Next
तिकीट टू राइड
BOI
Thursday, March 08 | 06:45 AM
15 0 0
Share this story

वॉल्टर इमिलिओ डिसूझा या कलाकाराचे ‘तिकीट टू राइड’ हे २००७मध्ये भरवलेले प्रदर्शन मी पाहिले होते. त्याचे हे प्रदर्शन माझ्यासाठी प्रिंटमेकिंग विषयातील वैचारिक, कलात्मक आणि तांत्रिक दृष्टिकोनाचा उत्कृष्ट संगम असलेला अनुभव ठरला आहे...’ ‘स्मरणचित्रे’ या सदरात आज पाहू या त्याच आगळ्यावेगळ्या प्रदर्शनाबद्दल...
.......
वॉल्टर डिसूझा या गुजरातमधील चित्रकाराच्या चित्रांचे प्रदर्शन २००७मध्ये मुंबईतील पंडोल आर्ट गॅलरीने आयोजित केले होते. त्या प्रदर्शनात प्रामुख्याने समोरून दिसणारे ट्रक्स किंवा लॉरीज; लांबलचक किल्लीची आकृती; जड गोलाकार वजन उचलणारी व्यक्ती, बहुधा ते वॉल्टरचे आत्मचित्र होते; हँगरला टांगलेला पट्टेरी वाघाचे डिझाइन असलेला स्त्री वेश; तीनचाकी सायकल आणि काही गॉगलच्या आकृत्या अशा विषयांचे वैविध्य असलेल्या प्रिंट्सचे हे प्रदर्शन. शीर्षक होते ‘तिकीट टू राइड.’

१९६५च्या सुमारास बीटलने ‘तिकीट टू राइड’ हे गाणे प्रसिद्ध केले हे. पूर्वीच्या संगीतापेक्षा त्यामध्ये वेगळे संगीत वापरले होते. ते गाणे जणू ६०च्या दशकातील नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करीत होते. त्यापूर्वीच्या बीटलच्या गाण्यात हात हातात घेणे, चुंबन, प्रेम अशा तारुण्यसुलभ कल्पनांचा भरणा होता. परंतु ‘तिकीट टू राइड’मध्ये खऱ्याखुऱ्या जगातील वास्तव होते. हे एक ‘हेवी मेटल साँग’ म्हणता येईल असे आहे. तरुणाईची बदला घेण्याची भूमिका, वैतागण्याची आणि बदल घडवण्याची वृत्ती आणि प्रस्थापित व्यवस्थेवरचा राग अशा नानाविध वृत्तींना ‘तिकीट टू राइड’ने आपल्यात सामवले होते. १९६८च्या सुमारास पॅरिस, शिकागो येथे शेकडो तरुणांनी पोलिसांविरुद्ध, प्रस्थापितांविरुद्ध बंड केले. त्याला या गाण्याची साथ होती. 

भारतात त्या सुमाराला स्वातंत्र्यापूर्वी जन्मलेल्या माणसांमध्ये देशप्रेमादि भावना होत्या. परंतु स्वातंत्र्याच्या सुमारास जन्मलेल्यांच्या मनात बीटलबद्दल आकर्षण निर्माण झाले होते. ज्यांना ‘मिडनाइट्स चिल्ड्रन’ म्हणतात, ती पिढी आता बीटलच्या प्रेमात होती. वॉल्टर बहुधा त्यापैकी एक असावा. वॉल्टरच्या त्या प्रदर्शनातील चित्रकृती नावीन्यपूर्ण होत्या. बदलत्या जगाला कवेत घेऊ पाहणाऱ्या होत्या. रोजच्या जीवनातील घटना, दृष्टिकोन, कल्पना आणि चित्रकथन यांचा मेळ वॉल्टरच्या या प्रदर्शनात होता. 

माय व्हेरी ओन
‘प्रिंट मेकिंग’ हा कलाप्रकार तसा नवा नसला, तरीही त्याचे स्वरूप सर्वसामान्यांना माहीत असतेच असे नाही. ‘प्रिंट मेकिंग’ म्हणजे कलाकृतीच्या कलात्मक प्रती घेण्याची कृती होय... त्यासाठी लाकूड, धातू किंवा दगडाच्या गुळगुळीत पृष्ठभागावर कलाकृती कमी-जास्त उठावात कोरली जाते. त्या तयार झालेल्या ठशांचे छाप होतात. त्याला कलाजगतात ‘प्रिंट्स’ ही संज्ञा आहे. 

वॉल्टरने अशा लाकडी पृष्ठभागावर कोरलेल्या आणि त्याचे ठसे किंवा प्रती घेतलेल्या काळ्या रंगातील कलाकृती या प्रदर्शनात ठेवल्या होत्या. एका चित्रात तर लाकूड कोरण्याची पाच हत्यारे चित्रित केली होती. समान मुठी, परंतु पुढे धार असलेल्या बाजूंचे नानाविध आकार त्याने तपशिलाने दाखवले होते. रचनेच्या दृष्टीने सर्वच्या सर्व हत्यारे पांढऱ्या पृष्ठभागाच्या मधोमध काढलेली होती. प्रदर्शनातील बरीच चित्रे वूडकट प्रिंट माध्यमातील होती. एका चित्रात ‘तिकीट टू राइड’ असे लिहिले होते. वरच्या तुकड्यात रेसचा घोडा व खालच्या तुकड्यात रेसची कार काढलेली होती. चित्राला ‘ट्रॉय’ असे शीर्षक होते. 

डे इज डन
दुसऱ्या एका ‘वूडकट’चे शीर्षक ‘माय व्हेरी ओन’ असे होते. त्यामध्ये जड गोलाकार वजनी गोळा उचलणारा वॉल्टर रेखाटला होता. वूडकट या माध्यमातील कलात्मक मूल्ये व तांत्रिक पथ्ये वॉल्टरने यात जपली होती. प्रत्येक कलात्मक माध्यमाची काही वैशिष्ट्ये असतात. तशी वूडकट माध्यमाची आहेत आणि ती सर्व या प्रिंटमध्ये दिसतात. ‘डे इज डन’ या नावाने एक प्रिंट होता. त्यामध्ये स्त्रीचा एक आधुनिक वेश हँगरला टांगला आहे, असे चित्रण होते. फॅशन जगतात ज्याला अॅनिमल प्रिंट म्हणतात, त्या कापडाचा हा ड्रेस. वाघाच्या कातड्याचा पट्ट्यापट्ट्याच्या कापडाचा टॉप व आत लावलेला त्याच कापडाचा स्कर्ट असा चित्रविषय होता. छातीच्या भागावर दोन्ही बाजूंना वाघाचे डोळे होते. पार्श्वभूमी अर्धी काळी व खालच्या पार्श्वभूमीचा भाग पांढरा होता. वॉल्टरच्या या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याने प्रिंटच्या सोबतीने कोरलेले लाकडी ठसे मांडलेले होते. पाहणाऱ्याला या ठशांमुळे या माध्यमाचा मुळातून अनुभव येत होता. 

एक चित्रात तीनचाकी सायकल काढली होती. या ‘वूडकट’मध्ये तीनचाकी सायकल चालवणारी व्यक्ती प्रौढ होती. खरे तर गुडघ्यांच्या खालचाच भाग चित्रात होता व सायकलचे हँडल, पॅडल आणि तिन्ही चाके दिसत होती. व्यक्तीचे सायकलशी असलेले प्रमाण व पायात चितारलेल्या फॉर्मल शूजमुळे त्यातील वेगळेपण, वयाने मोठा असलेला मनुष्य तीनचाकी सायकलवर आहे, हे अधोरेखित होत होते. पाच-पाच फुटापर्यंत लांब असे काही प्रिंट्स किल्लीचे चित्रण केलेले होते. साधी किल्ली, परंतु तिच्या नाना कळा व आकार मोठ्या अभ्यासाने दर्शविले होते. 
‘३० जानेवारी २००५’ या शीर्षकाचे एक चित्र होते. वूडकट होते. मला नीटसे समजले नाही. त्या दिवशी घडलेल्या घटनेचा संदर्भ माहीत नसल्याने मी तो प्रिंट समजावून घेवू शकलो नाही. कला पाहताना असले संदर्भ गरजेचे असतात, असे मानायला या कलाकृतीने भाग पाडले. ‘तिकीट टू राइड’ हा आणखी एक वूडकट होता. वरच्या भागात नानाविध प्राणी चितारले होते. मध्ये शीर्षक आणि खालील बाजूला रेसची कार रेखाटली होती. 


वॉल्टरच्या  प्रदर्शनात सर्वांत आकर्षक होते ते धातूचे ट्रक्स. समोरून पाहिलेले ट्रक्स, बाजूला थोडा परिसर, अशा पद्धतीची धातूची, परंतु सपाट पृष्ठभागालगतची शिल्पे त्याने केली होती. उत्थित शिल्पे म्हणता येतील, अशा पद्धतीची ही शिल्पे होती. ती शिल्पे म्हणजे कौशल्याच्या परमोच्च बिंदूचा नमुना होता. ‘लॉस्ट’ नावाच्या ट्रकच्या शिल्पाच्या बाजूला नाश पावलेली वृक्षराजी होती. ‘निअसली देअर’ या नावाच्या ट्रकच्या आणखी एका शिल्पात औद्योगिकीकरण, वाहननिर्मिती व्यवसाय याचे चित्रण ट्रकच्या बाजूला होते. या ट्रकच्या काचेत शहराचे प्रतिबिंब चितारले होते. 

वॉल्टर इमिलिओ डिसूझा हा मूळचा मुंबईचा. ‘फाइन आर्टस्’मध्ये बॅचलर आणि मास्टर्स बडोद्यातील एम. एस. युनिव्हर्सिटीमधून पूर्ण केले व पुढे कनोरिया सेंटर, नॅशनल स्कूल ऑफ डिझाइन, आर्किटेक्ट कॉलेज, सेंट्रल विद्यापीठ, हैदराबाद इत्यादी ठिकाणी कला, प्रिंटमेकिंग, डिझाइन आदी विषयांचा प्राध्यापक म्हणून तो कार्यरत राहिला आहे. त्याचे हे ‘तिकीट टू राइड’ हे प्रदर्शन माझ्यासाठी प्रिंटमेकिंग विषयातील वैचारिक, कलात्मक आणि तांत्रिक दृष्टिकोनाचा उत्कृष्ट संगम असलेला अनुभव ठरला आहे. पराकोटीची अचूकता ही वॉल्टरसारख्या कलावंतांची जमेची मोठी बाजूच असते, हे या कलाकृतींच्या प्रतिमा पाहतानाही आपल्याला जाणवेल.  

- डॉ. नितीन हडप
ई-मेल : nitinchar@yahoo.co.in

(लेखक पुण्यातील चित्रकार असून, काष्ठशिल्पे, पुरातन वास्तू, फॅशन आदी त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. ‘स्मरणचित्रे’ या पाक्षिक सदरातील सर्व लेख https://goo.gl/w99eTN या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link