Next
हीच वेळ; मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडण्याची..
BOI
Sunday, April 22 | 09:45 AM
15 0 0
Share this story


मानसिकतेच्या गुलामगिरीतून बाहेर पडायचं, तर अनेक चौकटींना, मुळांना उपटून काढावंच लागेल. या चौकटी स्त्रियांनी मोडायला हव्यात. पुरूषांनी लाथाडायला हव्यात. स्त्री-पुरुषांनी उखडून, उपटून त्यांची मुळंच छाटायला हवीत. आपल्या स्वत:कडेच सहानुभूतीनं, सहवेदनेनं पाहण्याची गरज आहे. आपण कशा-कशाचे गुलाम आहोत आणि आणखी होऊ घातलोय ते कदाचित यातून स्पष्ट होत जाईल... वाचा ‘हॅशटॅग (##)कोलाज’मध्ये...
.............................
अश्पाक गावी असल्याने मी मम्मीकडे राहायला आले. सकाळी स्वयंपाक करताना मला पीठ मळायचा कंटाळा आला होता म्हणून मी मम्मीला म्हटलं, ‘तू आटा गुँद के दे, मै चपाती करती.’ तिथंच माझा साडे तीन वर्षांचा मुलगा- सुफियान होता. तो लगेच अॅमक्शन करत मला म्हणाला, ‘मम्मा ऐसा गुँदतेने आटा. मैं पुरा गुँदुंगा.’ आई म्हणून मला त्याच्या असं बोलण्याचं अर्थातच खूप कौतुक वाटलं. मी त्याचा लाड केल्याने त्याला वाटलं, मी तसं करू द्यायला तयार आहे. म्हणून तो लगेच मागे लागला, ‘दे ना मुझे आटा... मैं करता ना.’ मग त्याला मी समजावलं. अरे तू लहान आहेस. थोडा मोठा झालास ना, की मग तू पीठ मळ मी चपात्या लाटेल. त्याला ते पटलं बहुधा. मग तो खूशीत येऊन म्हणाला, ‘थोडा बडा होने पर मैं तब लडकी होऊँगा ना, तब आटा गुँदनेका है ना, मम्मा..’ त्याचं हे बोलणं ऐकून आधी हसायला आलं. पण लगेच त्याच्या म्हणण्याचा अर्थ उलगडून त्याला म्हटलं, ‘आटा गुँदनेके लिए लडकी नही बनना पडता. तू लडका बनकरही ये काम कर. लडकेभी करते है.’  

यानंतरची दुसरी घटना म्हणजे मी विजय तेंडुलकर लिखित ‘कमला’ हा चित्रपट पाहिला. दिप्ती नवल, शबाना आझमी, मार्क जुबेर यांच्यावर चित्रित केलेला १९८५मध्ये प्रकाशित झालेला चित्रपट. आदिवासी समाजातील एका स्त्रीला विकलं जाण्याची आणि तिला गुलाम बनविण्याची ही गोष्ट. म्हणजे अशी मानवाची विशेषतः स्त्रीची खरेदी-विक्री होते आणि तिला गुलाम म्हणून आणलं जातं, असा भांडाफोड एका पत्रकाराला करायचा असतो आणि त्यासाठी तो चक्कं एका आदिवासी पाड्यावरच्या स्त्रीला ‘कमला’ला विकतच घेऊन शहरात येतो. अशी ती गोष्ट आहे. हे सगळं आज चित्रपटातून पाहताना विलक्षण त्रास होत राहिला, कारण आजही ही परिस्थिती आणि मानसिकता बदललेली नाही.

स्त्रियांचा व्यवहार होतो किंवा नाही याबाबत तर परिस्थिती बदलली नाहीच, असंच म्हणावं लागेल. म्हणून तर दुर्गम भागांत आजही गावातल्या मुली विकून वैश्या वस्तीपर्यंत  पोहोचतात; पण एकूणच गुलाम बनविण्याच्या मानसिकतेत तरी जरा बदल झालेले दिसतात. चित्रपटातूनच अधोरेखित केलेली सरितासारखी शिक्षित, समंजस व चांगल्या घरातील स्त्रीदेखील पत्नी म्हणूनही गुलामच आहे. असंच जगणं आजही कित्येकीच्या वाट्याला येतं. चांगल्या घरांमधील चार भिंतींच्या  आतही त्यांची किंमत तशी शून्यच असते. ‘तुला काय कळतंय..’, असं म्हणत गप्प करणारी गुलामी त्याही जगत राहतात. 

कित्येक स्त्रिया आजही ‘कमला’ आहेत. ‘गुलाम’ आहेत. पुरुषी मानसिकतेच्या, पुरूषसत्ताक जडणघडणीच्या त्या आजही गुलाम आहेत. पती मालक आणि पत्नी त्याचं मन राखणारी गुलाम. तिच्या शरीरावर तर संपूर्ण हक्क असल्याचं सांगणाराच, पण त्याचबरोबर तिच्या भावभावना आणि मर्जीवरही त्याचाच अधिकार आहे, असं सांगणारा मालक पुरुष. बरं.. तसं पाहायला गेलं, तर पुरुष तरी कुठे पुरेसा मोकळा आहे..? तो स्वत:च स्वत:च्या अहंकाराचा, गंडाचा गुलाम आहे. या गुलामीला तोही स्वत:च कुरवाळत राहतो. त्याला त्यात मजा वाटते.
 
नुसत्या अहंकाराचेच नाही, तर थेट तथाकथित पुरुषी चौकटीचेही गुलाम तेही आहेतच. ‘पुरुष’ असण्याचे गुलाम... पुरुष बनत गेल्याचे गुलाम... मर्द, पौरूषत्व, मर्दानगीच्या कल्पनांचे गुलाम... स्त्रियांवरील अत्याचाराच्या भाराचे गुलाम. त्यातल्या त्यात किरकोळ बरी वाटणारी गोष्ट म्हणजे, आज किमान काही पुरूषांना तरी या चौकटी नकोशा वाटतात. त्यांचीही घुसमट वाढत आहे. या चौकटी कैक वर्षांच्या आहेत. त्यांची मुळं शोधायला गेलो, तर खूप खणून दमायला होईल, तरी सहजासहजी दिसायची नाहीत. या गुलामगिरीतून बाहेर पडायचं, तर त्या चौकटींना, मुळांना उपटून काढावंच लागेल. या चौकटी स्त्रियांनी मोडायला हव्यात. पुरूषांनी लाथाडायला हव्यात. स्त्री-पुरुषांनी उखडून, उपटून त्यांची मुळंच छाटायला हवीत. हे खरं तर कोण्या स्त्रीचं किंवा कोणा पुरूषाचं काम नाही. ते माणसांचं काम आहे. सोप्पही नाही अन अवघडही. मात्र कष्टाचं, चिकाटीचं आणि सहनशीलतेचं काम जरूर आहे. आपल्या स्वत:कडेच सहानुभूतीनं, सहवेदनेनं पाहण्याची गरज आहे. आपण कशा-कशाचे गुलाम आहोत आणि आणखी होऊ घातलोय ते कदाचित स्पष्ट होत जाईल. असं काही बाही मनात येत राहिल.

वर उल्लेख केलेल्या दुसऱ्या घटनेनंतर पहिली घटना सतावू लागली. नकळत्या वयातल्या सुफियानला स्त्री-पुरूष, तशी जडणघडण वगैरे काहीही माहित नाही; पण त्याला दिसलं की घरात अशी कामं आई, मावशी, नानी, दादी हेच करतात. म्हणजे ही ‘लडकी’ असल्यावरंच करायची कामं. याचाच अर्थ किती खोल मुळांपासूनच अशा सगळ्या विचारधारा आपल्यात रूजल्या आहेत. सुफियान आपल्या ज्या भारतीय समाज-संस्कृतीत वाढणार आहे, तिथं त्याला पुरूषी मानसिकतेचा सामना करावाच लागणार आहे. उद्या कदाचित तोही त्या चौकटीच्या आत-बाहेर असेल. शक्य तिथे पालक म्हणून अशा चौकटी मोडायला मी किंवा माझे कुटुंबीय त्याला मदत करूही, परंतु काही वेळा त्याची त्यालाच ती मोडावी लागतील. 

तरीही एक दडपण जाणवतंय... हे दडपण नेमकं कशाचं आहे ते सांगता येत नाही... कशा-कशाचं आहे, तेही नीटसं उलगडत नाही... म्हणजे मला तरी गुलामगिरी झुगारता येईल का? कोणकोणत्या गुलामगिरीतून स्वत:ची मुक्तता, कुठं सोडवणूक आणि कुठं जमेल तेवढं तसंच अडकून पडणं, यातलं काहीतरी जमेल का..? यापुढे जाऊन, मग मी चांगली पालक होईल का इथंपासून ते मुलाला चांगल माणूस कसं बनवता येईल इथपर्यंत बर्यालच गोष्टींचं दडपण....!!

- हिनाकौसर खान-पिंजार
ई-मेल : greenheena@gmail.com

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)

(‘हॅशटॅग कोलाज’ या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/zHfVVt या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link