Next
‘विद्यार्थ्यांची जडणघडण गुरुच्या हातात’
प्रा. शरदचंद्र दराडे; ‘सूर्यदत्ता गुरुरत्न’ पुरस्कारांचे वितरण
प्रेस रिलीज
Wednesday, July 17, 2019 | 04:40 PM
15 0 0
Share this article:

‘सूर्यदत्ता गुरुरत्न पुरस्कार’ वितरण सोहळ्याप्रसंगी डावीकडून डॉ. संजय चोरडिया, प्रा. शरदचंद्र दराडे, डॉ. संप्रसाद विनोद, डॉ. विनोद शहा, सुषमा चोरडिया, वर्षा उसगांवकर, प्रा. ललिता जोगड.

पुणे : ‘विद्यार्थी आपल्या गुरुकडे पाहून अनेक गोष्टी शिकत असतो. त्यामुळे शिक्षकानेही आपले आचरण चांगले ठेवायला हवे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर द्यायला हवा. शिक्षकांबरोबरच पालकांनीही पाल्याला योग्य संस्कार द्यावेत. आईप्रमाणे शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांची काळजी घेतली, तर मुलांची अधिक प्रगती होईल. शिक्षक विद्यार्थ्यांना आपले वाटले पाहिजेत. आपली मराठी भाषा खूप समृद्ध आहे. त्यामुळे मुलांना नेहमी आपल्या मातृभाषेतील कविता, गाणी शिकवणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन शिक्षण क्षेत्रातील ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व प्रा. शरदचंद्र दराडे यांनी केले.

बावधन येथील सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रा. दराडे यांना ‘सूर्यदत्ता गुरुरत्न शैक्षणिक व सर्वांगीण विकास पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. प्रा. दराडे यांच्यासह ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. विनोद शहा यांना ‘सूर्यदत्ता गुरुरत्न मानवसेवा पुरस्कार’, तर प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांना ‘सूर्यदत्ता गुरुरत्न कलाक्षेत्र पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. 

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून योगगुरू डॉ. संप्रसाद विनोद, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. ललिता जोगड, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, संचालिका कॅप्टन शालिनी नायर आदी उपस्थित होते. मानपत्र, सन्मानचिन्ह व उपरणे असे या पुरस्काराचे स्वरूप होते. २१ वर्षांपूर्वी सात फेब्रुवारी १९९९ रोजी प्रा. दराडे आणि उसगांवकर यांनी सूर्यदत्ता ग्रुपचे सदाशिव पेठेतील कॅम्पसचे उद्घाटन केले होते. त्यावेळच्या आठवणींना छायाचित्रांतून उजाळा दिला. या दोघांप्रती कृतज्ञता व्यक्त करत केलेल्या या सन्मानाने दोघेही भारावले होते.

डॉ. शहा म्हणाले, ‘स्वतःच्या समाधानापुरते आपले कार्य मर्यादित असू नये. आपल्या कार्याने इतरांच्या जगण्यात काही बदल होईल, याचा विचार आपण केला पाहिजे. आपल्या मनातील कुविचार काढून टाकावेत. गुरुचे स्थान आपल्या आयुष्यात महत्त्वपूर्ण आहे. मानवसेवा हीच ईश्वरसेवा हा संदेश गुरुस्थानी ठेवून आपण वाटचाल केली पाहिजे. स्वतःबरोबरच इतरांच्या प्रगतीचा विचार केला आणि गुरूच्या विचारप्रमाणे वागले, तर यश हमखास मिळते.’

वर्षा उसगांवकर म्हणाल्या, ‘उदरनिर्वाहासाठी पैसे सगळेच कमवतात; परंतु आयुष्यात माणसेही जोडणे तितकेच महत्त्वाचे आहे. अनेक गुरुंच्या सान्निध्यानेच आपले जीवन समृद्ध होत असते. गुरु आपल्याला योग्य दिशा दाखवण्यासह जगण्याचा अर्थ दाखवत असतात. चित्रपटसृष्टीत मला चांगल्या भूमिका मिळत गेल्या. त्यामुळे माझ्या व्यक्तिरेखेला आणि नावाला एक वलय मिळाले. चाहत्यांमुळेच हे सगळे शक्य झाले. ज्युनिअर कलाकारांनाही योग्य संधी देण्याचे काम दिग्दर्शकांनी करावे.’

डॉ. विनोद म्हणाले, ‘गुरुमुळे आयुष्यातील अज्ञानाचा अंध:कार दूर होतो. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात एक गुरु असावा. गुरु आपल्याला योग्य मार्गदर्शन आणि दिशा देऊन आयुष्य सुखकर जगायला शिकवतो. तरुण मुलांनी आपल्या आवडीनिवडी जाणून घ्याव्यात. त्यानुसार ध्येय निश्चित करावेत. ज्या विषयात प्रगती करायची आहे, त्याचा सखोल अभ्यास केला पाहिजे. सर्वानी नेहमी विनम्र राहत यशानंतरही अहंकाराला दूर ठेवावे.’

प्रा. ललिता जोगड म्हणाल्या, ‘शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्यवेळी मार्गदर्शन केले, तर त्यातुन सुंदर कलाकृती निर्माण होते. आपल्याला गुरुचे महत्त्व समजावे यासाठी आपण प्रत्येकवर्षी गुरुपौर्णिमा साजरी करतो. गुरुमुळे आपल्यावर चांगले संस्कार होतात आणि या संस्कारांची शिदोरी घेऊन आपण समाजात ताठ मानेने जगू शकतो.’

प्रा. डॉ. चोरडिया म्हणाले, ‘विद्यार्थ्यांना आपल्या गुरुकडून प्रेरणा मिळावी, या हेतूने दर वर्षी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने समाजात विविध क्षेत्रात ज्ञानदान करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जातो. सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून त्याप्रमाणे त्यांना घडवत आहे.’

सूर्यदत्ता नॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आषाढी एकादशीच्या निमित्ताने लहान मुलांनी विठ्ठल-रुक्मिणीची वेशभूषा करून पालखी सोहळा सादर केला. विद्यार्थ्यांनी अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्या मराठी सिनेमातील गाण्यांवर नृत्य सादर करीत उसगावकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रास्ताविक डॉ. चोरडिया यांनी केले. सूत्रसंचालन सुनील धनगर व कॅप्टन शालिनी नायर यांनी केले. आभार सुषमा चोरडिया यांनी मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search