Next
वाफाळे येथे ‘अंनिस’कडून प्रबोधन कार्यक्रम
BOI
Saturday, September 29, 2018 | 01:55 PM
15 0 0
Share this storyभिवंडी :
ठाण्याच्या भिवंडी तालुक्यातील वाफाळे येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने नुकताच प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. चमत्कारांची प्रात्यक्षिके दाखवून ‘अंनिस’ने प्रबोधन केले.

कॉम्रेड आत्माराम विशे यांच्या घरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘अंनिस’च्या ठाणे जिल्हाध्यक्ष सुरेखा भापकर यांनी ‘स्त्रिया आणि अंधश्रद्धा’ या विषयावर भाष्य केले. प्रामुख्याने स्त्रिया मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धांना बळी का पडतात, याची धार्मिक, सामाजिक अंगाने कारणमीमांसा त्यांनी मांडली. सावित्रीबाई फुले यांनी दाखविलेली स्त्री-शिक्षणाची वाट अंगीकारण्याचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. शिक्षण केवळ नोकऱ्या मिळविण्यापुरतेच मर्यादित नसून, आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय आपल्याला घेता येणे, स्वतंत्रपणे विचार करता येणे व मांडता येणे, स्वतंत्र व्यक्ती म्हणून अस्तित्वाची जाणीव व बरोबरीच्या दर्जाचे भान इथवर स्त्रियांचा प्रवास शिक्षणामुळे होऊ शकतो, हे त्यांनी पटवून दिले. 

‘आपण स्वतःला सावित्रीच्या लेकी म्हणवून घेत असू, तर अंधश्रद्धा झुगारून देऊन आपल्या अधिकारांसाठी पुरुषप्रधान संस्कृतीशी संघर्ष करण्याची तयारी आपण ठेवायला हवी,’ असे त्या म्हणाल्या. ‘नागरिकांच्या भयग्रस्त मानसिकतेचा फायदा घेण्यासाठी त्यांच्यासमोर काही भगत, बुवा, मांत्रिक चमत्कार सादर करतात व त्याद्वारे नागरिकांमध्ये भीती घालून त्यांच्याकडून धार्मिक विधींच्या नावाखाली पैसे उकळतात. मुळात या चमत्कारांमागे एक तर रासायनिक अभिक्रिया असते किंवा निव्वळ हातचलाखी तरी असते,’ असे सांगून किशोरी गरुड यांनी विविध चमत्कार दाखवून दिले. नागरिकांनी अशा प्रकारांना बळी न पडता त्यामागील कारणांचा शोध घेण्याचे आवाहन त्यांनी केले. 

दारूबंदी, स्त्री-भ्रूणहत्या, लिंबू-मिरची, ग्रहांचे खडे यावर आपल्या प्रबोधनात्मक गाण्यांच्या माध्यमातून शाहीर एस. एस. शिंदे यांनी परखड भाष्य केले. ‘सामान्यतः आपल्या भोवताली पदोपदी दिसणाऱ्या अंधश्रद्धा, व्यसने, स्त्रीला दिला जाणारा दुय्यम दर्जा यामुळे आपला समाज मागे पडत आहे. त्यातून बाहेर येण्यासाठी शिक्षण, आरोग्य यासोबत वैज्ञानिक दृष्टिकोन व आधुनिक लोकशाही मूल्यांची जोड आपल्या विचारांना लाभली पाहिजे,’ असे शाहीर शिंदे म्हणाले. आपल्या भोवताली व घराघरात दिसणाऱ्या स्त्री-पुरुष भेदभावाच्या मुद्द्यावर बोट ठेवून पुरुषप्रधान व्यवस्थेला निर्भयपणे प्रश्न विचारून, ‘स्त्री-पुरुष समानता हे मूल्य मानता तर प्रथम घरातील स्त्रीचा बरोबरीचा दर्जा मान्य करा. तिचे स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचे, मत व्यक्त करण्याचे, आवडी-निवडी जपण्याचे स्वातंत्र्य मान्य करा,’ असे मत दर्शना पालवी पाटील यांनी आपले मत मांडले. 

मिलिंद पाटील व कॉ. आत्माराम विशे यांनी वक्त्यांच्या मांडणीचा आशय व त्यांनी मांडलेल्या समतेच्या व वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विचाराचे महत्त्व विशद करून प्रमुख पाहुण्यांचे व उपस्थित ग्रामस्थांचे आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link