Next
चिलखतं आणि पिंजरे...
BOI
Thursday, July 12, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this storyअलीकडेच पाहिलेल्या प्रदर्शनांपैकी मनावर खोलवर ठसा उमटवणारं प्रदर्शन म्हणजे शकुंतला कुलकर्णी यांचं ‘ऑफ बॉडीज, आर्मर अँड केजेस’ हे प्रदर्शन... वेतापासून विविध कलात्मक वस्तू बनवून त्यांच्या प्रदर्शनातून वेगळा संदेश देणारं नि नाट्यानुभव देणारं हे प्रदर्शन. ‘स्मरणचित्रे’ सदरात आज पाहू या आगळ्यावेगळ्या माध्यमातल्या या कलाप्रदर्शनाबद्दल...
........


एखाद्या संग्रहालयात प्रवेश केल्यावर येणारा अनुभव आपल्याला आठवतो शकुंतला यांच्या प्रदर्शनाची मांडणी पाहताना. संग्रहालयात एक-एक जुनी वस्तू, अगदी लहान, मोठी, जशी जपून, काळजीपूर्वक ठेवलेली असते, इतरत्र अंधार आणि वस्तूवर प्रकाशझोत असतो. कुणी अज्ञातांनी वापरलेल्या एकेकाळच्या महत्त्वाच्या, परंतु आता निरुपयोगी अशा वस्तू पुराणवस्तू संग्रहालयात असतात. शकुंतला यांच्या प्रदर्शन मांडणीत हेच तत्त्व होतं. उभ्या-आडव्या ओळींमध्ये सरळ अडीच-तीन फूट उंचीवर मांडलेल्या खास कलात्मक वस्तू.... त्यांना दागिने म्हणायचं की कलाकृती, की आदिवासी भागातून जमा केलेल्या रोजच्या वापरातल्या वस्तू, हे ठरवायचं स्वातंत्र्य पाहणाऱ्याला होतं. सर्वसाधारणपणे, भिंतीवर टांगलेली चित्रं, असं प्रदर्शनाचं स्वरूप न राहता कलाकृती मांडण्याच्या स्वरूपात गेल्या एक-दोन दशकांत आमूलाग्र बदल झाले आहेत. सवयीनं पाहणारा ते बदल, नव्या रचना स्वीकारतो, त्या रचना त्याला आवडायला लागतात. या प्रदर्शनात संग्रहालयाचा एका प्रकारे आभासी नाट्याचा अनुभव होता.अंगठ्या, गळ्यातल्या माळा, कर्णकुंडले, बांगड्या, जोडवी, वाक्या, बिंदी आणि म्हणाल ते दागिने... सगळ्या गोष्टी वेताच्या साह्याने केलेल्या. गेल्या पाच-सहा वर्षांत शकुंतला कुलकर्णी वेताच्या माध्यमातच काम करत आहेत. त्यांनी वेतापासून या लहान वस्तू करताना त्यातल्या सर्व शक्यता लक्षात घेतलेल्या आहेत. या दागिन्यांबरोबर वेताचे मुखवटे मांडलेले होते. खरं तर हे मुखवटे म्हणजे शिरस्त्राणं होती... हर आकाराची आणि हर तऱ्हेची... वेताचीच बनवलेली. त्यातही आकारांच्या नानाविध शक्यता पडताळलेल्या. एकेकाचं स्वतःचं वैशिष्ट्य. हे पाहत पाहत प्रदर्शनाच्या एक वेगळ्याच भागात आपण पोहोचतो.... एका खोलीत...

चारही बाजूंनी सैन्य अंगावर येतंय, आपण एक बाजू पाहतो, तर दुसरीकडून आक्रमण, त्या धक्क्यातून सावरताच डावी-उजवीकडून सैन्य पुढे येतंय. हे सैन्य कवच, पिंजरे, चिलखतं घातलेलं. महिलांचं सैन्य... नाट्यानुभवासाठी सुयोग्य पार्श्वध्वनीचा वापर... हे सगळं भलतंच परिणामकारक... फार प्रभावी... पाहणारा स्तब्ध. शकुंतलाने स्वतः असे वेगवेगळे वेताचे मुखवटे परिधान केलेले. फक्त मुखवटेच नाही, तर अंगभर वेताचे पिंजरे, चिलखते आणि काय-काय ल्यालेलं. हा तिचा परफॉर्मन्स आणि व्हिडिओ इन्स्टॉलेशन.

चार प्रोजेक्टर्सच्या साह्याने चार भिंतींवर चहूबाजूंनी या व्हिडिओच्या चलत प्रतिमा आणि अनुभवणारे प्रेक्षक मधूनच प्रतिमा झेलतायत अशी योजना. तिच्या अनेक प्रतिमा, जणू दृश्य-क्लोन्स.... आणि काय काय! एकूण अनुभव भय उत्पन्न करणारा. आजचं भोवतालचं जग दाखवणारा.

वर उल्लेखल्याप्रमाणे शकुंतला यांनी अनेक पिंजरे यापूर्वीच डिझाइन केलेले होते. स्त्रियांना सार्वजनिक स्थळी होणाऱ्या स्पर्शाच्या त्रासावरचा हा प्रतिकात्मक निषेध किंवा उपाय म्हणा हवं तर... शहरामध्ये होणारे अत्याचार, वासनाकांड, असभ्य वर्तन या सगळ्यासाठी हे पिंजरे किंवा वेताची चिलखतं. त्यांचं हे प्रदर्शन म्हणजे माध्यमांची जणू रेलचेल होती.या वेताच्या पिंजऱ्यांना प्रत्यक्षात आणण्यापूर्वी असंख्य रेखाटनं केलेली. त्यातली काही स्टुडिओतल्या प्लायवर खडूने केलेली होती. पेन्सिल, खडू, चारकोलच्या रेषांचा सडा. त्यातून पक्का होत जाणाऱ्या विवक्षित प्रतिमा. पुढे या सगळ्यामधून ही पिंजऱ्याची शिल्पे, पुढे त्याचा फोटोग्राफ आणि नाट्यपूर्ण सादरीकरण, अशी एकूण गुंफण या प्रदर्शनात होती. शूटिंग, संकलन, ध्वनी अशा इतरही गोष्टींची भर त्यात होती. सगळ कसं परिणामकारक, सगळं गांभीर्यानं घेतलेलं.हे पिंजरे अंगावर लेवून त्या समुद्राच्या किनाऱ्यावर, एशियाटिक सोसायटीच्या पायऱ्यांवर एखाद्या पुतळ्यासारख्या स्वरूपात, गर्दीत झेब्रा क्रोसिंगवरून रस्ता ओलांडताना, जुन्या इमारतीचा जिना उतरताना, अशा कितीतरी परफॉर्मन्सचे फोटोग्राफ आपल्याला त्यांच्या प्रदर्शनाच्या आणि या पूर्वीच्या प्रदर्शनांच्या कॅटलॉगमध्ये दिसतात.शकुंतला कुलकर्णी यांची स्केचेस बघण्यासाठी आहेत. विशेषतः  फॅशन व कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शक्यता दृश्यरूपात कशा पाहता येतात, याचे हे वस्तुपाठच होत. एखाद्या वास्तुविशारदाचा पक्केपणा आणि नियोजन या स्केचेसमध्ये आहे.  हे प्रदर्शन मुंबईच्या केमोल्ड आर्ट गॅलरीत आयोजित केलं गेलं होतं. एका खासगी अवकाशात. आपण जुन्या लिफ्टने मुंबईतल्या फोर्ट भागातल्या एका जुन्या वारसावजा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जातो. भव्य प्रवेशद्वार. नवखा इसम जणू दबावाखाली यावा, की आपण काही तरी भव्य-दिव्य बघू. दार उघडल्यावर आत शकुंतला यांनी उभारलेल्या या संग्रहालयाची मांडणी... यापूर्वी त्यांच्या कलाकृती मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालयात मांडण्यात आल्या होत्या. जणू संग्रहातील वस्तूंप्रमाणे त्या संग्रहालयाचा एक भाग झाल्या होत्या. दिल्लीतल्या ‘किरण नदार म्युझियम ऑफ आर्ट’मधल्या प्रदर्शनात असे वेताचे मुखवटे तांबड्या रंगाच्या गडद पार्श्वभूमीवर शोभून दिसत होते. निदान फोटोत तरी ते तसे दिसतायत. 

१९५० साली धारवाडमध्ये जन्मलेल्या शकुंतला यांचे शिक्षण मुंबईच्या ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’मध्ये (१९७२) झाले. १९७३ला त्यांनी म्युरल विषयात पोस्ट डिप्लोमा केला. १९७५ला बडोद्यात महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठात आणि १९७६ला शांतिनिकेतनमध्ये त्यांनी प्रिंट मेकिंगचे प्रशिक्षण घेतले. अनेक एकल व सांघिक प्रदर्शनांत त्यांच्या प्रायोगिक स्वरूपातील कलाकृती प्रदर्शित झाल्या आहेत. नाट्यपूर्ण मांडणी हे या सर्व विषयांतल्या नि माध्यमांतल्या प्रदर्शनांचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. 

कधी चित्रं भिंतीऐवजी नाटकाच्या पायऱ्या आणि ठोकळ्यांवर मांडलेली, कधी गोधडीवर चित्र, तर कधी कलादालनाच्या छतावर मांडणी केलेली आणि गेली काही वर्षं चाललेले शकुंतला यांचे हे वेताचे प्रयोग. हे प्रयोग म्हणजे फॅशन शिक्षण क्षेत्रात ज्याला नॉन टेक्स्टाइल किंवा नॉन वेअरेबल कॉश्चुम म्हणतात तसे काहीसे. एका कलाकाराचा हा कलात्मक, सक्षम प्रवास पिंजऱ्यासारखा दिसत असला, तरी  बंदिस्त नाही; तर एखाद्या पक्ष्यासारखा स्वतंत्र, किंबहुना अत्याधुनिक महिलेसारखा स्वयंपूर्ण आहे...
(संदर्भ : of bodies, armour & cages, 2013)

- डॉ. नितीन हडप
ई-मेल : nitinchar@yahoo.co.in

(लेखक पुण्यातील चित्रकार असून, काष्ठशिल्पे, पुरातन वास्तू, फॅशन आदी त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. ‘स्मरणचित्रे’ या पाक्षिक सदरातील सर्व लेख https://goo.gl/w99eTN या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Vaishali About 218 Days ago
Mast Mahiti NITIN .
0
0

Select Language
Share Link