Next
एकटी पथ चालते.....!
BOI
Friday, February 16, 2018 | 12:45 PM
15 0 0
Share this article:

‘स्टेटस सिंगल’ या पुस्तकासह लेखिका श्रीमोयी पियू कुंडू‘पुरुषांचा द्वेष करणाऱ्या, त्यांना कमी लेखणाऱ्या स्त्रिया म्हणजे ‘फेमिनिस्ट’ हे मला मुळीच मान्य नाही. स्त्रीला समानतेची वागणूक देणारा, तिची प्रतिष्ठा सांभाळणारा, तिचा आत्मसन्मान जपणारा दृष्टिकोन म्हणजे स्त्रीवाद. ती वृत्ती असते आणि विशाल मनाच्या प्रत्येक व्यक्तीमध्ये ती सापडते....’ हे मत आहे स्त्रीवादी लेखिका श्रीमोयी पियू कुंडू यांचं. एकट्या असलेल्या महिलांच्या जीवनाविषयी भाष्य करणारं, त्यांचं मन जाणून घेणारं, समस्या-संघर्ष मांडणारं ‘स्टेटस सिंगल’ हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. पुण्यात त्या संदर्भात झालेल्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं या पुस्तकाच्या संदर्भात त्यांच्याशी साधलेला हा संवाद....
..............
‘कुठलीही स्त्री जीवनात एकटी आहे, असं ऐकलं किंवा कळलं, की आपल्याकडे बहुतांश लोकांची पहिली प्रतिक्रिया असते, ‘अरेरे! बिचारी!’ तिच्या एकटं असण्याचं कारणही लक्षात न घेता प्रत्येक जण अशा प्रतिक्रिया देत असतो; पण त्यातली सहानुभूती तरी खरी असते का? अनेकदा अशी सहानुभूती वरकरणी दाखविणारेच अनेक जण तिच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल जाणून घ्यायला, त्यात डोकवायला उत्सुक असतात आणि मनासारखं काही हाती लागत नाही म्हटल्यावर नाकं मुरडायलाही तेच पुढं असतात. हे सगळंच चित्र मला मनातून मुळापासून अस्वस्थ करणारं वाटतं,’ श्रीमोयी मनापासून, अगदी पोटतिडकीनं सांगत होती. तिच्या मनातली व्यथा तिच्या चेहऱ्यावर आणि तिच्या स्वरांतूनही जाणवत होती.

श्रीमोयी पियू कुंडू... अलीकडच्या काळातली ख्यातनाम स्त्रीवादी लेखिका. जेमतेम चाळिशीची; पण स्त्रीवादाची स्वतःच्या वास्तववादी दृष्टिकोनातून वेगळ्या चौकटीत मांडणी करणारी निर्भीड लेखिका. ‘लिंगभाव आणि लैंगिकता’ या विषयांवरील तिचे स्तंभ आणि लेखमालांची जागतिक पातळीवरही दखल घेतली गेली आहे. ‘लाइफ स्टाइल’ या प्रसिद्ध मासिकाच्या संपादिका म्हणून त्यांनी दीर्घ काळ काम केलं. ‘एनडीटीव्ही’तर्फे त्यांना ‘लॉरेल वूमन ऑफ वर्थ’ या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. ‘फार अवे म्युझिक’, ‘सीताज् कर्स’, ‘राँग गर्ल’ या त्यांच्या कादंबऱ्या त्यांच्या वेगळ्या विचारसरणीमुळे विशेष गाजल्या. नुकतंच त्यांचं ‘स्टेटस सिंगल’ हे नवं पुस्तक प्रकाशित झालं. भारतामध्ये एकट्या असलेल्या, मग त्यामध्ये अविवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता असतील, अशा कुठल्याही कारणानं एकट्या असलेल्या, एकटेपणाचं जीवन जगणाऱ्या महिलांच्या जीवनाविषयी भाष्य करणारं, त्यांचं मन जाणून घेणारं असं हे पुस्तक आहे. अर्थातच या विषयावरचं पहिलंवहिलं! अशा एकाकी स्त्रियांचं जीवन, एकाकीपणामुळे जीवनात करावा लागणारा संघर्ष, कामाच्या ठिकाणी सोसावे लागणारे अत्याचार आणि जाणीवपूर्वक दिला जाणारा त्रास, एकटेपणामुळे निर्माण होणाऱ्या समस्या अशा अनेकविध पैलूंचा वेध घेण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकाद्वारे केला आहे. विशेष म्हणजे अशा स्त्रियांच्या लैंगिक गरजा या विषयावरही त्यांनी अत्यंत रोखठोकपणे वास्तववादी मांडणी केली आहे. संशोधनासाठी त्यांनी भरपूर भटकंती केली. देशाच्या कानाकोपऱ्यात फिरून तीन हजार महिलांशी संवाद साधला आणि त्यातून हाती लागलेला ऐवज या पुस्तकरूपाने त्यांनी वाचकांसमोर ठेवला आहे. 

मंजुल पब्लिशिंग हाउस या प्रसिद्ध प्रकाशन संस्थेचा इंप्रिंट असलेल्या ‘अॅमॅरिलिस’नं हे पुस्तक वाचकांच्या भेटीसाठी आणलं आहे. एखादं स्क्रिप्ट हाती पडताच प्रकाशकांच्या मनात पहिला विचार येतो, की ‘या पुस्तकाचं वेगळेपण काय?’ मुळात ‘स्टेटस सिंगल’ हे पुस्तक विषय, आशय, मांडणी या अंगानं खूपच वेगळं आहे. शिवाय यात हाताळलेला विषय आजवर दुर्लक्षित राहिलेला असून, तो तितकाच दाहक आहे. हेच लक्षात घेऊन ‘अॅमॅरिलिस’ला एका वेगळ्या सामाजिक समस्येशी संबंधित पुस्तक प्रकाशित करावंसं वाटलं. 

देशाच्या विभिन्न प्रांतांमध्ये पायपीट करून अशा एकाकी स्त्रीत्वाचा शोध घ्यावा, असं श्रीमोयीला का वाटावं? चर्चासत्रं, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ‘फेमिनिझम’वर व्याख्यानं देत मिरविणाऱ्या तथाकथित स्त्रीवाद्यांच्या पलीकडे जाऊन स्त्रीच्या एकटेपणानं तिला व्यथित का करावं? हे आणि असे अनेक प्रश्न हे पुस्तक वाचताना मनात नकळत येत होते. त्याबद्दल विचारलं असता श्रीमोयी दिलखुलासपणे बोलत राहिली.

तिच्या मनातला स्त्रीवादी दृष्टिकोन विकसित व्हायला कारण झालं ते तिचं बालपण. श्रीमोयी म्हणते, ‘जमीनदारांच्या संपन्न घराण्यात जन्माला आलेल्या माझ्या आईला वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी वैधव्य आलं आणि नकळत्या वयाच्या मला घेऊन ती माहेरी कोलकात्याला आली. त्यामुळे माझं बालपण कोलकात्यातच गेलं. आजी-आजोबांची प्रचंड मोठी हवेली होती. आजोबा सुशांतो मोहन दास मोठे उद्योजक होते, तर आजी करुणा दास सामाजिक कार्यकर्ती होती; पण तिच्यात एक फार मोठी लोकशिक्षिका दडलेली होती. समाजातली दुःखं बघून ती व्यथित व्हायची; पण दुःखितांच्या दुःखावर तात्पुरती मलमपट्टी न करता त्या दुःखाचं कारण समूळ नष्ट कसं करता येईल, यासाठी तिची धडपड असायची, त्यामुळे सामाजिक कार्य करताना भेटलेल्या, लहान वयात विधवा झालेल्या, नवऱ्यानं सोडून दिलेल्या अशा कितीतरी महिलांना तिनं हवेलीत आणून पोटापाण्याला लावलं होतं. या बायका आमच्या घरात स्वयंपाकपाणी, इतर घरकाम करायच्या. काही जणींना तिनं इतरत्र कामं मिळवून दिली होती. काही वेळा परिस्थितीच्या फटक्यानं उन्मळून पडलेल्या या स्त्रिया आजीजवळ मन मोकळं करताना रडायच्या, खूप अस्वस्थ व्हायच्या. त्या वेळी आईच्या मायेनं त्यांना थोपटताना, त्यांच्या दुःखावर फुंकर घालताना मी अनेक वेळा आजीला बघितलं होतं. तिच्या त्या दयार्द्रतेचा, मायेचा ओलावा नकळत तेव्हापासून माझ्या मनात झिरपत गेला!’

एवढ्या मोठ्या हवेलीत आजी-आजोबा आणि आईबरोबर राहणारी श्रीमोयी तशी एकटीच होती. भावंड नाही, घरात कुणी इतर लहान मुलंही नाहीत. त्यामुळे हवेलीत काम करणाऱ्या आणि मागच्या बाजूलाच राहणाऱ्या नोकरांची मुलं हेच श्रीमोयीचे मित्र-मैत्रिणी! ‘बालपणीचा खरा आनंद त्यांच्याबरोबरच लुटला,’ असं श्रीमोयी आनंदानं सांगते. श्रीमोयी ११-१२ वर्षांची असताना तिच्या आईनं दुसरं लग्न केलं. त्याचं असं झालं, की एवढ्या मोठ्या हवेलीच्या एका मजल्यावरच्या काही खोल्यांमध्ये आजी-आजोबा पेइंग गेस्ट ठेवत असत. बेंगळुरूच्या सधन घराण्यातला एक तडफदार तरुण कामासाठी कोलकात्याला आला असताना त्यांच्याकडे पेइंग गेस्ट म्हणून राहत होता. त्यातून परिचय झाला नि श्रीमोयीची आई आणि तो तरुण एकमेकांच्या प्रेमात पडले. वयानं श्रीमोयीच्या आईपेक्षा ११ वर्षांनी लहान असलेल्या या तरुणानं घरच्यांचा विरोध पत्करून लग्न केलं आणि श्रीमोयीला वडील मिळाले.

कोलकात्यातच महाविद्यालयातून इतिहास विषयात पदवी घेऊन श्रीमोयीनं पुढच्या शिक्षणासाठी दिल्ली गाठली. दिल्लीमध्ये पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर श्रीमोयीनं टाइम्स ऑफ इंडिया, एशियन एज, इंडिया टुडे इत्यादी ठिकाणी काम केलं. त्यानंतर वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षी ‘लाइफस्टाइल’ मासिकाच्या संपादकपदाची धुरा तिच्याकडे आली. या सर्व काळात विविधांगी लेखन सुरू होतं. त्यातही महिलांचे विषय प्राधान्यानं हाताळले जायचे. लहानपणीचे काही ओरखडे मनात ताजे होते. आईबरोबर जाताना आजूबाजूचे लोक कुजबुजायचे. तिनं दुसरं लग्न केल्यावर तर लोकांना जणू एक नवा विषयच चघळण्यासाठी मिळाला होता. त्या नजरा, ती कुजबूज यामुळे विद्ध झालेल्या श्रीमोयीच्या मनात नकळतच स्त्रीचं जगणं हा एक लेखनविषय बनून ठाण मांडून बसला होता. ‘लाइफस्टाइल’मध्ये काही वर्षं काम केल्यावर एका मीडिया फर्ममध्ये स्ट्रॅटेजिक डिझाइनिंगचं काम तिनं केलं. याच काळात सुटी घालविण्यासाठी ती मैत्रिणीकडे ऑस्ट्रेलियाला दोन महिने गेली अन् याच टप्प्यावर तिच्या जीवनातलं लेखिकेचं नवं दालन उघडलं गेलं. 

‘मंजुल पब्लिशिंग हाउस’चे चेतन कोळी यांच्यासह श्रीमोयी पियू कुंडूतिथं फिरताना, आजूबाजूचं वेगळेपण टिपताना मनात उमटणारे तरंग आणि विचार शब्दबद्ध करायला सुरुवात झाली. श्रीमोयी म्हणते, ‘त्या वेळी मी बरीच अंतर्मुख झाले. मला काय वाटतं याचा मी अधिक बारकाईनं शोध घेत गेले. ते शब्दबद्ध करीत राहिले; पण ते इतकं नेटानं लिहिलं जाईल, याची त्या वेळी मलाही कल्पना नव्हती. त्यातून ‘फार अवे म्युझिक’ ही माझी पहिली कादंबरी जन्माला आली. ती माझ्या नंतरच्या अनेक पुस्तकांच्या निर्मितीचं कारण बनली अन् त्याचबरोबर माझ्या अंतरीच्या आणि बाह्य जगाबरोबर सुरू झालेल्या वैचारिक संघर्षाचंही!’

श्रीमोयी म्हणाली, ‘या पुस्तकानं माझ्या जाणिवा अधिक प्रगल्भ झाल्या. माझ्यामध्ये एखादी क्रांती झाल्यासारखं मला वाटायला लागलं. लिंगभाव, लैंगिकता, बालकांची पिळवणूक, महिलांचा छळ, घरगुती हिंसाचार इत्यादींबाबत मी अधिक सजग झाले. डोळसपणे विचार करायला लागले. यातूनच ‘सीताज् कर्स’ या दुसऱ्या कादंबरीचा जन्म झाला. एका गुजराती गृहिणीच्या नजरेतून स्त्रीच्या कामविषयक भावना टिपणारी ही कादंबरी खूप गाजली. त्यापाठोपाठ ‘यू हॅव्ह द राँग गर्ल’ ही कादंबरी गाजली आणि आता ‘स्टेटस सिंगल’ या संशोधनात्मक पुस्तकापर्यंत मी आले आहे.’

या पुस्तकाची प्रेरणा नेमकी काय असावी, याबाबत उत्सुकता होती. श्रीमोयी म्हणाली, ‘एकदा सोशल मीडियावर एक जाहिरात पाहिली. अविवाहित असलेल्या एका तरुणीला घर हवं होतं आणि तिचं अविवाहित असणं त्यामध्ये बाधा म्हणून आड येत होतं. मी विचार करायला लागले, की हा प्रश्न तर दिल्लीत घर घेताना मलाही भेडसावत होता. तिथं मला घर शोधण्यासाठी मदत करणारे एजंट कनिष्क गुप्ता यांनी तर काळजीपोटी मला सल्ला दिला होता, ‘विवाहित आहे’ असं खोटंच लिहून टाकण्याचा! मग त्या दिशेनं विचार करायला लागले. मनात आलं, आपण सुशिक्षित असताना इतका त्रास होतो. अडाणी, अशिक्षित, ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य ‘एकटी’ची व्यथा काय असेल? आणि मग शोधाला सुरुवात झाली. सुरुवातीला थोड्या ओळखीतून अशा पाच जणी सापडल्या. त्यांच्याशी बोलताना, त्यांना जाणून घेताना जाणिवांची नवी कवाडं खुली होत गेली. स्त्रीत्वाबाबतच्या संवेदना अधिक तीव्र, टोकदार होत गेल्या. साऱ्या देशभर भटकंती झाली. एकदा एक मैत्रीण म्हणाली, ‘तुझं बरं आहे गं! तू मुळातच एकटी आहेस; पण माझ्या माथ्यावर घटस्फोटित म्हणून शिक्का बसलाय ना! ते जगणं फारच कर्मकठीण असतं.’ तिच्या या बोलण्यानं लक्षात आलं, की एकटेपण, मग ते आवर्जून जाणीवपूर्वक स्वीकारलेलं असो किंवा अपरिहार्यतेनं वाट्याला आलेलं असो, या देशातील स्त्रीसाठी तो शापच बनला आहे आणि मग पुढचा शोध अधिक डोळसपणे सुरू झाला. त्यातूनच ‘स्टेटस सिंगल’चा जन्म झाला.’

या सर्व काळात देशाच्या कानाकोपऱ्यातल्या, विविध क्षेत्रांतल्या, निव्वळ गृहिणी असणाऱ्या, विधवा, परित्यक्ता, अपंग अशा अनेक महिलांना भेटताना आलेले अनुभव अंगावर काटा आणणारे, अनेकदा सुन्न करणारे आहेत. पुण्यातली सधन मारवाडी कुटुंबातली एक अपंग मुलगी. पोलिओमुळे पाय गेल्यानं व्हीलचेअरवर बसून आयुष्य कंठणारी; पण भरपूर शिकलेली, बुद्धिमान, स्मार्ट. या मुलीला तारुण्याच्या एका वळणावर लग्न करावंसं वाटतं. ‘अपंग असताना कोण स्वीकारणार तुला,’ असा आई-वडिलांचा सरळ प्रश्न. त्यामुळे ती स्वतःच लग्नासाठी हालचाल करायचं ठरवते. काही मंडळांमध्ये नाव नोंदविते. चार-सहा मेळाव्यांना हजर राहते. या ठिकाणी एका तरुणाशी ओळख होते. तरुण, धडधाकट. बोलायला लाघवी. ‘अपंग असलीस, तरी तुझ्या प्रेमात पडलोय,’ असं सांगून तिच्याशी जवळीक वाढवतो. भेटीगाठी सुरू होतात अन् थोडीफार शारीरिक जवळीकही आणि एक दिवस ही त्याला लग्नाविषयी विचारते अन् अंगावर पाल पडल्यासारखा हा किंचाळतो, ‘लग्न अन् तुझ्याशी? एका लंगड्या मुलीशी? काय वेड लागलंय का? लग्न करायला आहे की माझी गर्लफ्रेंड.’ आणि हिचे डोळे खाडकन उघडतात. ‘अपंगच तर आहे, थोडीफार मजा केली, शारीरिक जवळीक केली तर बिघडलं कुठं? आणि काय करू शकणार आहे ती,’ हे त्याचे विचार तिला पार सुन्न करून टाकतात. त्यांचं भेटणं बंद होतं आणि काही दिवसांनी त्याची गर्लफ्रेंड पत्ता शोधत घरी येते आणि ‘लंगडी असताना माझ्या भावी नवऱ्याला स्वतःच्या जाळ्यात अडकवतेस का,’ असं विचारून दमदाटी करून निघून जाते. लग्न हा विषय तिच्या मनातून कितीतरी दूर फेकला जातो. पत्रकार म्हणून काम करणारी, कामासाठी देशाच्या कानाकोपऱ्यात फिरणारी तरुणी युरीन इन्फेक्शन झालं म्हणून उपचारांसाठी डॉक्टरकडे जाते आणि तिला होणारा त्रास ऐकल्यावर त्यावर इलाज करण्याआधी डॉक्टर विचारतात, ‘तू तर अविवाहित आहेस ना? मग तुला हा त्रास का होतोय? की तुझे कुणाशी अनैतिक संबंध वगैरे.... बाय द वे व्हाय आर यू अनमॅरिड?’ आणि ते ऐकून उसळलेल्या तरुणीला डॉक्टरला ऐकवावं लागतं, ‘धिस इज नन ऑफ युअर बिझनेस.’   

लेखिका स्वाती महाळंक यांच्यासह श्रीमोयीहे आणि असे कितीतरी अनुभव... मन आतून हलवून टाकणारे, सुन्न, विमनस्क करणारे... या समाजात स्त्रीचं एकटीचं जगणं किती असुरक्षित, लोकनिंदेला कारण ठरणारं आहे याची प्रचिती देणारे! पदोपदी तिच्या स्त्रीत्वाची कसोटी पाहणारे! सुखानं जगता यावं म्हणून स्त्रीला तिचं स्त्रीत्व कायमच का पणाला लावावं लागावं? हा समाज एक स्त्री या भूमिकेच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून तिच्याकडे कधी बघणार की नाही? की कायम नैतिकता-अनैतिकतेच्या कसोट्यांवर तोलत तिला अग्निपरीक्षाच द्याव्या लागणार या एकविसाव्या शतकातही, असे कितीतरी प्रश्न ‘स्टेटस सिंगल’ या पुस्तकामुळे आपल्या मनात उभे राहतात आणि मग पाश्चात्य स्त्रीवाद, भारतीय स्त्रीवाद, त्यांच्या संज्ञा-संकल्पना हे सारं बाजूला ठेवत श्रीमोयीची स्त्रीवादाची साधी-सरळ व्याख्या मनाला अधिक भावते. श्रीमोयी म्हणते, ‘पुरुषांचा द्वेष करणाऱ्या, त्यांना आपल्या समानतेसाठी कमी लेखणाऱ्या स्त्रिया म्हणजे ‘फेमिनिस्ट’ हे मला मुळीच मान्य नाही. किंबहुना हा खरा स्त्रीवाद नव्हेच, तर तिला समानतेची वागणूक देणारा, तिची प्रतिष्ठा सांभाळणारा, तिचा आत्मसन्मान जपणारा दृष्टिकोन म्हणजे स्त्रीवाद. तो फक्त स्त्रियांमध्ये असतो असं नाही. ती वृत्ती असते आणि विशाल मनाच्या प्रत्येक व्यक्तीमध्ये ती सापडते. अशा वेळी घरी काम करणाऱ्या बाईच्या मुलीला सांभाळणारे माझे वडीलही खरेखुरे स्त्रीवादी असतात आणि रेडलाइट एरियातल्या मुलांसाठी नि वृद्ध झालेल्या तृतीयपंथीयांसाठी कर्जतला आश्रम सुरू करणारी गौरी सावंतही स्त्रीवादीच असते.’

एकाकीपणाच्या विदारक परिस्थितीवर मात करू पाहणारा हा स्त्रीवाद आपल्या समाजाच्या पचनी पडेल का कधी? 

- स्वाती महाळंक
संपर्क : ८८८८१ ०२२०७

(लेखिका पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार, लेखिका आहेत.)

(श्रीमोयी पियू कुंडू यांच्या पुण्यात झालेल्या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
राजेंद्र सरग About
great
0
0

Select Language
Share Link
 
Search