Next
नर्मदा परिक्रमा... एका चित्रकाराच्या नजरेतून!
आकाश गुळाणकर
Tuesday, April 10, 2018 | 05:02 PM
15 0 0
Share this storyपुणे :
नर्मदा परिक्रमा ही तशी सर्वांनाच ऐकून माहीत असलेली गोष्ट आहे. यामध्ये येणारे अनेक अनुभव आपल्याला एक माणूस म्हणून समृद्ध करतात, असे ही परिक्रमा केलेल्यांचा अनुभव सांगतो. त्या अनुभवांवर अनेक पुस्तकेही आहेत; पण अजय देशपांडे या अवलियाने नर्मदा परिक्रमा एका चित्रकाराच्या नजरेतून पाहण्याचा आणि आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ‘नर्मदा ट्रेल्स’ हे त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन सध्या पुण्यात भरले असून, ते १४ एप्रिलपर्यंत पाहता येणार आहे. 

सायकलवरून नर्मदा परिक्रमा करत असताना अजय देशपांडे यांनी रस्त्यात त्यांना भेटलेली माणसे, निसर्ग, वास्तू आणि नर्मदा यांना कॅनव्हासवर आणून चित्रकलेचा एक उत्कृष्ट नमुना रसिकांपुढे उभा केला आहे. मूळचे यवतमाळचे असेलेले चित्रकार अजय देशपांडे यांना नर्मदा परिक्रमेबद्दल माहिती मिळाली व त्यांची परिक्रमेबाबतची उत्सुकता चाळवली. त्यांनी सायकलवरून ही परिक्रमा करायचे ठरविले. त्याबाबत ते म्हणाले, ‘परिक्रमा करणाऱ्या अन्य लोकांप्रमाणे मी आध्यात्मिक भाव घेऊन निघालो नव्हतो. त्यामुळे मी केलेल्या या प्रवासाला मी परिक्रमेपेक्षा नर्मदा भ्रमंती असे म्हणेन. एक चित्रकार म्हणून मी ही भ्रमंती करायचे ठरविले.’ प्रवासाच्या तयारीबद्दल ते म्हणाले, ‘मी व माझा मित्र विवेक मराठे असे दोघे या प्रवासाकरिता गेलो. त्यासाठी महिनाभर आधी आम्ही दररोज सायकलिंगचा सराव केला. आम्ही महिनाभर रोज ४० किलोमीटर सायकलिंग करायचो.’

चित्रांच्या निर्मितीप्रक्रियेतील अनुभवांचे कथन करत असताना त्यांनी संपूर्ण प्रवासादरम्यान बदलत जाणाऱ्या टापूबद्दल सागितले. तेथील भाषा, संस्कृती, राहणीमान या सर्वांचे त्यांनी केलेले निरीक्षण त्यांच्या चित्रांतून दिसून येते. अशाच एका साधूच्या चित्राबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘मला हा साधू दिसला. त्याचे चित्र काढताना मी थोडीशी ‘आर्टिस्टिक लिबर्टी’ घेऊन त्याच्या रंगसंगती काहीशा फिकट केल्या. एक साधू म्हणून त्याच्यातून गळून पडलेले ‘मीपण’ मला त्या चित्रातून प्रतिबिंबित करायचे होते. सामान्य लोकांच्या पोर्ट्रेट्समध्ये मातकट रंगांचा जास्त वापर मी केला आहे. कारण, अर्थातच त्यांचे मातीशी असेलेले जोडलेपण.’ या परिक्रमेच्या मार्गातील ऐतिहासिक जागा, त्यांचे महत्त्व यांच्याबद्दल माहिती वाचून त्यांनी प्रवासाला सुरुवात केली. याच जागा चित्राच्या माध्यमातून कॅनव्हासवर उतरवून अजय देशपांडे यांनी त्यात आपला ‘पर्स्पेक्टिव्ह’ मांडला आहे.
 
वेगवेगळे फोटोज, स्केचेस यांच्या माध्यमातून त्यांनी हे चित्रण केले आहे. एकूण दीड महिन्याच्या मेहनतीनंतर हे ४६ चित्रांचे प्रदर्शन उभे राहिल्याचे ते सांगतात. तसेच आणखी एक वर्षभर तरी या विषयावर काम करणार असल्याचे सांगून त्यांनी पुढील प्रदर्शनाचीही ग्वाही दिली. 

अजय देशपांडेविशेष म्हणजे या सर्व चित्रांमध्ये नर्मदा नदी प्रत्यक्षात कुठेच दिसत नाही; पण तिच्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या सर्व गोष्टी या चित्रांमध्ये दिसतात. याबद्दल ते म्हणाले, ‘नर्मदा ही केवळ एक नदी नाही, तर ती एक प्रवृत्ती आहे. नर्मदेला स्वतःचा एक पोत आहे. तिच्या आसपासचा सधन प्रदेश, तेथील माणसे, सौंदर्य, झाडी, त्या प्रदेशात असणाऱ्या वास्तू या सगळ्याला मी नर्मदेचा पोत म्हणतो. हाच पोत मी माझ्या चित्रांमधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार या चित्रांचे रंग, मांडणी यात मी चित्रकार म्हणून थोडेसे स्वातंत्र्यदेखील घेतले आहे.’

 या प्रदर्शनात एकूण ४६ चित्रे मांडलेली आहेत. त्यापैकी काही अॅक्रॅलिक कलरमधील, तर काही केवळ एकाच रंगातून पेनाने काढलेली चित्रे आहेत. प्रत्येक चित्राची एक भावना आहे, पोत आहे. ही सर्व चित्रे पाहताना चित्रकाराला जाणवलेला हा पोत आपल्याला परिक्रमेबद्दल एक वेगळी दृष्टी देऊन जातो. हे प्रदर्शन पुण्यातील भांडारकर रस्त्यावरील आर्ट टू डे गॅलरीत १४ एप्रिलपर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे.

(अजय देशपांडे यांच्या या प्रदर्शनातील चित्रांची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत...)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link