Next
‘जलसंधारणाची लोकचळवळ अभूतपूर्व’
BOI
Monday, March 05, 2018 | 12:51 PM
15 0 0
Share this storyबुलडाणा :
‘सरकार स्थापन झाल्यावर अवघ्या एका महिन्यात जलयुक्त शिवारसारखे लोकसहभाग असणारे महत्त्वाकांक्षी अभियान राज्यात आणले. या अभियानाच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे राज्यात मोठ्या प्रमाणावर  झाली. ही योजना केवळ शासनाची नसून ती जनतेची आहे, हे लोकसहभागावरून दिसून येते. यासोबतच राज्यात जलसंधारणाच्या कामांमध्ये खासगी कंपन्या, संस्था यांचा सहभाग वाढत असून, ही जलसंधारणाची लोकचळवळ देशात अभूतपूर्व अशी आहे. अशा कामांमुळे जलसंधारणात राज्य देशात निश्चितच अग्रेसर राहणार आहे,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

भारतीय जैन संघटनेद्वारे दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत बुलडाणा जिल्हा सुजलाम् सुफलाम् मोहिमेचा शुभारंभ तीन मार्च २०१८ रोजी मलकापूर रस्त्यावरील एआरडी मॉलसमोरील मैदानावर आयोजित केला होता. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर केंद्रीय भूपृष्ठ परिवहन, जलसंपदा मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री पांडुरंग फुंडकर, गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा उमा तायडे, राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, खासदार प्रतापराव जाधव, रावेरच्या खासदार रक्षा खडसे, आमदार चैनसुख संचेती, राहुल बोंद्रे, डॉ. संजय रायमूलकर, डॉ. संजय कुटे, शशिकांत खेडेकर, हर्षवर्धन सपकाळ, आकाश फुंडकर, जलसंधारण सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, भारतीये जैन संघटनेचे अध्यक्ष शांतिलाल मुथा, नगराध्यक्षा नजमुन्निसा सज्जाद, माजी आमदार धृपदराव सावळे, विजयराज शिंदे, सुरेश जैन, जेसीबी कंपनीचे कार्यकारी संचालक विपीन सौंढी, टाटा ट्रस्टचे आशिष देशपांडे, वल्लभ भंसाली, मिशन समृद्धीचे अरुण जैन आदी उपस्थित होते.

‘सरकार, सामाजिक संस्था आणि लोकसहभागातून बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळमुक्तीसाठी ऐतिहासिक काम सुरू झाले. पुढील दोन वर्षांत हा पॅटर्न राज्यभर राबवू,’ असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी नमूद केले.

ते म्हणाले, ‘या दुष्काळाच्या दुष्टचक्रामुळे कालांतराने शेतमाल उत्पादन कमी होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यावर दूरगामी प्रतिकूल परिणाम होतो. भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून शांतिलाल मुथा शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचे मोठे काम करीत आहेत. खऱ्या समाजसेवी कामाचे दर्शन शांतिलाल मुथा यांच्या कामातून होते. राज्यभरात अशा कामांचा बुलडाणा पॅटर्न राबविण्यात यावा. त्यामध्ये आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांचा प्रामुख्याने समावेश करण्यात यावा. त्यासाठी शासन जैन संघटनेला सर्वतोपरी सहकार्य करेल. बळीराजा जलसंजीवनी योजनेंतर्गत जिल्ह्यातील जिगांवसह आठ लघू पाटबंधारे प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. हे अपूर्ण जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यावर शासनाचा भर असणार आहे.’

‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील दोन लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. पात्र वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना राज्यात अंमलात आणण्यात येत आहे. या योजनेमुळे जलाशयांमधील गाळ काढून शेतांमध्ये टाकण्यात येत आहे. परिणामी शेती सुपीक होत आहे. या कामांमध्ये स्थानिक जेसीबीधारकांना योग्य दर देऊन रोजगार मिळवून देण्यात येणार आहे.

‘जलसंधारणाच्या कामांचे पब्लिक प्रायव्हेट पीपल पार्टनरशिप (पीपीपीपी) मॉडेल राज्यात विकसित झाले आहे. या मॉडेलच्या माध्यमातून संपूर्ण राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत खारपाणपट्टयातील गावांमध्ये शेतीचा विकास करण्यात येत आहे. यामध्ये भूसुधारपासून विपणनापर्यंतची साखळी विकसित करण्यात येणार आहे. प्रकल्प जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून राबविण्यात येत आहे,’ असेही मुख्यमंत्री या वेळी म्हणाले.

नितीन गडकरी म्हणाले, ‘कुठल्याही कामामागे प्रेरणा महत्त्वाची असते. या दुष्काळमुक्त अभियानाच्या कामांमागेही शांतिलाल मुथा यांची प्रेरणा महत्त्वाची आहे. सामाजिक संवदेनशीलता असल्यामुळे अशा प्रकारचे काम होत आहे. या कामांमुळे बुलडाणा जिल्ह्यातील संरक्षित सिंचनात भर पडणार आहे. परिणामी जिल्ह्याच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीत भर पडणार आहे.’

परंपरागत पीकपद्धती सोडून शेतकऱ्यांनी नवनवीन पीक पद्धती अवलंबण्याचे आवाहन करून गडकरी म्हणाले, ‘राज्यात पाण्याची कमी नाही; मात्र पाण्याचे नियोजन नसल्यामुळे दुष्काळाचा सामना करावा लागतो. आंतरराज्य करार झाल्यामुळे अनेक प्रलंबित सिंचन प्रकल्प पूर्ण होणार आहे. केंद्र पुरस्कृत बळीराजा जलसंजीवनी प्रकल्पांतून विदर्भातील ७८, मराठवाड्यातील २६ व पश्चिम महाराष्ट्रामधील चार सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात पाच हजार कोटींच्या रस्त्याची कामे सुरू असून, ६७४ किलोमीटर लांबीचे रस्ते पूर्ण करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय महामार्गांच्या सुरू असलेल्या कामांमुळे सभोवतालची जलाशये गाळमुक्त करण्यात येत आहे. या जलाशयांमधील गाळ रस्ता कामासाठी उपयोगात आणण्यात येत आहे.’

‘शेतकऱ्यांनी इथेनॉलनिर्मिती होणाऱ्या पिकांची लागवड करावी. मक्याच्या कणीसापासून इथेनॉलची निर्मिती करण्यात येते. तसेच तांदूळ पिकाच्या काड्यांपासूनही बायो इंधनाची निर्मिती होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक पद्धत बदलवून नवीन पिकांची लागवड करावी. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बळीराजा जलसंजीवनी प्रकल्पातंर्गत जिगांवसह आठ लघुपाटबंधारे प्रकल्प पूर्ण होणार आहेत. त्यामुळे निश्चितच जिल्ह्याचे सिंचन वाढणार आहे,’ असे गडकरी यांनी सांगितले.

पालकमंत्री फुंडकर म्हणाले, ‘जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी भारतीय जैन संघटनेचा हा संकल्प स्पृहणीय आहे. अभियानात १३४ जेसीबी मशीनच्या माध्यमातून जिल्हाभर गाळ काढण्याचे काम होणार आहे. यामुळे प्रकल्पांची जलसंचय क्षमता वाढून भूजल पातळीत वाढ होणार आहे. जिल्ह्यात रस्त्यांचा विकास जोमाने होत असून, अपूर्ण असलेल्या सिंचन प्रकल्पांना निधी मिळाला आहे.’

प्रास्ताविक शांतिलाल मुथा यांनी केले. जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, ‘जेसीबीमधील डिझेल खर्चाच्या २७ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला तत्त्वत: मान्यता आहे; तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी त्यांच्यावतीने या मोहिमेत मदत करणार आहे.’ या प्रसंगी टाटा ट्रस्टचे आशिष देशपांडे, वल्लभ भंसाली, मिशन समृद्धीचे अरुण जैन यांनी मनोगत  व्यक्त केले. कार्यक्रमादरम्यान भारतीय जैन संघटना व जिल्हा प्रशासन यांच्यामध्ये करार करण्यात आला. सूत्रसंचालन राजेश देशलहरा यांनी केले. आभार बांठीया यांनी मानले. कार्यक्रमाला प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सरपंच, जैन समाज बांधव, नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘महान्यूज’ पोर्टलवरील बातमीत ही माहिती  दिली आहे.

मोहिमेसाठी विशेष अॅप विकसित
या मोहिमेसाठी पुण्यातील ‘मायविश्व कॉर्पोरेशन’ ही संस्था टेक्नॉलॉजी पार्टनर असून, या संस्थेने या उपक्रमासाठी उपयुक्त असे ‘सुजलाम सुफलाम’ नावाचे मोबाइल अॅप विकसित केले आहे. ते अॅप गुगल प्ले स्टोअरला उपलब्ध असून, या उपक्रमात सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांसह सहभागी नसलेल्या व्यक्तींनाही योजनेची माहिती मिळविण्यासाठी ते अॅप डाउनलोड करता येईल.
अॅप डाउनलोड करण्यासाठी लिंक : https://goo.gl/3JiCT6
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link