Next
‘गुड टच, बॅड टच उपक्रम राज्यभर राबविणार’
ग्रॅव्हिटस फाउंडेशन व रिफ्लेक्शन कौन्सिलिंग सेंटरतर्फे जागृती कार्यक्रम
प्रेस रिलीज
Wednesday, March 13, 2019 | 03:59 PM
15 0 0
Share this article:पुणे : ‘बाललैंगिक अत्याचार थांबवण्यासाठी मुलांना स्पर्शज्ञान असणे महत्त्वाचे आहे. ग्रॅव्हिटस फाउंडेशनने (युएसके) सुरू केलेला ‘गुड टच, बॅड टच’ उपक्रम अतिशय उपयुक्त आहे. मुलांना चांगल्या-वाईट स्पर्शाचे ज्ञान देऊन होणाऱ्या अन्यायाविरोधात मोकळेपणाने बोलता यावे व त्यांच्यात निर्भयता यावी, यासाठी हा उपक्रम राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यासाठी प्रयत्नशील आहे,’ असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी केले.

ग्रॅव्हिटस फाउंडेशन (यूएसके) आणि रिफ्लेक्शन कौन्सिलिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने भोसरी-लांडेवाडी येथील महात्मा फुले माध्यमिक विद्यालयात शालेय मुला-मुलींसाठी आयोजित केलेल्या ‘गुड टच, बॅड टच’ या जाणीव जागृती उपक्रमावेळी ते बोलत होते. या प्रसंगी ग्रॅव्हिटस फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे, बालहक्क आयोगाच्या सदस्या आसमा शेख, महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नीलकंठ लोंढे, सचिव अनिल लोंढे, मुख्याध्यापिका श्रीमती माळी, रिफ्लेक्शन सेंटरच्या आशा खेडकर यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

घुगे म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी, चांगला-वाईट स्पर्श कसा ओळखावा, तसेच आपल्यावर अतिप्रसंग झाल्यास त्याला प्रत्युत्तर कसे द्यावे, याविषयी अतिशय सहजतेने या उपक्रमातून जागृती केली जात आहे. अलीकडच्या काळात मोबाइल, इंटरनेटचा वापर लहान वयातील मुलेही करत आहेत; परंतु त्याचा वापर विधायक गोष्टींसाठी करावा. पालकांनी मुलांचे चांगले मित्र बनून त्यांच्याशी मोकळेपणाने बोलावे. मुलांतील अबोला दूर करण्यासाठी शिक्षक-पालकांनी विद्यार्थ्यांना आपलेपणाची भावना द्यावी.’

काकडे म्हणाल्या, ‘मुला-मुलींनी चांगला वाईट स्पर्श ओळखून वेळीच त्यावर बोलले पाहिजे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, ७३ कोटी मुले, तर १५० कोटी मुली लैंगिक अत्याचाराला बळी पडल्याचे समोर आले आहे. नात्यातील, ओळखीच्या व्यक्तीकडून असे प्रकार होतात. मुले आणि पालक यांच्यातील संवाद वाढल्यास अशा घटनांना आळा बसेल. हा संवाद वाढविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम चालू केला आहे. गेल्या दीड वर्षात पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील सरकारी व खासगी ६५० शाळांतील तीन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचवल्याचे समाधान आहे.’

शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनीही या उपक्रमाचा फायदा झाला असून, चुकीच्या गोष्टी समजल्या. मुले बोलती झाली, असे अभिप्राय दिले. लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी चाइल्ड हेल्पलाइन नंबर १०९८ असल्याची माहिती मुलांमध्ये पोहोचली आहे. शिक्षक-विद्यार्थी-पालक यांच्यात संवाद वाढला आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search