Next
दोन दिवस अमावास्या असल्याने दीपपूजन कधी करावे?
BOI
Friday, August 10 | 04:02 PM
15 0 0
Share this story

आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षातील शेवटचा दिवस म्हणजेच दीप अमावास्या. या अमावास्येला दिव्यांची अवस किंवा दिवली अमावास्या म्हणून संबोधले जाते. अंधारावर मात करून तेजाकडे घेऊन जाणाऱ्या दिव्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस. आपल्या जीवनातील वाईट गोष्टी नष्ट होऊन आपल्या जीवनात सौख्याचा प्रकाश यावा, या हेतूने या अमावास्येच्या सायंकाळी घरातील सर्व दिव्यांचे पूजन केले जाते. पितळी, तांब्याचे दिवे, निरांजने, समया, लामणदिवे यांची कापूरवाती लावून पूजा केली जाते. सायंकाळी लक्ष्मी घरी येते आणि दारिद्य्र बाहेर निघून जाते, सुखसमृद्धी सदैव नांदते, अशी त्यामागची भावना असते.

१० ऑगस्ट २०१८ रोजी सायंकाळी सात वाजून आठ मिनिटांनी अमावास्या सुरू होत आहे. ११ ऑगस्टला दुपारी तीन वाजून २८ मिनिटांनी अमावास्या संपत आहे. या दिवशी शनिवार असल्याने दर्श अमावस्येच्या दिवशी दीपपूजन करावे. दाते पंचांगानुसार, ११ ऑगस्ट रोजीच दुपारी तीन वाजून २८ मिनिटांपर्यंत दीपपूजन करावे. शक्यतो सकाळी घरातील देवांच्या रोजच्या पूजेबरोबर दीपपूजन करणे उत्तम.

दीपपूजन कसे करावे?
घरातील दिवे दूध, पाण्याने धुऊन स्वच्छ करावे. पाटावर वस्त्र घालून त्यावर दिवे ठेवावेत. त्यांची पूजा करावी. या दिवसापासूनच पत्रीचे महत्त्व सुरू होते. आघाडा, दूर्वा, पिवळी फुले यांनी दिव्यांची पूजा करावी. गोडाचा नैवेद्य अर्पण करावा. आपल्या घरातील लहान मुलाचे औक्षण करावे. दूर्वा ही वंशवृद्धीचे प्रतीक आहे. त्यामुळे त्याही अर्पण करून प्रार्थना करावी. या दिवशी सुवासिनी स्त्रिया घरातील दिवे घासून-पुसून एकत्र मांडतात. त्याच्या भोवती रांगोळ्या घालतात व ते दिवे प्रज्ज्वलित करून त्याची पूजा केली जाते. पूजेमध्ये पक्वान्नांचा महानैवैद्य दाखविला जातो. त्या वेळी पुढील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात.

प्रार्थना : 
दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजसां तेज उत्तमम् । 
गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव ॥

प्रार्थनेचा अर्थ :
हे दीपा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link