Next
मनातली अस्वस्थता दूर सारा..
BOI
Saturday, January 27 | 06:45 AM
15 0 0
Share this story

 
गेल्या अनेक वर्षांपासून घराची संपूर्ण जबाबदारी मौसमीवरच आहे. पहाटे उठून ४०-५० घरांमध्ये दूध पोहोचवणं, स्वयंपाक, भावाची शाळा, अभ्यास, घरातली आवरा-आवर, धुणं-भांडी, स्वतःची कामं असं सगळं गेल्या पाच-सहा वर्षांपासून तीच पाहत होती. तिचं शिक्षण सुरू होतं, तोपर्यंत तिला या सगळ्याचं फारसं दडपण जाणवत नव्हतं, पण आता नोकरी सुरू झाल्यापासून वेळेचं गणित बांधणं तिला फारच कठीण जात होतं... ‘मनी मानसी’ सदरात आज पाहू या मनातील अस्वस्थतेबद्दल...
................................. 
मौसमीला मागच्या वर्षी एका मोठ्या नामवंत कंपनीत नोकरी मिळाली. ऑफिस वातावरण, सहकारी, पगार सगळचं मौसमीच्या अपेक्षेपेक्षा चांगलं मिळाल्याने ती फारच खुश होती. शिक्षण संपल्यावर दोन महिन्यातंच इतकी उत्तम नोकरी मिळाल्याने तिच्या आनंदाला पारावारंच उरला नव्हता. त्यामुळे ती अगदी उत्साहात आणि आनंदात कामावर जात होती. पहिले पाच-सहा महिने हे सगळं अगदी सुरळीत सुरू होतं. ते महिने उत्तम गेले. 

सहकाऱ्यांकडून काम शिकून घेण्यासाठी तिने खूप कष्ट घेतले आणि त्याप्रमाणे काम करायला सुरुवातही केली, पण ती नवीन कामं मौसमीला जमत नव्हती. प्रत्येक कामात काही ना काही चुका होतंच होत्या. सहकारी तिला समजून घेत होते. काम परत परत समजावून सांगत होते. तिच्याकडून काम करूनही घेत होते. तेवढ्यापुरते ते काम उत्तम होई, पण परत नवीन काम करायला घेतले, की परत चुका व्हायच्या आणि तिच्या कामातील सततच्या चुकांमुळे ऑफिसमधील वरिष्ठ तिला रागवायचे, बरंच बोलायचे. दोन-तीन वेळा तर तिला त्यांचा रोष सर्व सहकाऱ्यांसमोरच सहन करावा लागला. त्यामुळे ती अगदी खचून गेली होती, भांबावून गेली होती. तिने त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, पण वरिष्ठांचा स्वभाव जरा तापट असल्याने त्यांनी तिचं म्हणणं ऐकुनच घेतलं नाही. 

एक दिवस त्यांनी तिला केबिनमध्ये बोलावून घेतलं आणि सांगितलं, की पुढील दोन महिन्यांत तिच्या कामात जर सुधारणा दिसली नाही, तर तिला ही नोकरी सोडावी लागेल. हे ऐकल्यावर मात्र मौसमी हादरूनच गेली. तिच्यामधला उरलासुरला आत्मविश्वासही ढासळला आणि ती हताश होऊन गेली. यातून मार्ग काढण्यासाठी तिने दोन दिवस यावर खूप विचार केला; पण समस्याही नेमकी समजेना आणि म्हणून उपायही करता येत नव्हता. म्हणून मग शेवटी स्वतःहूनच ती  भेटायला आली. झालेला सगळा प्रकार तिने अगदी छोटी-छोटी उदाहरणं देत सांगितला. बोलताना तिला रडूही येत होतं. हे सगळं सांगता सांगता ती तिच्या घराच्या वातावरणाबद्दलही बोलू लागली आणि तिच्या समस्येचा उलगडा आपोआपच झाला.

तिच्या घरच्यांचा अनेक पिढ्यांपासून दूध आणि दुधाच्या पदार्थांचा व्यवसाय आहे. पुण्यात व मुंबईत अशा त्यांच्या दोन-तीन स्वतःच्या डेअऱ्या आहेत. घरात आई-वडिल, धाकटा भाऊ आणि मौसमी असे चौघेजण राहतात. एक डेअरी मौसमीचा काका सांभाळतो, तर एक मौसमीचे वडिल. या व्यवसायामुळे तिचे आई बाबा सतत कामात असतात. त्यामुळे घराकडे त्यांचं अजिबात लक्ष नसतं. गेल्या अनेक वर्षांपासून घराची संपूर्ण म्हणजे अगदी संपूर्ण जबाबदारी मौसमीवरच आहे. पहाटे उठून ४०-५० घरांमध्ये दूध पोहोचवणं, स्वयंपाक, भावाची शाळा, अभ्यास, घरातली आवरा-आवर, धुणं-भांडी, स्वतःची कामं असं सगळं गेल्या पाच-सहा वर्षांपासून तीच पाहत होती. तिचं शिक्षण सुरू होतं, तोपर्यंत तिला या सगळ्याचं फारसं दडपण जाणवत नव्हतं, पण आता नोकरी सुरू झाल्यापासून वेळेचं गणित बांधणं तिला फारच कठीण जात होतं. त्यातच आईचा स्वभाव तापट असल्याने ती मौसमीच्या छोट्या-छोट्या कामात सतत चुका काढायची. तिला बोलायची. त्यामुळे मौसमी सगळ्या बाजूंनी मानसिक अस्वस्थता अनुभवत होती. या अवस्थतेची तीव्रता इतकी जास्त होती, की घरात आणि ऑफिसमध्ये दोन्हीकडे काम करणं तिला अशक्य होत होतं. क्षमता असूनही ती कामात चुका करत होती. घरात असताना ऑफिसचं आणि ऑफिसमध्ये असताना घरचे विचार सतत तिच्या डोक्यात फिरत राहायचे आणि मग कामात चुका व्हायच्या.

तिच्याशी या मुद्द्यांवर बोलताना एक गोष्ट लक्षात आली, की या मानसिक अस्वस्थेतेमागील या कारणांची तिला अजूनही जाणीव झालेली नव्हती. चर्चेदरम्यान आपल्या विचारांचा हा गोंधळ आणि त्यामुळे निर्माण झालेली मानसिक अवस्वस्थता याची तिला जाणीव करून दिली आणि मग कोणकोणते उपाय करता येतील यावर चर्चा केली. या चर्चेतून अनेक उपाय तिचे तिलाच सापडले. तिने परिस्थितीत झालेला बदल स्वीकारला  आणि तिच्या साऱ्या समस्या आपोआपच सुटत गेल्या. सहा महिन्यांनी ती स्वतःहून भेटायला आली, कारण दोन-तीन दिवसांपूर्वीच तिला कामात बढती मिळाली होती.

(केस मधील नावे बदलली आहेत.) 

- मानसी तांबे-चांदोरीकर 
मोबाइल : ८८८८३ ०४७५९ 
ई-मेल : tambe.manasi11@gmail.com

(लेखिका पुण्यात समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत.)

(दर शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘मनी मानसी’ या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/a3SDSr या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Dipti Saraf About 354 Days ago
I like your sharing article.
0
0

Select Language
Share Link