Next
सआदत हसन मंटो, जे. कृष्णमूर्ती
BOI
Friday, May 11 | 03:45 AM
15 0 0
Share this story

समाजातल्या अनेक घटनांचं जळजळीत सत्य रोखठोकपणे मांडणारा सआदत हसन मंटो या भारतात जन्मलेल्या, पण पाकमध्ये आयुष्य घालवलेल्या उर्दूतील ख्यातनाम लेखकाचा आणि धर्म आणि जातपात यामुळेच जगभर युद्ध होऊन विनाश होतो आहे या धारणेपोटी मानवी जीवनात असणारं दु:ख, पिडा, त्रास, मनःस्ताप, संताप आणि भय यावर मात करून मानवी जीवन सुखी कसं करता येईल याविषयी तळमळीनं बोलणाऱ्या जे. कृष्णमूर्ती यांचा ११ मे हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याचा अल्प परिचय...
....... 
११ मे १९१२ रोजी भारतात लुधियानामध्ये जन्मलेला, पण नंतर पाकिस्तानी नागरिकत्व घेतलेला सआदत हसन मंटो हा अत्यंत संवेदनशील आणि प्रतिभाशाली कथाकार, कादंबरीकार, नाटककार आणि निबंधकार म्हणून प्रसिद्ध होता. मानवी जीवनातलं उघडंनागडं सत्य आपल्या कथांमधून मांडून वाचकांच्या जाणिवांना गदागदा हलवण्याचं सामर्थ्य त्याच्या लेखणीत होतं. त्याच्या लेखनावर अनेकदा खटलेही भरले गेले.

भारत-पाकिस्तान फाळणीने त्याला प्रचंड व्यथित केलं होतं. त्याची भळभळती जखमच होती ती! त्यानंतरच्या उसळलेल्या दंगली, हिंसा, जाळपोळ आणि धर्मांधतेने त्याला व्यथित केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर त्याने कथा लिहून आपल्या व्यथा मांडल्या होत्या. समाजातल्या अनेक घटनांचं जळजळीत सत्य त्याने रोखठोकपणे मांडलं होतं. त्याच्या काही कथांमधून सेक्सचंही चित्रण होतं आणि ते अश्लील वाटत नव्हतं. 

त्याने सिनेपत्रकार म्हणूनही काम केलं होतं. अनेक सिनेमांच्या कथा, पटकथा, संवादलेखन त्याने केलं होतं. रुढी-परंपरा तोडून, अन्याय आणि शोषणाविरुद्ध पोटतिडकीनं आणि बेधडकपणे लिहिणं ही त्याची खासियत होती. 

मंटो के अफसाने, टोबा टेकसिंह, बेत्तेर फ्रुट्स, धुआँ, अफसाने और ड्रामे, लज्जत-ए-संग, स्याह हाशिए, बादशाहत का खात्मा, खाली बोतलें, लाउड स्पीकर, गंजे फरिश्ते, याज़िद, पर्दे के पीछे, सड़क के किनारे, इजाज़त, असं त्याचं लेखन प्रसिद्ध आहे. 

१८ जानेवारी १९५५ रोजी त्याचा लाहोरमध्ये मृत्यू झाला. 

(सआदत हसन मंटोची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.

...........

जे. कृष्णमूर्ती

११ मे १८९५ रोजी मदनापल्लमध्ये (आंध्रप्रदेश) जन्मलेले जिद्दु उर्फ जे. कृष्णमूर्ती हे १९व्या शतकातले भारतातलेच नव्हे तर जगातले महान तत्त्वज्ञ आणि लेखक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या वयाच्या १४व्या वर्षी, थिओसॉफिकल सोसायटीच्या अॅनी बेझंट यांनी त्यांना दत्तक घेतलं होतं. कृष्णमूर्तींचा मानसशास्त्र, मनःशक्ती, मानवी नाती यासंबंधी गाढा अभ्यास होता. जगभर प्रवास करून त्यांनी कुठल्याही धर्माला किंवा विचारधरेला बांधून न घेता, केवळ मानवाच्या उत्थानासाठी व्याख्यानं दिली. धर्म आणि जातपात यामुळेच जगभर युद्ध होऊन विनाश होतो आहे हीच त्यांची धारणा होती. 

मानवी जीवनात असणारं दु:ख, पिडा, त्रास, मनःस्ताप, संताप आणि भय यावर मात करून मानवी जीवन सुखी कसं करता येईल ही त्यांची तळमळ त्यांच्या भाषणातून आणि लेखनातून दिसून येते. धर्म आणि जातीच्या भिंती नष्ट करा हे ते आपल्या भाषणांतून आवर्जून सांगत. त्यांची शिकवण त्यामुळेच वैश्विक आणि सार्वकालिक ठरली आहे. 

आपल्या भाषणांतून आणि शिकवणीतून त्यांनी गुंतागुंतीच्या मानवी जाणिवांचा आणि नेणीवांचा वेध घेतला. वेळोवेळी अनेक थोर तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ आणि संशोधकांशी चर्चा करून त्यांनी भौतिक आणि अधिभौतिकाच्या नात्यांवर प्रकाश टाकण्याचं महान कार्य केलं.  
 
बिगिनीन्ग्स ऑफ लर्निंग, कॉमेंटरीज ऑन लिव्हिंग, द फर्स्ट अॅन्ड लास्ट फ्रीडम, फ्युचर इज नाऊ, द इम्पॉसिबल क्वेस्चन, लाईफ अहेड, द फ्लाईट ऑफ द ईगल, धिस मॅटर ऑफ कल्चर, नेटवर्क ऑफ थॉट, यू आर द वर्ल्ड, द ओन्ली रीव्हॉल्युशन - सारखं त्यांचं लेखन अफाट वाचकप्रिय आहे.

१७ फेब्रुवारी १९८६ रोजी त्यांचं कॅलिफोर्नियामध्ये निधन झालं.

(जे. कृष्णमूर्ती यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link