पुणे : हडपसर येथील ‘घरटं’ या संस्थेमधील अनाथ मुलांनी भारतीय लष्कराने दोन वर्षापूर्वी केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’ कारवाईत सैनिकांनी गाजविलेल्या असामान्य शौर्याबद्दल अभिमान आणि कृतज्ञता व्यक्त केली. महाराष्ट्र भाजपा ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष विकास रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेत ‘सर्जिकल स्ट्राइक दिन’ साजरा करण्यात आला.
या वेळी निवृत्त कॅप्टन व्ही. बी. कोरे, निवृत्त कॅप्टन वसंत आजमाने, निवृत्त लेफ़्टनंट मधुकर रोडगे, सैनिक बाळासाहेब भोईटे, सोमनाथ अडगळे, भालचंद्र भोसले उपस्थित होते. त्यांना सर्जिकल स्ट्राइकची प्रतिमा, भगवद्गीता आणि पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
या वेळी विकास रासकर म्हणाले, ‘आपले सैनिक देशांच्या सीमांचे रक्षण खंबीरपणे करत असल्यामुळे आपण सुरक्षितपणे झोप घेतो. स्वातंत्र्यानंतर अनेक युद्धांमध्ये भारतीय सैनिकांच्या अपार शौर्यामुळे आपण शत्रूला धूळ चारली आहे. सर्जिकल स्ट्राइक ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असून, शत्रूच्या मनोधैर्यावर विपरीत परिणाम करणारी आहे. आपल्या सैनिकांनी प्रसंगी प्राणांची बाजी लावून देशाच्या स्वातंत्र्याचे रक्षण केले आहे. त्यांचा सर्वांना अभिमान आहे.’
या वेळी देशभक्तिपर गीते सादर करण्यात आली, तसेच सैन्यदलाबद्दल माहिती सांगण्यात आली.