Next
कर्मयोगिनी सूर्यकांता पाटील
BOI
Wednesday, August 14, 2019 | 06:02 PM
15 0 0
Share this article:

देशाच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वानं स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या मराठवाड्याच्या भूमिकन्या, प्रतिभावान लोकनेत्या आणि माजी केंद्रीय ग्रामीण विकास व संसदीय कार्य राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांचा १५ ऑगस्ट २०१९ रोजी ७१वा वाढदिवस. त्या निमित्ताने त्यांच्या कर्तृत्वावर एक दृष्टिक्षेप टाकणारा हा लेख...
...........
हैदराबाद मुक्ती आंदोलनात इस्लामपूर अॅक्शनमध्ये हौतात्म्य पत्करलेले वीर हुतात्मा जयवंतराव पाटील-वायपनेकर व मातृभूमीच्या मुक्तीसाठी भारतमातेच्या पदरात आपल्या सौभाग्याचं दान देणाऱ्या अंजनाबाई पाटील यांच्या पोटी १५ ऑगस्ट १९४८ रोजी उमरखेड येथे सूर्यकांता पाटील यांचा जन्म झाला. ताई पोटात असतानाच पित्यानं हौतात्म्य पत्करलेलं. त्यामुळे समर्पित वृत्तीनं जगण्याचं बाळकडू ताईंना लहानपणीच मिळालं. हुतात्म्याची लेक असल्यामुळे अन्यायाविरुद्ध एल्गार पुकारण्याची उर्मी त्यांच्या रक्तातच होती. ज्या काळात राजकारणाकडे जनसेवेची संधी म्हणून पाहिलं जायचं, ते राजकारण पूर्वीपासूनच घरात नांदत होतं. आजोबांनी आमदारकी भूषविलेली आणि पुढे आईही आमदार झाल्या. ताईंचं दहावीपर्यंतचं शिक्षण आईसोबत विदर्भात नागपूरला झालं. पदवीपर्यंतचं शिक्षण त्यांनी नांदेड येथील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयातून पूर्ण केलं. राजकारणाचा वारसा तसा घरूनच मिळालेला. ज्या काळात ताई राजकारणात रुजू झाल्या, त्या काळात महिला फारशा राजकारणामध्ये उतरत नव्हत्या; पण ज्यांच्या मनगटात अन कार्यकर्तृत्वात अंधारवाटा उजळून काढण्याची धमक असते, तेच उजेडाचे वारसदार ठरतात. काळाच्या पुढे धावणाऱ्या या जिगरबाज मानिनीने काळाची पावलं ओळखली आणि १९७१ साली राजकारणात प्रवेश केला. 

‘ज्या मागतात शक्ती  आभाळ पेलण्याची.... 
मिळते तयास उंची येथे हिमालयाची..’

ऊर्जेचा अखंड स्रोत असलेल्या ताईंकडे सजग समाजभान आणि दूरदृष्टी आहे. वृत्तपत्राचं संपादकपद भूषवलेलं असल्यामुळे माती आणि माणसांच्या प्रश्नांची जाण होतीच. अभ्यासू, कमालीचं वाचन, बहुश्रुतपणा, प्रचंड वाणीतेज, या सर्वांच्या मुळाशी असलेली अढळ निष्ठा यातून त्यांच्यातला प्रज्ञावान आणि सत्त्वशील राजकारणी घडत गेला. राजकीय जीवनात निष्ठेच्या खडतर वाटेवरून नि:स्वार्थपणे चालताना सूर्यकांताताईंनी आपली पारदर्शकता कधीच मलीन होऊ दिली नाही. राजकारणात रुजू झाल्यानंतर नांदेड नगरपालिकेच्या सदस्यत्वापासून ते देशाच्या केंद्रीय राज्यमंत्रिपदापर्यंतचा ताईंचा राजकीय प्रवास देदीप्यमान असाच आहे. 

जब परिंदा उडान भरता है।
आँख में आसमान भरता है।

कविवर्य प्रदीप चौबेंच्या ओळींप्रमाणे ताईसाहेबांचं हे अवकाश उड्डाण डोळ्यांत आकाश साठवणारं आहे. सूर्यमंडलाचं तेज घेऊन चकाकणारं आहे. लोकहित डोळ्यांसमोर ठेवून नि:स्वार्थपणे काम करताना ताईंनी मागे कधी फिरून पाहिलेच नाही. १९८०ला हदगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून, तर १९८६मध्ये राज्यसभेच्या सदस्यपदी त्या निवडून आल्या. त्यानंतर सलग दोनवेळा खासदार म्हणून लोकसभेवर निवडून आल्या आणि ३४ वर्षांच्या राजकीय प्रवासानंतर २००४ साली हिंगोली लोकसभा मतदारसंघातील जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने त्या केंद्रिय मंत्रिमंडळात ग्रामीण विकास व संसदीय कार्य राज्यमंत्री झाल्या. ग्रामीण भागातील सर्व प्रश्नांची सखोल जाण असलेल्या ताईंना केंद्रात ग्रामीण विकास खात्याचं मंत्रिपद मिळणं ही अभिमानाची गोष्ट आहे. त्यांना मिळालेलं मंत्रिपद हे खऱ्या अर्थाने या भागाच्या विकासासाठी पर्वणीच ठरलं. 

सत्तारूढ झाल्यानंतर ग्रामीण भागाच्या मूलभूत आणि गतिमान विकासासाठी ताईंनी वेगवेगळ्या महत्त्वाकांक्षी योजना यशस्वीपणे राबविल्या, नव्हे खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाच्या विकासवाटाच निर्माण केल्या. मिळालेल्या सत्तेचा जनकल्याणासाठी वापर करणाऱ्या या लोकनेत्याने आपल्या एकूण ४९ वर्षांच्या राजकीय जीवनामध्ये देशात आणि राज्यात महत्त्वाच्या विविध पदावर राहून काम करताना मूलभूत प्रश्नांना कधीच बगल दिली नाही, की मतलबी राजकारणही केले नाही. म्हणूनच त्या काळामध्ये या भागात महत्त्वाची अशी लोकोपयोगी विकासकामे होऊ शकली. 

ताईंनी या काळात अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबवल्या व खऱ्या अर्थाने या भागाचा कायापालट केला असं म्हणायला हरकत नाही. विशेष म्हणजे आवश्यक असलेलं मुदखेड -आदिलाबाद व पूर्णा ते अकोला या रेल्वेमार्गाचं रुंदीकरण असेल किंवा महत्त्वाकांक्षी बाभळी बंधारा प्रकल्प असो, हे प्रकल्प पूर्णत्वास गेले पाहिजेत याकरिता केंद्रात मंत्री असताना भरीव निधीची तरतूद करून सूर्यकांता पाटील यांनी ही विकासकामे तडीस नेली. हे सर्व करत असताना त्यांना अनेक अडथळे आले. नाही असं नाही. शेजारच्या राज्यांकडून अनेक वेळा खोडा घालण्याचा प्रयत्नही झाला; पण अडथळ्यांना भिऊन अडखळणे हे त्यांच्या पावलांना पसंतच नाही. म्हणून मंत्रिमंडळात असताना त्यांनी यावर सभागृहात आवाज उठवला. कारण काम कोणतंही असो, एकदा हातात घेतलं की सातत्याने त्याचा पाठपुरावा करून त्याचा शेवट केल्याशिवाय गप्प बसायचं नाही, हा त्यांचा स्वभाव. खरं तर राजकारणामध्ये नि:स्पृहपणे काम करताना एखाद्या माणसाला किती अडचणींचा सामना करावा लागतो, याचा अनुभव ताईंनी जवळून घेतला. 

 निर्भीडपणा आणि कणखरपणा अंगी असल्यामुळे ताईंनी मोठ्या निर्धाराने ‘राष्ट्रीय समविकास’सारख्या ग्रामीण विकास खात्याच्या महत्त्वाच्या योजना, तसंच शेतकऱ्यांचं आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठीच्या पाणलोट क्षेत्र विकास योजनांसारख्या अनेक योजना, या भागाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने करोडोंचा निधी देऊन यशस्वीपणे राबविल्या. किनवट तालुक्यातील सहस्रकुंड येथील जलविद्युत तथा सिंचन प्रकल्पाचे काम मार्गी लावले. या भागातल्या तृषार्त जमिनी सिंचनाखाली आल्या तर शेतकऱ्यांचं आर्थिक जीवनमान उंचावेल, याकरिता बऱ्याच वर्षांपासून बंद पडलेल्या अप्पर पैनगंगा प्रकल्पाला १८० कोटींचा भरीव निधी त्यांनी उपलब्ध करून दिला. प्रकल्पाचं पुनरुज्जीवन करून हदगाव-हिमायतनगर तालुक्याच्या काही भागांतली शेती सिंचनाखाली आणली. 

जलसंधारणाबरोबरच ताईंनी मतदारसंघांमध्ये रस्ते विकासालाही प्राधान्य दिलं. महत्त्वाकांक्षी पालखी मार्ग त्याचीच उपलब्धी आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत करोडोंचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे वाडी, तांड्यासारख्या दुर्गम भागापर्यंत रस्तेविकास झाला. शेती आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठीच्या राष्ट्रीय फलोत्पादन योजना असतील, स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना असेल, नाही तर संपूर्ण स्वच्छता अभियान असेल, या महत्त्वाकांक्षी योजनांबरोबर महिला म्हणून बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या महिलांच्या सक्षमीकरणाची चळवळ त्यांनी गतिमान केली. महाराष्ट्रात यश मिळालेल्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान आणि रोजगार हमी योजना या महत्त्वाकांक्षी योजना त्यांनी राष्ट्रीय रोजगार हमी योजना व निर्मल ग्राम योजना या नावाने चळवळ म्हणून संपूर्ण देशात राबविल्या. 

जवळपास अर्धशतकाचा काळ राजकारणात काम करताना, विविध जबाबदाऱ्या सांभाळताना सूर्यकांता पाटील यांनी अनेकदा चढ-उतार पाहिले. जय-पराजय अनुभवले; पण कधी विजयाचा उन्माद नाही, ना मनामध्ये पराभवाचे शल्य आहे. ना धन, प्रतिष्ठेची लालसा आहे, ना पदाचा दुरभिमान आहे. जे करायचं ते निर्मोही मनानं अन समर्पित वृत्तीनं करायचं. मग सत्तेत असो की नसोत, हे त्यांचं वैशिष्ट्य. अजूनही शेतकरी, महिलांचे प्रश्न, कामगार, उपेक्षित, वंचित, दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी त्यांचा लोकलढा सुरूच असतो. 

हल्लीच्या काळात सत्तारूढ झाल्यावर किंवा सत्तेच्या जवळ असलेली बरीच माणसं वेगवेगळ्या संस्था काढून, मोठे उद्योग उभारून अल्पावधीतच ‘सम्राट’ होताना पाहायला मिळतात; पण ताई याला सपशेल अपवाद आहेत. गोरगरिबांच्या मुला-मुलींना शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी हिमायतनगरसारख्या ग्रामीण भागात मराठवाडा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी हुतात्मा जयवंतराव पाटील यांच्या नावाने शाळा व वरिष्ठ महाविद्यालयाची उभारणी करून, पदवी व पदव्युत्तर शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. 

विकासापासून कोसो दूर असलेल्या आपल्या भागाचं मागासलेपण दूर व्हावं आणि शेतशिवार समृद्ध व्हावं, या प्रामाणिक हेतूने ताईंनी प्रतिकूल परिस्थितीत मोठ्या हिमतीनं साखर कारखान्याची उभारणी केली; परंतु आपल्या भागाचं मागासलेपण दूर करू पाहणाऱ्या नेत्याला एकटं पाडण्याचे, अडथळे आणण्याचे प्रयत्न सातत्यानं पाठलाग करीत असताना जनतेने मात्र नेहमीच ताईंची पाठराखण केली. 

इथल्या लोकांना निरामय आरोग्यदायी जीवन जगता यावं, याकरिता ताईंनी जगप्रसिद्ध योगी रामदेवबाबा यांना २००६ साली आमंत्रित करून नांदेड येथे पहिल्यांदा लोकांसाठी भव्य असे मोफत योगशिबिर घेतले. यावरून त्यांच्यातल्या समाजसेवी वृत्तीची प्रचिती येते. 

मंत्री म्हणून त्या मोठ्या होत्याच; पण सत्तेच्या सिंहासनावर बसल्यानंतर पदाचा कुठलाही अभिनिवेश न बाळगता, जनतेनं दिलेल्या सत्तेचा निःस्वार्थपणे लोकहितासाठी वापर करणाऱ्या कर्तृत्ववान लोकनेत्या म्हणून सूर्यकांताताईंचं मोठेपण नक्कीच आभाळाएवढं आहे. 

जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना ।
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना।

या जिगरबाज मानिनीने आव्हानांना संधी समजून पदोपदी संघर्ष झेलला. ऊर्जेचा अखंड झरा असलेल्या या कर्मयोगिनीला वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा!
 
हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती ।
सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी।।

- प्रा. डॉ. सूर्यप्रकाश जाधव
संपर्क : ९६२३८ ३६३५६

(लेखक हिमायतनगरमधील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयात कार्यरत आहेत.) 

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search