Next
ठाण्यात महिलांसाठी आयोजित विशेष कार्यक्रमाला प्रतिसाद
प्रेस रिलीज
Tuesday, May 28, 2019 | 01:09 PM
15 0 0
Share this article:


ठाणे : येथील प्रा. डॉ. सुनील कर्वे यांनी महिलांसाठी ‘लहानपणात पुन्हा रमूया... विसरलेले खेळ पुन्हा खेळूया’ हा उपक्रम २५ मे २०१९ रोजी ठाण्यातील गावंडबाग येथील नानानानी पार्कमध्ये राबविला होता. या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 

डॉ. कर्वे विविध वयोगटांतील मुला-मुलींसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी हास्ययोग, कॉफी आणि बरेच काही (गप्पांचा कार्यक्रम), मला भावलेल्या कविता, स्मृतीआड गेलेल्या खेळांची उजळणी, उन्हाळी शिबिर असे कार्यक्रम घेत असतात. दररोजच्या रगाड्यात अडकलेल्या महिलांना एकदिवस आपल्या बालपणीच्या काळात रमता यावे आणि विस्मृतीत गेलेल्या खेळांची उजळणी व्हावी या हेतूने डॉ. कर्वे यांनी या कार्यक्रमाची संकल्पना आखली होती. गेल्या तीन वर्षांपासून ते मुला-मुलींसाठी असा उपक्रम राबवत असून, यंदा प्रथमच महिलांसाठी अशा प्रकारचा उपक्रम राबवण्यात आला. 


सर्व महिलांनी मिळून आपडीथापडी, शिवाजी म्हणतो, वाघोबा किती वाजले, दगड का माती, फुगडी, ठिक्कर, काचपाणी, विषामृत, आंधळी कोशिंबीर, खाम खाम खांबोली, कानगोष्टी, आईचं पत्र हरवलं, कांदाफोडी, टिपी टिपी टॉप टॉप, चिमणी भुर्रर्र-कावळा भुर्रर्र, तळ्यात-मळ्यात, उभा खो-खो, संत्रा-लिंबू, रुमालपाणी अशा अनेक जुन्या खेळांची मज्जा पुन्हा एकदा लुटली. 

या प्रसंगी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना डॉ. कर्वे म्हणाले, ‘तुमच्या मुला-मुलींनाही असे पारंपरिक खेळ शिकवा आणि त्यांना ते खेळायला लावा. त्यामुळे कोणताही दुष्परिणाम आणि खर्च न होता त्यांचा बौद्धिक, शारीरिक आणि मानसिक विकास सुलभ होईल. हल्ली बरेचसे पालक आपल्या पाल्याने बाहेर कुठे खेळायला जाऊ नये आणि घरातच बसून काय ते खेळावे म्हणून त्याला घरात खेळता येतील, असे खेळ आणून देतात. त्यातच मोबाइलमधील गेम्सची भर. मुले बाहेर खेळायला गेली, तर त्याला लागेल,   मातीत हात खराब होतील वगैरे वगैरे. त्यातूनही एखादा पालक मातीत खेळायला सोडत असेल, तर त्याला ढीगभर नियम असतात. चपलाच घालून जा, जास्त वेळ मातीत खेळू नकोस, आल्यावर हात पाय साबणाने धुवा... अशी यादी चालूच राहते.’ 

पालकांची ही अति काळजी मुलांमधील मैदानी गुणांना मारक ठरते आहे. सध्याच्या मुलांना पालक कोणत्या न कोणत्यातरी शिकवणीमध्ये सारखच गुंतवून ठेवतात. त्यामुळे त्यांना असे पारंपरिक खेळ खेळाला वेळच मिळत नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांत अशा खेळांकडे दुर्लक्ष झाल्याची खंत डॉ. कर्वे यांनी व्यक्त केली. 


पालकांनी मुलांबरोबर लहान होऊन हे खेळ खेळणे गरजेचे असल्याचे सांगत हल्ली आपण पाहतो विभक्त कुटुंब पद्धतीमुळे कौटुंबिक दरी वाढते आहे. कलह, स्ट्रेस, टेंशनही वाढत आहे. यावर रामबाण उपाय म्हणजे असे खेळ घरी कुटुंबासमवेत पण खेळण्याचा सल्लाही डॉ. कर्वे यांनी या वेळी दिला. 

या उपक्रमाची सांगता डॉ. व. पु. काळेंच्या कविता वाचनाने केली. एक दिवस बालपणात हरवलेल्या या महिलांनी हा उपक्रम राबविल्याबद्दल प्रा. डॉ. कर्वे यांचे आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 37 Days ago
Good activity . Entryertainmemt . Relaxation, socialisation . Other cities --- take up this activity . It is not expensive , can have a small start .
0
0

Select Language
Share Link
 
Search