Next
बहिणींनी पोलिसांकडे मागितली गावातील दारू बंद करण्याची ओवाळणी
BOI
Tuesday, August 28, 2018 | 03:20 PM
15 0 0
Share this article:

मुलचेरा

गडचिरोली :
 हातात पूजेचे ताट, दिवा, राख्या, मिठाई घेऊन कुठे ४०, कुठे ५०, तर कुठे ७० बहिणी पोलिसांना राखी बांधायला गेल्याचे चित्र जिल्ह्यातील अनेक पोलीस स्टेशनवर दिसत होते. नक्षलग्रस्त अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात रक्षाबंधनाचे औचित्य साधून गावांमधील बहिणी पोलिसांना राखी बांधायला आल्या होत्या. या वेळी महिलांनी फक्त राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली नाही, तर पोलिसांकडे ओवाळणी म्हणून गावातील दारू बंद करण्याचे व गावाचे दारूपासून रक्षण करण्याचे वचन मागितले. 

नारगुंडा

गडचिरोली जिल्ह्यात २७ मार्च १९९३पासून दारूबंदी आहे. परंतु अवैध रीतीने मिळणाऱ्या दारूमुळे आजही महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नवऱ्याने पैसे उडवणे असो किंवा गावात शिवीगाळ होणे असो, या सगळ्याचा त्रास महिलांना सहन करावा लागतो. 

गडचिरोली

बहिणींचे रक्षण करण्याचे वचन देण्याचा आणि वचन घेण्याचा सण म्हणून रक्षाबंधन साजरे होते. त्याच निमित्ताने जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातील महिलांनी आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमधील पोलिसांना राख्या बांधल्या. ‘भाऊ, माझ्या परिवाराचे, गावाचे दारूपासून रक्षण कर. रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून गावातील दारू बंद कर’, असे आवाहन या महिलांनी पोलिसांना केले.

असरअली पोलीस स्टेशन
असरअली पोलीस स्टेशन

अशा वेगळ्या कार्यक्रमानंतर अनेक ठिकाणचे पोलिसही भारावून गेले. काही ठिकाणी पोलीस भावनिक झाले. सिरोंचा तालुक्यातील असरअली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामेश्वर दराडे यांनी ‘१५ सप्टेंबरपर्यंत गावातील दारू बंद करीन,’ असे वचन भगिनींना दिले. गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी, ‘भगिनींनी ओवाळणीच्या रूपात पोलिसांना हक्काने त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली,’ असे उद्गार काढले. 

कोठी
कोठी येथे सुगंधित तंबाखूच्या डब्यांची होळी करण्यात आली.

भामरागड तालुक्यातील दुर्गम अशा कोठी या मदत केंद्रावरील पोलिसांनी लगेचच गावात रॅली काढून सुगंधित तंबाखूचे डबे जप्त केले व ते भगिनींच्या उपस्थितीतच नष्ट केले. 

भामरागड ताडगाव पोलीस स्टेशन

सिरोंचा, भामरागड, मुलचेरा, अहेरी, गडचिरोली, देसाईगंज या तालुक्यांतील पोलीस स्टेशनवर आसपासच्या गावातील मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी आपल्या पोलीस भाऊंकडे दारू बंद करण्याची ओवाळणी मागितली. 

भामरागड ताडगाव पोलीस स्टेशन

मुक्तिपथ अभियान
गडचिरोली जिल्ह्यात ज्येष्ठ सामाजसेवक डॉ. अभय बंग यांच्या पुढाकाराने मुक्तिपथ हे अभियान सुरू आहे. ‘मुक्तिपथ’तर्फे गावाच्या पातळीवर संघटना स्थापन करण्यात आल्या असून, आपल्या गावातील दारू व तंबाखू बंद करण्यासाठी या संघटनेतील सदस्य सतत प्रयत्न करत असतात. याच मुक्तिपथ गाव संघटनेतील महिलांनी पोलिसांना राख्या बांधल्या व दारू बंद करण्याचे आवाहन केले.  

कोठी

शेती बाजूला ठेवून...
सध्या गावांमध्ये भाताच्या रोवण्या (लावणी) सुरू आहेत. तरीही या महिला रोवण्या सोडून, स्वखर्चाने पोलीस स्टेशनला आल्या आणि पोलिसांना राख्या बांधून त्यांनी आपल्या समस्या मांडल्या. यावरून दारू बंद होणे त्यांच्यासाठी किती गरजेचे आहे, याचा अंदाज येईल.

वचन देणारे कार्ड
महिलांच्या स्वाक्षऱ्या असलेले एक कार्ड पोलिसांना देण्यात आले. तसेच ‘तुमच्या गावातील दारू बंद करू’ असे वचन देणारे एक कार्ड पोलिसांनीही स्वाक्षरी करून ओवाळणी म्हणून महिलांना परत दिले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Keshav Ramdhan Chavhan About 327 Days ago
Very nice news collection..., community want to change systum ... then want to tobacco & alcohol free villages they suffering this issues..
0
0

Select Language
Share Link
 
Search