Next
प्रवीण दवणे, भारतकुमार राऊत
BOI
Friday, April 06, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

‘मी म्हणाले अनावर होऊन मुस्सळधार पावसानं मला पिऊन घ्यावं... तुला वाटलं, मी पावसाविषयी बोलते आहे.. ’ असं लिहिणारे संवेदनशील कवी प्रवीण दवणे आणि सुप्रसिद्ध पत्रकार व लेखक भारतकुमार राऊत यांचा सहा एप्रिल हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी...
......
प्रवीण दवणे 

सहा एप्रिल १९५६ रोजी जन्मलेले प्रवीण दवणे हे कवी, गीतकार आणि ललित लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. अत्यंत सहज संवाद साधत, समोरच्या श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेत बोलण्याची उत्तम वक्तृत्वाची हातोटी त्यांना लाभली आहे. त्यांची अनेक भाषणं ही रसरशीत, उत्साही आणि समोरच्याला आनंद देता देता स्फूर्ती देणारी असतात याचा अनुभव महाराष्ट्रात अनेकांनी घेतला आहे. 

सध्याच्या धावपळीच्या आणि सोशल मीडियाने आयुष्य व्यापून, तरुणाई खोट्या आदर्शामागे जाण्याचा धोका निर्माण होण्याच्या काळात, जीवनाकडे सकारात्मकतेने बघण्यासाठी ते तरुणांना आवाहन करतात, ‘हे बघायला हवं, की जीवन न जगताच आपण जीवन जगतो आहोत का? आपल्या जीवनात जीवन येतंय का? आपल्या जीवनात संजीवन उमटतंय का? आपल्या जीवनाला अमृततत्त्वाचा साक्षात्कार होतोय का? हे न जाणता आपण पुढे जाणार असू, तर मुळात आपण ‘माणूस’ आहोत का हे समजून घ्यायची गरज भासेल.
‘आयुष्य जाणले मी’ या कवितेत ते म्हणतात -

डोळे मिटून जेव्हा, मज लागले दिसू
अश्रू फितूर माझे, मज लागले हसू
गर्दीच सांगते ही, आहेस एकटा
एकांत डोहकाठी, मन लागले बसू
ओलांडली तरूने, रक्तातली तृषा
ध्यानस्थ अंकुरांना, घन लागले दिसू
शब्दातली कवाडे, हलकेच बंद का?
मौनात अर्थवाही, स्वर लागला वसू
अपुलीच स्पंदनेही, होताच पाठमोरी
आयुष्य जाणले मी, तेव्हा तसू...तसू... 

सावर रे (चार भाग), अजिंक्य मी, अत्तराचे दिवस, आडवाटेच्या कविता, आनंदाचे निमित्त, आर्ताचे लेणे, गाणे गा रे पावसा, दत्ताची पालखी, स्पर्शगंध, हे शहरा, हार्दिक वाचकपत्रांच्या सोबतीने केलेली शब्दयात्रा, रूप अरूप, मोठे लोक छोटे होते तेव्हा, मनातल्या घरात, मनाच्या मध्यरात्री भूमीचे मार्दव, जिवाचे आकाश, जिव्हाळ्याचे आरसे, अशी त्यांची ८०हून अधिक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

त्यांना शांता शेळके सरस्वती पुरस्कार, महाराष्ट्र राज्य पुरस्कार, ठाणे ग्रंथालयाचा रेगे पुरस्कार अशा पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. 

(प्रवीण दवणे यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
.........

भारतकुमार राऊत

सहा एप्रिल १९५३ रोजी मुंबईत जन्मलेले भारतकुमार राऊत हे पत्रकार आणि ललित लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी कॉलेजमध्ये असतानाच वृत्तपत्रीय कारकिर्दीला सुरुवात केली आणि पुढे मुंबई सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, दी इव्हिनिंग न्यूज ऑफ इंडिया, फ्री प्रेस जर्नल, दी इंडियन पोस्ट, दी इंडिपेंडंट, दी मेट्रोपोलिस ऑन सॅटर्डे, दी पायोनियर अशा मराठी आणि इंग्लिश वर्तमानपत्रांमध्ये अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या. 

मुंबई दूरदर्शनवरही त्यांनी काम केलं होतं. तसंच ‘झी न्यूज’च्या स्थापनेपासून त्यांनी झी समूहात काम केलं होतं. १९८७-८८मधल्या काळात ते मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष होते. 

अंधारातील एक प्रकाश, शिवसेना : हार आणि प्रहार, स्मरण, अशी ही मुंबई, गीता: आनंद यात्रा -अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

त्यांना राम मनोहर त्रिपाठी पत्रकार पुरस्कार, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा कै. बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता पुरस्कार, जायट्स इंटरनॅशनलचा जर्नालिस्ट ऑफ दी इयर पुरस्कार, मुंबई मराठी पत्रकार संघाचा पुढारीकार ग. गो. जाधव स्मृती पत्रकारिता पुरस्कार, स. मा. गर्गे पत्रकारिता पुरस्कार, ‘असोसिएशन ऑफ बिझिनेस कम्युनिकेटर्स’चा बेस्ट बिझनेस जर्नालिस्ट पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. 

(भारतकुमार राऊत यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link