Next
रत्नागिरीच्या टीमचा नागपुरात सत्कार
‘संगीत मानापमान’चा गौरव
BOI
Tuesday, September 11, 2018 | 02:21 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरीच्या अखिल चित्पावन मंडळाचे राजेंद्र पटवर्धन, श्रीनिवास जोशी, प्रवीण शिलकर, अमेय धोपटकर, श्री. बापट यांना पारितोषिक देताना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व कीर्ती शिलेदार.

रत्नागिरी : महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित बालनाट्य, संस्कृत, हिंदी, हौशी मराठी गद्य नाट्य व व्यावसायिक, हौशी संगीत नाट्यस्पर्धांचे बक्षीस वितरण नागपूर येथे शनिवारी रात्री (आठ सप्टेंबर) झाले. रत्नागिरीतील अखिल चित्पावन ब्राह्मण सहायक मंडळाच्या ‘संगीत मानापमान’ला द्वितीय पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे त्यांना ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नाट्यसंमेलन अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांनी गौरवले.

या कार्यक्रमाचे यजमानपद प्रथमच नागपूरला लाभले होते. तेथील वसंतराव देशपांडे नाट्यगृहात हा कार्यक्रम झाला. या वेळी अभिनेते अभिजित खांडकेकर, भारत गणेशपुरे, अ. भा. मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी उपस्थित होते. ५७व्या संगीत नाट्य स्पर्धेत चित्पावन ब्राह्मण मंडळाने पदार्पणातच घवघवीत यश संपादन केले. त्यांनी सादर केलेल्या ‘संगीत मानापमान’ या नाटकाला पाच वैयक्तिक पारितोषिकांसहित सांघिक द्वितीय क्रमांक मिळाला. तबला (प्रथम) निखिल रानडे, ऑर्गन (प्रथम) विलास हर्षे, संगीत मार्गदर्शन (द्वितीय) श्रीनिवास जोशी, गायन (रौप्यपदक) प्रवीण शीलकर (भूमिका धैर्यधर) व सिद्धी बोंद्रे (भूमिका भामिनी) यांना गौरविण्यात आले.

रत्नागिरीतील आश्रय सेवा संस्थेने सादर केलेल्या ‘संगीत लावण्यसखी’लाही वैयक्तिक बक्षिसे मिळाली. उत्कृष्ट नेपथ्यासाठी दादा लोगडे यांना प्रथम, नाट्यलेखनाचे द्वितीय पारितोषिक अमेय धोपटकर यांना, उत्कृष्ट अभिनयाचे प्रमाणपत्र दिग्दर्शक नितीन जोशींना व उत्कृष्ट गायनासाठीचे प्रमाणपत्र संचिता जोशी हिला प्रदान करण्यात आले.

सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे दिल्लीला गेल्यामुळे त्यांनी दिलेल्या संदेशाचा व्हिडिओ दाखविण्यात आला. विविध सांस्कृतिक कार्यक्रमही सादर झाले. नागपूर झाडीपट्ट्यातील कलाकारांनी विनोदी स्किट्स सादर केली. युवा कलाकारांनी नृत्य प्रकारांचे सादरीकरण करून कार्यक्रमात रंगत आणली. माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. अटलबिहारींच्या कविता स्क्रीनवर दाखवून व ‘मोरूची मावशी’फेम विजय चव्हाण यांना मावशीच्या गाण्याचा प्रवेश सादर करून श्रद्धांजली वाहण्यात आली. स्पर्धेत प्रयोग चालू असताना रंगभूमीवर देवाज्ञा झालेल्या राणे यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या मुलीने पुरस्कार स्वीकारला. त्या वेळी राणे यांना सर्वांनी उभे राहून आदरांजली वाहिली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search