Next
महाश्रमदानात सहभागी होण्याचे आमिर खानचे आवाहन
प्रेस रिलीज
Friday, April 20 | 05:13 PM
15 0 0
Share this story

महाश्रमदान मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करणारे पोस्टर आमिर खानच्या हस्ते 'सिम्बायोसिस' मध्ये लावण्यात आले. या वेळी (डावीकडून) संस्थेच्या प्रिन्सिपल डायरेक्टर डॉ. विद्या येरवडेकर, आमिर खान व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार

पुणे :  दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी  एक मे रोजी होणाऱ्या महाश्रमदानात सहभागी होण्याचे आवाहन पाणी फाउंडेशनचे संस्थापक आणि अभिनेता आमिर खान याने शुक्रवारी (दि.२०) येथे केले. सिम्बायोसिस विद्यापीठात आयोजित एका विशेष कार्यक्रमात त्याने विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना हे आवाहन केले. या संदर्भातील एक भित्तीपत्रकही त्याने येथे लावले.  

या वेळी सिम्बायोसिस’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, डॉ. विद्या येरवडेकर, पाणी फाउंडेशनचे सीईओ सत्यजित भटकळ, अभिनेता गिरीश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. 

या वेळी पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधताना, आगामी पाच वर्षात पाणी फाउंडेशनची गरज उरू नये अशी अपेक्षा व्यक्त करत, त्याने महाराष्ट्रदिनी सर्वांनी आपल्या जवळच्या गावात श्रमदान करावे, असे आवाहन केले. 

‘राज्यातील ७५ तालुक्यांमधील गावांमध्ये  ही महाश्रमदान मोहीम राबवण्यात येणार आहे. सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा श्रमदान करण्याची संधी उपलब्ध आहे’, असेही त्याने नमूद केले. ‘गेल्या तीन आठवड्यांमध्ये जवळपास एक लाख लोकांनी ‘जलमित्र’ म्हणून नोंदणी केली आहे. एक मे रोजी गावात येण्यासाठी वेळ नसेल, तर आर्थिक रूपाने किंवा गावकऱ्यांच्या काही कामांमध्ये मदत करू शकता’, असेही आमिर खान याने या वेळी सांगितले. 

‘सत्यमेव जयते’ कार्यक्रम करत असताना राज्यातील गंभीर समस्या सोडविण्यासाठी काहीतरी केले पाहिजे असा विचार पुढे आला आणि त्यातून ‘महाराष्ट्र आणि पाणी’ या वर काम करण्याचे निश्चित झाले. त्यातूनच पाणी फाउंडेशनची स्थापना झाली. ही मूळ संकल्पना सत्यजित भटकळ यांची आहे. गेल्या तीन वर्षात लाखो लोक याच्याशी जोडले गेले आहेत. गेल्या दोन वर्षात एक हजार ५०० गावांनी सहभाग घेतला आणि दहा हजार कोटी लिटर्स पाण्याचा साठा झाला. गावातील लोकांचे , विशेषतः महिलांचे जीवनमान यामुळे बदलले आहे. हा अनुभव खूप प्रेरणादायी आणि समाधान देणारा आहे’, असे त्याने स्पष्ट केले. 

तो पुढे म्हणाला, ‘महाराष्ट्राचा विस्तार खूप मोठा आहे. त्यामुळे कोणी एकाने काम करून ते होणार नाही. हे लक्षात घेऊन आम्ही विकेंद्रीकरण पद्धतीने हे काम करायचे ठरवले. यासाठी गावागावात ही मोहीम सुरू केली.  लोकांच्या हे लक्षात आणून द्यायचे होते की, तुम्ही स्वतः तुमचे गाव दुष्काळमुक्त करू शकता. यात विज्ञान आहे, रॉकेट सायन्स नाही. पाणी फाउंडेशनतर्फे गावातील काही लोकांची निवड करून त्यांना साडे चार दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते. पाणलोट क्षेत्र कुठे, कसे तयार करायचे याचे सविस्तर माहिती दिली जाते. अर्थातच, या कामात सर्वांचा सहभाग होणे आवश्यक आहे. त्यासाठी ही महाश्रमदान मोहीम आखण्यात आली आहे. यामुळे  शहरी भागातील लोकांना ग्रामीण भागातील समस्या जाणून घेता येतील, शहरी आणि ग्रामीण भागातील दरी कमी होईल, त्यांच्यामध्ये सलोख्याचे नाते निर्माण होईल. या अपेक्षेने ‘जलमित्र’ योजना राबविण्यात येत आहे. त्यात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी आम्ही महाविद्यालयांना आवाहन करत आहोत. त्याकरता सिम्बायोसिसने येथे येण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे’. शासनाच्या सहकार्याचाही त्याने आवर्जून उल्लेख केला. 

या वेळी सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी शासन, पाणी फाउंडेशन आणि शिक्षणसंस्था असा त्रिकोण निर्माण करून त्याद्वारे ही चळवळ अधिक गतिमान करण्याची कल्पना मांडली. या कामात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना चार क्रेडीट गुण देण्याचेही त्यांनी जाहीर केले.  सत्यजित भटकळ यांनी या कामाची व्याप्ती स्पष्ट केली. 

आमिर खानने या वेळी  विद्यार्थ्यांशीही संवाद साधला, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत, त्यांना या महाश्रमदान मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. त्याला विद्यार्थ्यांनी तत्काळ उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link