Next
एलिफंटा महोत्सवाला एक जूनपासून सुरुवात
विविध कार्यक्रमांसह हेरीटेज वॉकसारख्या उपक्रमाचे आयोजन
प्रेस रिलीज
Thursday, May 30, 2019 | 12:18 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : सूर, संगीत, शिल्प आणि चित्रकलेचा अविष्कार असलेला एलिफंटा महोत्सव यंदा एक आणि दोन जून २०१९ रोजी एलिफंटा अर्थात घारापुरीच्या बेटांवर होत आहे. ‘स्वरंग’ ही यंदाच्या सोहळ्याची संकल्पना असून, दोन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात गीत, संगीत, गायन, पर्यटन, चित्रकला आदींची रेलचेल असणार आहे,’ अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी येथे दिली.

अधिक माहिती देताना ते म्हणाले, ‘एक जूनला सायंकाळी सहा वाजता गेट वे ऑफ इंडिया येथे महोत्सवाचे उद्घाटन केले जाणार असून, प्रख्यात गायक कैलास खेर यांचा ‘शिवआराधना’ हा सुराविष्कार या सोहळ्याचे मुख्य आकर्षण असेल. दोन जूनला सकाळी ११ ते दुपारी तीन या वेळेत घारापुरीच्या बेटावर शिल्प आणि लेण्यांचे दर्शन घडवणारा हेरिटेज वॉक होणार आहे. शिवतांडव, योगमुद्रा, शिवप्रतिमा, गंगावतरण, अर्धनारीनटेश्वर, त्रिमूर्ती आदी प्राचीन शिल्प, लेण्यांचे निरीक्षण आणि अभ्यास करता येणार आहे. दिव्यांग संस्था आणि अनाथाश्रमातील सदस्यांना लेण्यांची सफर घडवली जाणार आहे.’

दोन जूनला सायंकाळी सात वाजता घारापुरीच्या बेटावर गीत, संगीत आणि चित्रकलेचा अनोखा मिलाफ पाहायला मिळणार आहे. शास्त्रीय गायक राहुल देशपांडे, स्वप्नील बांदोडकर, प्रियांका बर्वे यांच्या गीतांचा कार्यक्रम होईल. या वेळी सुलेखनकार अच्युत पालव, चित्रकार वासुदेव कामत, व्यंगचित्रकार नीलेश जाधव, शील कुंभार आदी कलाकार हे शिवतांडवशी नाते सांगणारा चित्र आविष्कार प्रत्यक्ष सादर करणार आहेत.

मुंबई शहरानजीक दर वर्षी होणाऱ्या या महोत्सवास देश-विदेशातील अनेक पर्यटक भेट देतात. यंदाही या महोत्सवामुळे राज्यातील पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करून पर्यटकांनी मोठ्या संख्येने महोत्सवाला भेट देण्याचे आवाहन रावल यांनी केले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search