Next
माझा अभिनय आत्मप्रेरणेतून निर्माण होणारा : डॉ. श्रीराम लागू
BOI
Thursday, November 16, 2017 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

डॉ. श्रीराम लागूअर्धशतकाहून अधिक काळ आपल्या दमदार अभिनयानं रंगभूमी गाजवलेले ‘नटसम्राट’ म्हणजे डॉक्टर श्रीराम लागू. ‘डॉक्टर’ याच नावानं ओळखले जाणारे हे ज्येष्ठ कलावंत आज, १६ नोव्हेंबर रोजी वयाची नव्वद वर्षं पूर्ण करत आहेत. त्या निमित्तानं ‘बाइट्स ऑफ इंडिया’तर्फे विवेक सबनीस यांनी डॉक्टर लागूंशी संवाद साधला. त्या संवादातला काही भाग येथे प्रसिद्ध करत आहोत.
...........
‘या वादळाला कुणी घर देता का घर?’ नटसम्राट नाटकातील भावनांना थेट हात घालणारा हा दमदार आवाजातला डायलॉग ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचाच आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. १९५१मधल्या आचार्य अत्रे यांच्या ‘उद्याचा संसार’ या नाटकापासून ते २००३मधील ‘मित्र’ या कलाकृतीपर्यंत उण्यापुऱ्या ५२ वर्षांमध्ये एकंदर ४३ नाटकांमधून आपल्या अभिनयाने नाट्यसृष्टी गाजवणाऱ्या डॉक्टरांनी बघता बघता वयाची ९० वर्षं पूर्ण केली आहेत! १६ नोव्हेंबर १९२७ हा त्यांचा जन्मदिन. अभिनयाबरोबरच उपजत सामाजिक भान, वाचन, चिंतन व बहुश्रुतता, सडेतोड विचारांची मांडणी आणि त्यातून जोपासलेलं आत्मभान यातून त्यांची माणूस म्हणून असणारी उंचीही थक्क करणारी आहे. पुण्यात वाढलेल्या, शिकलेल्या आणि अभिनयाचा एक आदर्श परिपाठ बनलेल्या डॉ. लागूंशी त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं ‘बाइट्स ऑफ इडिया’नं संवाद साधला. वयोमानानं येणारं विस्मरण लक्षात घेऊन डॉक्टरांच्या पत्नी, अभिनेत्री दीपा लागू यांनीही या संवादात मोलाची भर घातली. या संवादातला काही भाग येथे देत आहोत.

- डॉक्टर, वाढदिवसाबद्दल आपल्याला हार्दिक शुभेच्छा! आपल्याला शुभेच्छा देताना खूप आनंद होतोय. आपली नाटकातली कामं पाहत आमची पिढी मोठी होत गेली.
- धन्यवाद. (गमतीनं) माझी कामं पाहण्यानं तुम्ही मोठे होत गेला असाल, तर विशेष म्हटलं पाहिजे! मी ९० वर्षं पूर्ण केलीत, म्हणजे लोकांनीही मला खूप सहन केलं, असंच म्हणावं लागेल! (हसतात.) 

- तुमचं सर्व आयुष्य पुण्यात गेलं. बालवयात शाळेत व पुढे महाविद्यालयात तुम्ही नाटकात कामं केली आणि अनेक बक्षिसंही मिळवलीत. आपला जन्म केवळ अभिनय करण्यासाठीच झाला आहे, असं तेव्हा कधी वाटलं होतं का? 
- माझा जन्म सातारचा असला, तरी बालपण पुण्यात कुमठेकर रोडवरील दांडेकर वाड्यात गेलं. दांडेकर मालक असणाऱ्या या वाड्यात फक्त आमचं म्हणजे लागूंचेच बिऱ्हाड होतं. या वयात मला नकला करायला आवडे. पेरूगेट भावे स्कूलमध्ये असताना मी गुपचूप अनेकांच्या नकला करत असे. काही नाटुकल्यांमध्ये कामेही केली. मी नाटकात कामं करण्यावरून वडलांशी मोठं युद्ध होत असे! मी नाटकात काम करणं त्यांना मुळीच पटत नसे. त्यामुळे मी दांडेकरांच्या घरी किंवा देवळात इतरांसमोर नकला करून दाखवी. दांडेकरांच्या पत्नी अतिशय देखण्या व प्रेमळ होत्या. त्या माझ्यावर आईप्रमाणे माया करत व माझ्या नकलांचं कौतुकही करीत. अगदी पुढे कॉलेजात व वैद्यकीय महाविद्यालयात शिकतानाही मी अनेक नाटकांमध्ये कामं केली; पण तेव्हाही आपला जन्म केवळ अभिनयासाठी झाला आहे, असं मला कधीही वाटलं नाही. अर्थात, नाटक हा माझ्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे, याची जाणीव मात्र झाली.

- नाटकात काम करण्यामागे कुणाची काही खास प्रेरणा वगैरे होती का? 
- तसंही खास सांगता येणार नाही. दांडेकरांच्या वाड्यात त्यांचं रामाचं देऊळ होतं. तिथे मी मला वाटतील त्या नकला व हवे ते सादर करत असे. म्हणजे त्या काळात मी जे सिनेमे पाही, त्यातील नटांच्या नकला त्यांच्या लकबींसह सादर करे. त्या काळात मी नाटकांपेक्षा सिनेमे जास्त पाहिल्यामुळे त्यातील अनेक अभिनेत्यांच्या नकला करून मी तसा अभिनय करण्याचा प्रयत्न करी. शाहू मोडक हा नट तेव्हा प्रसिद्ध होता. त्या काळातले गायक-अभिनेते सैगल आणि पंकज मलिक हेही मला असेच चिकटले! त्यांची नक्कल करून दाखवायला मला विशेष आवडत असे. मी अॅ क्टर नसताना अॅेक्टिंग करत होतो इतकंच. 

- डॉक्टर, पण तुम्ही अभिनय व नाटक याबद्दलचा विचार अधिक गांभीर्याने पुढे केला, तेव्हा तुमच्या अभिनयाचं गमक किंवा नेमकं सूत्र तुम्हाला कसं गवसलं, हे सांगता येईल का? 
- अभिनय किंवा नाटक यांच्याबद्दल मी तेव्हा इतक्या गंभीरपणे विचार केला नव्हता. हां, नंतर कदाचित मी माझा अभिनय किंवा नाटकांचं विश्लेषण करू शकलो असेन. दांडेकरांच्या रामाच्या देवळात नकला सादर करायचो; पण पुढे एक गोष्ट समजली, की नाटक सादर करण्यासाठी तयारी करावी लागते. मी काही बॉर्न अॅक्टर नाही. माणूस पाहून मी नक्कल करत असे. एखादी नाट्यसंहिता वाचत असताना त्यातला रोल मी माझ्या पद्धतीने ‘एनॅक्ट’ करण्याचा प्रयत्न करी. त्यातले तंत्र मला जसजसे सापडत गेलं, तसतसे मला यासाठी इतर गोष्टींचीही गरज भासू लागली. माझा अभिनय हा इन्स्टिंक्टिव्ह किंवा आत्मप्रेरणेतून निर्माण होणारा होता. त्याकडे थोड्या तटस्थपणे पाहण्याची दृष्टी मला नंतर येत गेली. मला आठवतं, की विजय तेंडुलकरांचे ‘गिधाडे’ हे नाटक मला इतकं आवडलं, की ते मी आधी माझ्या आवाजात माझ्या पद्धतीनं टेप केलं! 

- तुम्ही पूर्वी अभिनयाला शिल्पकलेची उपमा दिली असल्याचं आठवतं..
- नाटकातलं पात्र रंगवत असताना ते समाजाच्या ज्या घटकातून येत असे, तसं आपल्याला व्हायचं आहे असं डोक्यात कुठे तरी असायचं. शिल्पकार एखाद्या व्यक्तीचं शिल्प घडवताना त्याची आधी छोटी प्रतिमा किंवा मॉडेल तयार करतो आणि मग त्याआधारे पुढे मोठं शिल्प घडवतो. तसं हे काहीसं आहे. एखादं कॅरेक्टर मनात तयार झालं, की नाटकांच्या तालमीमध्ये त्या पात्राला पॉलिश देत देत, ते बिल्ट अप करणं अशीच ही काहीशी पद्धत आहे. केवळ नक्कल करणं म्हणजे अभिनय नव्हे, तर त्यात स्वत:चं ‘ओरिजिनल’ही घालावं लागतं हेही जाणवलं. ‘नटसम्राट’मधील गणपतराव बेलवलकर ही नाट्यवाङ्मयातली एक महान व्यक्तिरेखा आहे. ही व्यक्तिरेखा मला एक अभिनेता म्हणून जशी दिसली, तशी ती साकारताना त्यातले बारकावे जपण्याचा प्रयत्न करत मी सादर केली. 

- तुमच्या रंगमंचीय कारकिर्दीत निळू फुले ते सुलभा देशपांडे, दत्ता भट ते सत्यदेव दुबे असे अनेक नट सहकलाकार म्हणून लाभले. त्यांच्यामुळेही आपण समृद्ध झालो आहोत, असं वाटतं का? 
- नाटक ही सांघिक कला आहे. निळूभाऊंपासून अनेक कलावंत मला माझ्या नाट्यजीवनात लाभले. माझ्या नाट्यप्रवासात जे जे अभिनेते माझ्या सहवासात आले, त्या प्रत्येकाकडूनच मला काही ना काही मिळत गेलं व मी त्यातून शिकतच समृद्ध होत गेलो. मला आठवतं, की निळूभाऊंचं वाचन प्रचंड होतं आणि त्यांच्याशी चर्चा करतानाही खूप आनंद मिळत असे. सामाजिक कृतज्ञता निधीच्या वेळी निळूभाऊंबरोबर आम्ही खूप काही करू शकलो. ‘लग्नाची बेडी’ यांसारखं नाटकही आम्ही याच काळात सादर करून निधी गोळा केला; पण एक गोष्ट नक्की, की मला यातून जाण आली ती ही, की आपण जे केले ते ग्रेट होतंच, असं नाही! शेवटी या साऱ्या सहकलाकारांबरोबर मी ज्या भूमिका रंगवल्या, त्या ‘बेस्ट ऑफ माय अॅंबिलिटी’ होत्या. 

- ...पण डॉक्टर, अभिनेत्याबरोबर एक दिग्दर्शक म्हणूनही तुम्ही स्वत:चं एक वेगळेपण जपत आलेला आहात. दिग्दर्शनासाठी तुम्ही (महेश) एलकुंचवारांचे गार्बो, आत्मकथा आणि गो. पु. देशपांडे यांचे ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ अशी वैचारिक धाटणी असणारी नाटकंच आवर्जून निवडलीत. हे सारं आपोआप घडलं का? 
- ते मी सांगू शकणार नाही किंवा त्यामागचं विश्ले्षणही मी केलेलं नाही. ‘गार्बो’चा प्रयोग आम्ही प्रायोगिक रंगभूमीसाठी ‘छबिलदास’मध्ये केला होता. ते एक फसलेलं नाटक होतं. ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ दुबे यांच्या कार्यशाळेत वाचून दाखवलं गेलं होतं. ते मला खूप आवडलं. त्यातला बंडखोर नायक श्रीधर विश्वधनाथ मला भावला. नाटककार ‘गोपु’ यांचाही आग्रह तो आम्हीच बसवावा असा होता. ते नाटक मी बसवेपर्यंत थांबायची तयारीही त्यांनी बोलून दाखवली होती; पण ते नाटक किंवा ही सारी नाटकं वैचारिक होती म्हणून ती आम्ही बसवली, असं घडलेलं नाही. 

- तुम्ही निवडलेली नाटकं आणि त्याचे प्रयोग पाहिले, की एक सूत्र जाणवतं ते हे, की तुमच्यात एक बंडखोर माणूस व त्याच्या जोडीला एक प्रगल्भ तत्त्वचिंतकही दडलेला आहे. त्यामुळेच तुम्ही ‘अँटिगनी’सारखं नाटक आपणहून हाती घेतलेत ना? तसंच, ‘सूर्य पाहिलेला माणूस’मध्ये आम्हाला सॉक्रेटिसच्या जोडीला डॉ. लागूही स्पष्ट जाणवतात ते कशामुळे? 
- सोफोक्लीज या ग्रीक नाटककारानं सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी ‘अँटिगनी’ लिहिलं. या नाटकाला आधुनिक रूप देण्याचं काम ज्याँ आनुई या फ्रेंच नाटककारानं केले. मी ‘अँटिगनी’ हे नाटक मुद्दाम निवडण्यामागचं कारण १९७५मध्ये लादली गेलेली आणीबाणी. तो अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर एक मोठा घालाच होता. ‘अँटिगनी’चं स्वरूप तसंच आहे. त्यामुळेच एक कलावंत म्हणून मला या नाटकानं झपाटलं. हे नाटक रंगमंचावर होणं अपरिहार्य आहे, असं प्रकर्षानं वाटलं. त्याचा अनुवादही मी त्याच उत्तेजित अवस्थेत केला. मी आणि आमच्या टीमनं ते सादर केलं. त्या काळासाठी ‘अँटिगनी’ हे सयुक्तिक होतं; पण केवळ त्यात बंडखोरी होती म्हणून ते आम्ही आमची संस्था ‘रूपवेध’तर्फे निर्माण केलं नाही. यातली मुलीची बंडखोरी यालाही एक अॅरस्थेटिक व्हॅल्यू किंवा त्यातही एक वेगळं सौंदर्य आहे. तिचं त्यातलं वागणं बरोबर की चूक याच्याशी त्याचा काही संबंध नाही. ‘सूर्य पाहिलेला माणूस’बाबतीतही काहीसं तसंच आहे. मी एक चांगला अॅणक्टर आहे. माझ्यातली बंडखोरी मला माहिती नाही किंवा मी विचारवंत आहे की नाही, याचंही मी कधी विश्लेमषण केलेलं नाही; पण हे नाटक माझ्या अभिनयासाठी खूप गाजलं. सॉक्रेटिसचा प्रखर सत्याग्रही तत्त्वविचार व त्या सगळ्या विचारप्रणालीशी माझी बांधिलकी इतकी पक्की होती, की तिला अभिव्यक्ती देताना मला अभिनय करण्याची गरजच पडली नाही! माझ्या आतापर्यंतच्या ८० नाटकांतल्या माझ्या भूमिका या बंडखोरीशी नातं सांगतात, हे खरं आहे. 

- १९६० ते ८० हा कालखंड व्यावसायिक, तसेच प्रायोगिक रंगभूमीचा सुवर्णकाळ मानला जातो. नाटकाच्या अभिव्यक्तीसंबंधी त्या काळात तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले. आज मराठी सिनेमा व दूरदर्शन मालिका तेजीत असूनही अनेक नाटकं रंगमंचावर येतात. तुमच्या पाहण्यात येत असतील, तर त्याबाबत काय वाटतं?
- सध्याची मराठी नाटकं बकवास आहेत, असं कोणतंही सरसकट विधान मी करणार नाही. मी माझे मत नेहमीच ते नाटक पाहून मगच ठरवत असतो. नाटकांचं परीक्षण वाचून ते कधीही ठरवत नाही. सध्या मी फारशी नाटकं पाहिली नसल्यामुळे त्याबाबत काहीच सांगू शकत नाही.  

- माणसाच्या जीवनात अभिनयाचं स्थान काय आहे? 
- मी इतरांसंबंधी काही सांगू शकणार नाही; पण माझ्याबाबतीत अभिनय व नाटक यांना खूप महत्त्व आहे. अभिनयाला मी शिरोधार्य मानले. नाटकाचं स्थान तर माझ्या जीवनात खूप उंचीवर आहे. 

- कोणत्या भारतीय नेत्याची वा विचारवंताची भूमिका तुम्हाला करायला आवडली असती? 
- गोपाळ कृष्ण गोखले यांची भूमिका साकार करण्याची संधी मला यापूर्वी मिळाली आहे. सामाजिक कार्य करणाऱ्या गाडगेबाबांची भूमिकाही मी केली. भूमिकांच्या बाबतीत मी कोणताही भेदभाव करत नाही. मग तो विचारवंत असो वा बदमाश. नथुराम गोडसेच्या जीवनावर आधारित एका नाटकात काम करण्यासाठी मला विचारण्यातही आलं होतं; पण ते नाटक भिकार असल्यामुळे मी ते नाकारलं.  

- तुम्ही अभिनय केलेल्या व दिग्दर्शन केलेल्या नाटकांचं स्वतंत्र डॉक्युमेंटेशन किंवा दस्तावेजीकरण केलं आहे का? 
- माझ्या कामांबद्दल मी वेळोवेळी बोललो आहे, मुलाखतींमधून भूमिका सांगितली आहे. कधी कधी त्यावर स्वतंत्र लिखाणही केले आहे. विशेषत: ‘लमाण’ या माझ्या नाट्यप्रवासावर आधारित आत्मचरित्राबरोबरच माझ्या ‘रूपवेध’ या संस्थेच्या कार्यावर आधारित त्याच नावाचं पुस्तकही पॉप्युलर प्रकाशनानं काही वर्षांपूर्वी काढलं. अभिनय करतानाची प्रक्रिया, त्यामागचा माझा विचार जसा डोक्यात आला, तसा तो लिहून काढण्याचा मी प्रयत्न केला. नाटक बसवण्याची प्रक्रिया करत असतानाच्या गोष्टी कदाचित त्यात नसतील; पण मी दिग्दर्शित केलेल्या ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ या नाटकाचं दृक-श्राव्य चित्रण दिल्लीतल्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये अभिनेते नाटककार गिरीश कार्नाड यांच्या पुढाकारातून चित्रित करण्यात आलं. त्यात मी व माझी पत्नी दीपा, तसंच काही पात्रं वगळता बाकी नवीन होते; पण त्याची सीडीही काढण्यात आली. ‘रूपवेध’ या पुस्तकाबरोबरच प्रकाशक रामदास भटकळ यांनी ती तेव्हा जाणकारांसाठी उपलब्ध करून दिली. मी अभिनय केलेल्या ‘नटसम्राट’ची डीव्हीडी तर खूप नंतर आली. जे शक्य आहे, ते करायचा प्रयत्न मी केला आहे. हे सारे नाट्यप्रेमी रंगकर्मींनी वाचावे व पाहावे यासाठी आहे. किमान मी काय विचार केला व सादर केले हे तरी त्यातून कळेल.

- तत्त्वचिंतक प्लेटो व शंभू मित्रा यांची आदर्श अभिनेत्याची व्याख्या करणारी दोन वचनं आहेत: ‘अॅन अॅक्टर शुड बी अॅन अॅथलेटिक फिलॉसॉफर. यू आर दी इन्स्ट्रुमेंट अँड यू आर दी प्लेअर!’ तुम्हाला आवडलेल्या या वाक्यांचा अर्थ तुम्ही कसा लावाल?    
- हे वचन खूप अर्थवाही आहे आणि त्याचा अर्थ स्पष्ट आहे. मला ते कितपत लागू आहे हे माहीत नाही. माझ्या दृष्टीनं अभिनेत्याला आपण काय करतो यासंबंधी तत्त्वचिंतनाची सवय, तसंच बलोपासनाही हवी. आपलं शरीर व्यवस्थित ठेवताना वाचन व चिंतनही करायला हवं. त्या अर्थानं ‘अॅथलेट फिलॉसॉफर’ या शब्दांचा अर्थ सम्यक जीवन आपल्या कब्जात घेण्याचा नटानं प्रयत्न करायला हवा. त्यात कशाचाही अपवाद करता कामा नये. सर्व प्रकारची कामं करण्याची तयारी ठेवायला हवी. जीवनाबद्दलची जाण जाणीवपूर्वक वाढवायला हवी. सुदैवानं या दोन्ही गोष्टींची मला आवड आहे. 

(डॉ. लागू यांच्याशी विवेक सबनीस यांनी साधलेल्या या संवादाची झलक दाखविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search