Next
देवकी पंडित आणि आरती अंकलीकर यांची शब्दमैफल
‘सवाई अंतरंग’मध्ये दिला आठवणींना उजाळा
BOI
Friday, December 14, 2018 | 03:57 PM
15 0 0
Share this story

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवातील ‘अंतरंग’ कार्यक्रमामध्ये गायिका देवकी पंडित आणि आरती अंकलीकर-टिकेकर यांनी संवाद साधला.

पुणे : भारतीय शास्त्रीय संगीताचे सौंदर्य, ते आत्मसात करण्यासाठी केलेली मेहनत आणि मनावर कोरल्या गेलेल्या गुरुंच्या आठवणी यांनी ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’तील ‘अंतरंग’ या कार्यक्रमामध्ये एक सुरेल शब्दमैफल हळूहळू उलगडत गेली. निमित्त होते, जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांनी आग्रा-जयपूर घराण्याच्या गायिका देवकी पंडित यांच्याशी मारलेल्या गप्पा.

‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’मध्ये ख्यातनाम कलाकारांबरोबरचा संवादात्मक कार्यक्रम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘अंतरंग’ या कार्यक्रमामध्ये महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवारी, आरती अंकलीकर या देवकी पंडीत यांची मुलाखत घेणार होत्या; पण प्रत्यक्षात दोघींनी एकमेकांशी दिलखुलास गप्पा मारल्या आणि श्रोत्यांना सुरेल शब्द मैफिलीचा अनुभव दिला. शिवाजीनगर येथील सवाई गंधर्व स्मारकामध्ये सकाळी झालेल्या या कार्यक्रमाला आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, गायक आनंद भाटे उपस्थित होते.

अंकलीकर म्हणाल्या, ‘भारतीय शास्त्रीय संगीत म्हणजे आपला आवाज नव्हे; तर मन आणि मेंदू गात असल्यासारखे आहे. हे जगामध्ये अलौकिक आहे. आपले गाणे हळुवारपणे उलगडणारे असते. रागसंगीतामध्ये आवाजापेक्षा विचार महत्त्वाचा असतो.’

लहानपणापासून मैत्रिणी असलेल्या, या दोन्हीही गायिका अगोदर पंडित वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे आणि पुढे किशोरीताई आमोणकर यांच्याकडे शिकल्या. एकमेकींच्या फिरक्या घेत, पंडित वसंतराव कुलकर्णी आणि किशोरीताई यांच्याविषयीच्या अनेक आठवणी दोघींनी सांगितल्या. माणिक वर्मा यांचा साधेपणा, पं. जितेंद्र अभिषेकी, बबनराव हळदणकर, मोगुबाई कुर्डीकर, वीणाताई सहस्रबुद्धे, आशा भासले, लता मंगेशकर आणि पंडीत भीमसेन जोशी अशा अनेक महान गायकांच्या आठवणींना दोघींनी उजाळा दिला.

देवकी पंडित म्हणाल्या, ‘स्वतःचे स्वतः मिळवले पाहिजे, हे वसंतरावांनी शिकवले. एकूण विचार करायची सवय त्यांनी लावली. गायकी शिकायच्या अगोदरची मनाची आणि बुद्धीची तयारी त्यांनी करवून घेतली.’ 

आपल्या गाण्यावर पं. अभिषेकी आणि किशोरीताई यांचा प्रभाव असल्याचे देवकी पंडीत यांनी सांगितले. त्या म्हणाल्या,‘अभिषेकी यांनी स्वतःचे संगीत तयार करायला मदत केली. त्यांनी संगीताचे सौंदर्यशास्त्र उलगडून दाखवले. किशोरीताई यांची शिस्त होती, पण त्यांनी खूप काही दिले. त्या म्हणायच्या, की आवाज पाण्यासारखा असावा.’

आरती अंकलीकर म्हणाल्या, किशोरीताई म्हणजे गाणे देणाऱ्या गुरू आहेत. किशोरीताईंनी जयपूर घराण्याचे गाणे पचवून त्यातील भावतत्व घेऊन स्वतःचे गाणे, स्वतःचे घराणे निर्माण केले. त्यांचे गाणे आता तीन पिढ्या गायले जात आहे. त्यांनी राग व्हायला आणि दुसऱ्यांनाही राग करायला शिकवले. शरीर, मन, मेंदू, आत्मा यांचा विलक्षण संगम म्हणजे किशोरीताई यांचे गाणे. मन पोहोचेल, तिकडे आवाज पोहोचला पाहिजे, असे त्या म्हणत.’

या वेळी ‘षड्ज’ या कार्याक्रमात ‘जमुना के तीर’, हा अब्दुल करीम खान यांच्यावरील लघुपट दाखविण्यात आला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link