Next
‘बेरोक जिंदगी’मुळे अनेकांनी मिळवला दम्यावर विजय
जागतिक दमा दिवसानिमित्त डॉ. पोफळे, डॉ. कदम यांची माहिती
प्रेस रिलीज
Tuesday, May 07, 2019 | 05:44 PM
15 0 0
Share this article:

पत्रकार परिषदेत बोलताना डावीकडून डॉ. हिमांशू पोफळे व डॉ. शशांक कदम.

पुणे : ‘दम्यासंबंधित गैरसमज दूर करून लोकांच्या मनातील भीती कमी करण्याच्या उद्देशाने प्रयत्न केले जात आहेत. जागतिक दमा दिनानिमित्ताने दमाच्या यशस्वी नियोजनासाठी ‘बेरोक जिंदगी’ उपक्रमातून इन्हेलेशन थेरपीविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठीही प्रयत्नशील आहे. इन्हेलेशन थेरपी आणि दम्याच्या रुग्णांना समाजात अधिक स्वीकारार्ह बनवण्याचे ध्येय हाती घेण्यात आले असून, यामुळे रुग्ण आणि त्यांच्या फिजिशयन्समध्ये चांगला संवाद निर्माण होऊ शकेल. आजवर ‘बेरोकजिंदगी’ उपक्रमांतून अनेकांनी दम्यावर विजय मिळवला आहे. या जनजागृती अभियानाला सर्व रुग्णांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,’ अशी माहिती पुण्यामधील चेस्ट फिजिशियन डॉ. हिमांशू पोफळे आणि पेडियाट्रिशियन, चेस्ट फिजिशियन डॉ. शशांक कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. पोफळे म्हणाले, ‘दमा आणि इन्हेलेशन थेरपीविषयीचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. दम्याचा लोकांच्या जीवनावर होणारा परिणाम व त्याचे गांभीर्य कमी करण्यात इन्हेलेशन उपचारपद्धती मोठी भूमिका बजावते. इन्हेलेशनच्या माध्यमातून घेतल्यामुळे औषधे थेट फुफ्फुसांपर्यंत पोहोचतात. रुग्णांना उपचारांचा संपूर्ण फायदा मिळावा यासाठी सांगण्यात आलेल्या उपचारांचा त्यांनी पूर्णपणे स्वीकार करणे गरजेचे आहे. दमा रोखण्यासाठी आणि त्याच्या लक्षणांपासून सुटका करण्यासाठी, तसेच दम्याचा त्रास कमी करून दम्याच्या विकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी इन्हेलेशन उपचार केले जातात; पण जेव्हा रुग्ण जनरल प्रॅक्टिशनरला सहाय्य करून त्याने सांगितलेल्या पद्धतीने औषधे घेतो, तेव्हाच त्या उपचारांचा परिणाम दिसतो. इन्हेलर्स, स्पेसर्स, रोटाहेलर्स आणि नेब्युलायझर्स या साधनांच्या माध्यमातून औषधे इन्हेल करण्याची अद्ययावत सुविधा निर्माण झाल्यामुळे दम्याचे नियोजन सोपे झाले आहे. औषधे थेट आवश्यक अवयवापर्यंत म्हणजेच फुफ्फुसांत पोहोचतात. त्यामुळे कोणतेही दुष्परिणाम न होता कमी किंमतींमध्ये औषधांचे सर्वाधिक फायदे मिळतात. लक्षणे नाहीत म्हणजे दमा नाही, हा समज चुकीचा आहे. जरासे बरे वाटू लागले की औषधे थांबवणे योग्य नाही. त्यामुळे आजार पुन्हा बळावतो आणि त्याचा दुहेरी दुष्परिणाम होतो. औषधोपचार थांबवण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. दम्याला दीर्घकालीन उपचारांची गरज असते.’

डॉ. कदम म्हणाले, ‘दीर्घकालीन दम्यासारख्या आजाराबाबत जागृती निर्माण करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘बेरोक जिंदगी’मुळे दम्यावर विजय मिळवता येणार आहे. रुग्णांना त्यांच्याच आजारावर अधिक योग्य पद्धतीने उपचार घेण्यामध्ये स्वत:ला सहभागी करून घेता येणार आहे. डॉक्टरांच्या साह्याने दम्यावर नियंत्रण मिळवून इन्हेलरचा कमीत-कमी वापर करण्याचे ध्येय गाठणे आणि त्याच्या माध्यमातून जीवनाचा संपूर्ण आनंद लुटणे हेच साध्य आहे. दम्याच्या व्यवस्थापनाबाबत अधिक संवाद साधण्याला प्रोत्साहन देऊन आपण जागतिक दमा दिन साजरा करूया.’

‘रुग्णांनी इन्हेलर्सचा वापर थांबवण्यामागे औषधोपचारांचा खर्च, दुष्परिणाम, इन्हेलर साधनांबाबत गैरसमज यांसारखी अनेक कारणे आहेत. मानसिक अडचणींमुळेही वापर बंद केला जातो. त्यामध्ये डॉक्टरांच्या उपचारांबद्दल असमाधान, अवास्तव अपेक्षा, एखाद्याच्या परिस्थितीबद्दल मनात राग, रोगाच्या स्थितीला कमी लेखणे, आरोग्याबाबत निष्काळजीपणा आदी. दम्यावर विजय मिळवायचा असेल, तर परिणामकारक उपचार म्हणजेच इन्हेलेशन थेरपी घेणे गरजेचे आहे. भारतात हे उपचार अगदी कमीत-कमी म्हणजे दिवासाला चार ते सहा रुपयांपर्यंत इतक्या कमी किंमतीत उपलब्ध आहेत,’ असे डॉ. कदम यांनी सांगितले.

‘इन्हेल्ड कॉर्टिकॉस्टेरॉइड थेरपी (आयसीटी) हा दम्याच्या नियंत्रणाची पायाभरणी आहे. कोणत्याही उपचारांचा परिणाम साधण्यासाठी व सुरक्षितता राखण्यासाठी पद्धती आणि आवश्यक तेवढे औषध देणे महत्त्वाचे असते. औषध दाह होणार्‍या श्वसनमार्गात लहान डोसच्या स्वरूपात थेट पोहोचते. त्यामुळे संभाव्य दुष्परिणाम कमी होतात. आयसीटीद्वारे दिल्या जाणार्‍या औषधाच्या प्रमाणाच्या तुलनेत तोंडावाटे दिल्या जाणार्‍या औषधांचे प्रमाण अधिक असल्याने दुष्परिणाम संभवतात. तरीही, अज्ञानामुळे अनेक रुग्ण हे उपचार घेतात. अनेकांनी ‘स्टिरॉइड्ज’ हा शब्द ऐकला की त्यांना शरीरातील स्नायू बळकट करणार्‍या पदार्थांचीच आठवण होते. बरेचदा कॉर्टिकोस्टिरॉइड्ज आणि अनॅबोलिक स्टिरॉइड्ज यांच्यात गोंधळ केला जातो,’ अशी माहिती डॉ. पोफळे यांनी दिली.

एक वर्षाच्या मुलापासून सर्व वयोगटांतील साध्या किंवा वारंवार होणार्‍या दम्यासाठी इन्हेल्ड कोर्टिकोस्टिरॉइड् थेरपीचा (आयसीएस) वापर करावा, राष्ट्रीय दमा शिक्षण आणि प्रतिबंधक कार्यक्रमाच्या (एनएईपीपी) ताज्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे सांगण्यात आले आहे. इन्हेल्ड कोर्टिकोस्टिरॉइड्मुळे रुग्णाच्या दैनंदिन जीवनाच्या दर्जात सुधारणा होत असल्याचे लक्षात आले आहे. दम्याचा झटका येण्याचे प्रमाण कमी करण्यात, तसेच दमा नियंत्रणात, तोंडावाटे स्टिरॉइड घेण्याची गरज कमी करण्यात, तसेच ईआरच्या वार्‍यांचे प्रमाण कमी करण्यात व रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण कमी करण्यातही इन्हेल्ड कोर्टिकोस्टिरॉइड्जची मदत होत आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search