर हुरळून न जाता, सिनेमा कसा बनवावा, याबाबतचे माझे शिक्षण आता सुरू झाले आहे असे मला वाटते’, अशी नम्र भावना त्यांनी या वेळी व्यक्त केली.

याप्रसंगी व्यासपीठावर दिग्दर्शक गजेंद्र अहिरे, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे उपसंचालक कीर्ती तिवारी, दिग्दर्शक मिलिंद लेले, महोत्सवाचे संयोजक सतीश जकातदार आणि वीरेंद्र चित्राव आदी मान्यवर उपस्थित होते. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link