Next
डॉ. आंबेडकर कॉलेजमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
प्रेस रिलीज
Monday, January 07 | 06:05 PM
15 0 0
Share this story



औंध : येथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन व्याख्यान,  काव्यवाचन स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, मराठी नाट्य प्रयोगाचे दर्शन,  लेखनविषयक कार्यशाळा आणि मला आवडलेल्या पुस्तकावरील मनोगत अशा कार्यक्रमांचा समावेश आहे.



मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त महाविद्यालयात ‘मला आवडलेल्या पुस्तकावरील मनोगत’ या विषयावर कार्यक्रम नुकताच झाला. यामध्ये विविध वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. मोनाली भालवणकर हिने बाबूराव बागूल यांच्या कादंबरीवर मनोगत व्यक्त केले. चंद्रकांत सोनवणे याने प्रकाश आमटे यांच्या ‘रानवाटा’ या  पुस्तकावर मनोगत व्यक्त केले. सुदेश भालेराव याने दया पवार यांच्या ‘बलुतं’ या आत्मकथनावर, राहुल शेळकेने ‘एका कोळियाने’ या पुस्तकावर, रोहित पोटे याने अण्णाभाऊ साठे यांच्या ‘वारणेचा वाघ’ या कादंबरीवर मनोगत व्यक्त केले.



या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मराठी विभागप्रमुख डॉ. संजय नगरकर म्हणाले, ‘मस्तक  घडविण्याचे कार्य पुस्तके करतात. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा, तसेच विद्यार्थ्यांमध्ये पुस्तक वाचण्याची आवड निर्माण होऊन त्यांनी साहित्य निर्मिती करावी या हेतूने हा उपक्रम घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचनाबरोबर समाज आणि माणूस वाचावा.’  

कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे म्हणाल्या, ‘चांगले आयुष्य कसे जगायचे हे पुस्तकांमुळे समजते. त्यामुळे जो विद्यार्थी अधिकाधिक पुस्तके वाचतो, तो अधिकाधिक समृद्ध आणि ज्ञानी होतो. त्यामुळे महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाशी मैत्री करून अधिकाधिक पुस्तके वाचावीत’



इंग्रजी विभागप्रमुख डॉ. सविता पाटील यांनी विद्यार्थ्यांनी वाचन करता करता मनन आणि चिंतनाच्या माध्यमातून ‘क्रिएटिव्ह रायटिंग’ करण्याचा सल्ला दिला. या वेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ, हर्षकुमार घळके आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. प्रज्ञा शिंदे हिने सूत्रसंचालन केले. डॉ. अतुल चौरे यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link