Next
सुरेश भट, न. र. फाटक, लक्ष्मीनारायण बोल्ली
BOI
Sunday, April 15, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

‘ओठी तुझ्या न आले अद्याप नाव माझे, अन् ओठ शोधण्याचा माझा स्वभाव नाही’ असं लिहिणारे सुरेश भट, प्रकांडपंडित चरित्रकार न. र. फाटक आणि तेलुगू-मराठीचा दुवा मानले गेलेले साहित्यिक लक्ष्मीनारायण बोल्ली यांचा १५ एप्रिल हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी....
.......
सुरेश श्रीधर भट 

१५ एप्रिल १९३२ रोजी अमरावतीमध्ये जन्मलेले सुरेश श्रीधर भट म्हणजे मराठी गझलांचे शहेनशाह! माधव जूलियन यांनी २० आणि ३०च्या दशकात गझल या काव्यप्रकाराशी मराठी माणसाची ओळख करून दिली खरी; पण गझल मनात उतरवली, रुजवली आणि फुलवली ती मात्र सुरेश भट यांनीच आणि तेही तिला भावकाव्याचा बाज देऊन! विख्यात समीक्षक द. भि. कुलकर्णी यांनी भटांचा गौरव करताना त्यांना ‘नवसंप्रदायप्रवर्तक कवी’ असं म्हटलं होतं. 

अमरावतीमध्ये शिक्षक म्हणून नोकरी करताकरता त्यांचं गझल लिहिणं सुरू होतं. त्या गझलांना पंडित हृदयनाथ मंगेशकरांसारखा गुणग्राही मिळाला आणि त्यांनी त्यांना चाली लावून त्या जगाच्या पाठीवर जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथपर्यंत पोहोचवल्या. 

त्यांच्या तरल संवेदनेचा एक नमुना -

थकतात नेत्र जेथे
तेथेच भेटशी तू
सरतात अर्थ जेव्हा
तेव्हाच बोलशी तू!

एल्गार, काफला, झंझावात, रंग माझा वेगळा, रसवंतीचा मुजरा, रूपगंधा, सप्तरंग, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

गडचिरोलीमध्ये भरलेल्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 

१४ मार्च २००३ रोजी त्यांचं नागपूरमध्ये निधन झालं. 

(सुरेश भट यांच्या कवितांबद्दलचे लेख वाचण्यासाठी https://goo.gl/dMnE3g येथे क्लिक करा. सुरेश भट यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
........

नरहर रघुनाथ फाटक

१५ एप्रिल १८९३ रोजी जांभळीमध्ये (भोर, जि. पुणे) जन्मलेले नरहर रघुनाथ फाटक ऊर्फ ‘नर’ हे इतिहाससंशोधक, प्रकांडपंडित आणि चरित्रकार म्हणून विख्यात आहेत. त्यांची संत वाङ्मयाची चिकित्सा गाजली होती. 

सुरुवातीच्या काळात त्यांनी विविधज्ञानविस्तार, इंदुप्रकाश, नवाकाळ, चित्रमय जगत या नियतकालिकांमध्ये काम केलं होतं. सत्यान्वेषी, फरिश्ता, अंतर्भेदी अशा टोपण नावांनीही त्यांनी लेखन केलं आहे. 

ते मराठी पत्रकार संघाचे पहिले अध्यक्ष होते. 

नामदार गोपाल कृष्ण गोखल्यांच्या त्यांनी लिहिलेल्या चरित्राला १९७० सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. 

लोकमान्य, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, श्री ज्ञानेश्वर वाङ्मय आणि कार्य, श्री एकनाथ वाङ्मय आणि कार्य, यशवंतराव होळकर, आदर्श भारतसेवक, रामदास वाङ्मय आणि कार्य, मुंबई नगरी, नाट्याचार्य कृ. प्र. खाडिलकर, स्वातंत्र्यसैनिक चरित्र कोश, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

२१ डिसेंबर १९७९ रोजी त्यांचं मुंबईत निधन झालं. 

(नरहर फाटक यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
..........

लक्ष्मीनारायण बोल्ली  

१५ एप्रिल १९४४ रोजी जन्मलेले लक्ष्मीनारायण बोल्ली हे उत्तम कवी आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध होते. तेलुगू आणि मराठीमधला एक मोठा दुवा म्हणून ते ओळखले जातात. 

‘एका साळीयाने’ हे तेलुगु समाजाचा वेध घेणारं त्यांचं आत्मचरित्र प्रचंड गाजलं आणि लोकप्रिय झालं. त्याला राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाला होता. 

दक्षिण भाषेतील रामायणे, कृष्णदेवराय, योगी वेमना, कविराय रामजोशी, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

२३ फेब्रुवारी २०१८ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

(लक्ष्मीनारायण बोल्ली यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link