Next
तिच्या जिद्दीपुढे मृत्यूही हरला
५० वर्षीय महिलेचा ‘ग्लिओब्लास्टोमा’ या गंभीर कर्करोगाशी यशस्वी लढा
BOI
Thursday, October 25, 2018 | 03:59 PM
15 0 0
Share this article:

पुणे :  सध्या कर्करोगाशी धीरोदात्तपणे लढा देत असलेल्या अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या सकारात्मक वृत्तीचे कौतुक केले जात आहे. तशीच जिद्द दाखवून सोलापूरच्या पन्नास वर्षीय महिलेने ‘ग्लिओब्लास्टोमा’ या दुर्मीळ प्रकारच्या कर्करोगाला हरवले आहे. रुबी हॉल क्लिनिकमध्ये पाच वर्षे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आता त्या पूर्ण बऱ्या झाल्या आहेत. 

सोलापूरमध्ये राहत असलेल्या या महिलेला ‘ग्लिओब्लास्टोमा’ या सर्वांत आक्रमक मानल्या जाणाऱ्या कर्करोगाने गाठले. ‘ग्लिओब्लास्टोमा मल्टिफॉर्म (जीबीएम) हा सर्वांत गंभीर कर्करोगांपैकी मानला जातो. ‘ग्लिओब्लास्टोमा मल्टिफॉर्म’ने ग्रस्त असलेल्या रुग्णांचे जिवंत राहण्याचे प्रमाण खूप कमी आहे. याची निर्मिती मेंदूतच होऊन फक्त २५ टक्के रुग्ण पहिली दीड-दोन वर्षे जगतात . फक्त पाच टक्के रुग्ण पाच वर्षांहून अधिक काळ जिवंत राहतात. वेळीच उपचार केले नाहीत, तर रुग्ण काही आठवड्यांत किंवा महिन्यांतच दगावू शकतो. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतरची चिकित्सा व उपचारदेखील तितकेच महत्त्वाचे आहेत. हा एक दुर्मीळ प्रकारचा कर्करोग असून, त्याची कारणे अजून तितकी स्पष्ट झालेली नाहीत. त्यावर अभ्यास सुरू आहे. 

याविषयी बोलताना रुबी हॉल क्लिनिकमधील कन्सल्टंट फिजिशियन मिनिष जैन म्हणाले, ‘ही महिला अपस्माराने ग्रस्त होती. २०१४मध्ये करण्यात आलेल्या तपासण्यांदरम्यान तिला ब्रेन ट्युमर असल्याचे लक्षात आले. त्वरितच सोलापूर येथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यानंतर त्या उपचारांसाठी आमच्याकडे आल्या, तेव्हा त्यांना सतत उलट्या, डोकेदुखी असा त्रास होत होता, उभे राहणेही त्यांना शक्य होत नव्हते. त्यानंतर त्यांच्यावर रेडिएशनद्वारे उपचार सुरू झाले. त्यांना औषधे देण्यात आली. त्यांची आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्याने उपचारांसाठी पैशांची व्यवस्था करणे त्यांना अवघड होते. आम्ही आर्थिक भार पेलून, त्यांच्या औषधोपचारांवर आमचे लक्ष केंद्रित केले. दर महिना-दोन महिन्यांनी त्यांना तपासणीसाठी बोलावले. त्याही न कंटाळता येत असत. औषधोपचार न कुरकुरता घेत असत. या कर्करोगाला हरवण्याचा चंग त्यांनी बांधला होता. त्यांची ही जिद्द आम्हालाही थक्क करणारी होती. आम्हीही दर वेळेस नव्या हुरुपाने त्यांच्यावर उपचार करत राहिलो. आज या सगळ्या कष्टाचे फळ दिसत आहे. आता त्यांचा ट्युमर जवळजवळ संपूर्ण नाहीसा झाल्याचे एमआरआय स्कॅनमध्ये निष्पन्न झाले आहे.’ 

‘त्यांच्या चिकाटीमुळे, जिद्दीमुळे हे यश दिसत आहे. अत्यंत दुर्मीळ, गंभीर अशा कर्करोगाशी चिवटपणे झुंज देण्याची त्यांची वृत्ती इतरांनाही प्रेरणा देणारी आहे. त्यांच्या जिद्दीला सलाम! त्यांच्यामुळेच आम्ही दुर्मीळ कर्करोगावर यशस्वी उपचार करू शकलो,’ असेही डॉ. जैन यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search