Next
‘सर्पदंश उपचारासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम व्हावी’
प्रेस रिलीज
Thursday, September 20, 2018 | 03:21 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘बदलत्या पीक पद्धतीमुळे शेतकरी, कामगार शेतात राहात आहेत. त्यातून मनुष्य आणि सापांचा संपर्क वाढला आहे. त्यामुळेच सर्पदंशाचे प्रमाणही वाढले आहे. सर्पदंश हा आता ‘सीझनल’ राहिला नसून, तो कधीही होऊ शकतो. त्यामुळे डॉक्‍टर आणि नागरिक यांनी सदैव सतर्क राहिले पाहिजे. विशेषत: ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांवर सर्पदंशाच्या उपचारासाठी आवश्‍यक यंत्रणा ही अधिक सक्षम केली पाहिजे,’ असे मत सर्पदंश उपचाराचे तज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत यांनी व्यक्त केले.

जागतिक आरोग्य संघटनेने १९ सप्टेंबर हा जागतिक सर्पदंश जनजागृती दिवस म्हणून घोषित केला असून, यावर्षी पहिल्यांदाच हा दिवस साजरा करण्यात येत आहे. पुणे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि विघ्नहर मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील आरोग्य आधिकाऱ्यांसाठी सर्पदंश जनजागृतीविषयक कार्यशाळा बुधवारी (१९ सप्टेंबर) घेण्यात आली. यात डॉ. राऊत यांनी ‘सर्पदंश’ विषयावर मार्गदर्शन केले.  

या वेळी परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, उपाध्याय विवेक वळसे-पाटील, आरोग्य सभापती प्रवीण माने, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप माने, अतिरिक्त उपजिल्हाधिकारी बोरा, जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, दत्तात्रय झुरंगे, माजी आरोग्य सभापती रणजित शिवतारे उपस्थित होते. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सर्पदंशाबाबत जनजागृतीविषयक दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

डॉ. राऊत म्हणाले, ‘सर्पदंशावर उपचार घेण्याबरोबरच त्याबाबत काळजी घेणे ही तितकीच आवश्‍यक बाब आहे. अनेकदा गावांमध्ये स्वच्छता राखली जात नाही. सुरक्षेच्या बाबींकडे दुर्लक्ष केले जाते. त्यातून सर्पदंश होण्याचे प्रमाण वाढते. त्यातच सर्पदंश झाल्यावर वैद्यकीय उपचार देण्याऐवजी घरगुती उपचार अथवा तांत्रिकाकडे नेले जाते. यामुळे रुग्णाची परिस्थिती अजून खालावते. त्यामुळे अशाप्रकारचे उपचार न करता, रुग्णास त्वरित डॉक्टरांकडे नेले पाहिजे. वेळेवर उपचार मिळाल्यास रुग्ण बचावण्याचे प्रमाण १०० टक्के असते.’

देवकाते म्हणाले, ‘जगात प्रथमच साजरा होणाऱ्या जागतिक सर्पदंश दिनानिमित्त पुणे जिल्हा परिषदेने आयोजित केलेला कार्यक्रम हा अतिशय चांगला उपक्रम आहे. यासाठी परिषदेच्या आरोग्य विभागाचे अभिनंदन. सर्पदंश हा अत्यंत गांभीर्याने घेण्याचा विषय आहे. यामुळे एकट्या जुन्नरमध्ये एक हजार ३०० रुग्ण दगावले आहेत. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग हा नेहमीच माणुसकीच्या दृष्टीकोनातून काम करतो. यापुढेही अशाप्रकारच्या आजारांबाबत आवश्‍यक ती सर्व मदत विभाग आणि जिल्हा परिषदेतर्फे सर्व प्राथमिक आरोग्यकेंद्रांना उपलब्ध केली जाईल.’

वळसे-पाटील म्हणाले, ‘आजही सर्पदंशांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात आहे. पूर्वी मण्यार आणि नाग यांच्या दंशाचे प्रमाण जास्त होते; मात्र आज घोणस या अतंत्य विषारी सापाच्या दंशाचे प्रमाण वाढले आहे. अशावेळी तातडीने वैद्यकीय मदत मिळणे आवश्‍यक असते; मात्र नागरिक सुरवातीचा बहुतांश वेळ घरगुती उपचारामध्येच घालवतात. याविषयात जनजीगृतीची आवश्‍यकता आहे.’

प्रवीण माने म्हणाले, ‘सर्पदंशविषयक काळजी ही काळाची गरज असून, धरण क्षेत्राच्या परिसरात ही समस्या जास्त आहे. गेल्यावर्षी आरोग्य विभागाचे काम करताना ही समस्या जवळून जाणून घेता आली. यामध्ये लस नसल्याची समस्या जास्त होती. सर्पदंशावरील लस उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळेच आज जिल्ह्यात लसींचा तुटवडा नाही. लस नसलेले एकही प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्ह्यात नाही. या समस्येबाबत विभाग अतिशय जबाबदारीने काम करत आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search