Next
‘शास्त्रीय नृत्य संवर्धन’तर्फे ‘डान्स सीझन २०१९’चे आयोजन
२० ते ३० एप्रिल दरम्यान पुण्यात होणार अनेकविध कार्यक्रम
प्रेस रिलीज
Friday, April 12, 2019 | 05:16 PM
15 0 0
Share this article:

पत्रकार परिषदेत माहिती देताना गुरू शमा भाटे. शेजारी (डावीकडे) भरतनाट्यम नृत्यांगना डॉ. सुचेता भिडे-चापेकर आणि कथ्थक नृत्यांगना मनीषा साठे.

पुणे : ‘शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेतर्फे या वर्षीपासून ‘डान्स सीझन’चे आयोजन करण्यात येणार असून, पहिला डान्स सीझन २० ते ३० एप्रिल २०१९ दरम्यान पुण्यात होणार आहे. भारतातीय शास्त्रीय कलेच्या सर्व शैलीतील कलाकार एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय नृत्य दिवसानिमित्त हा दहा दिवसांचा कार्यक्रम करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असणार आहे,’ अशी माहिती संस्थेतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.

या वेळी प्रसिद्ध भरतनाट्यम् नृत्यांगना व शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेच्या संस्थापक विश्वस्त डॉ. सुचेता भिडे–चापेकर, प्रसिद्ध कथक नृत्यांगना व संस्थेच्या अध्यक्षा शमा भाटे, संस्थेच्या संस्थापक विश्वस्त व प्रसिद्ध कथक नृत्यांगना मनीषा साठे, सचिव रसिका गुमास्ते, सहसचिव मेघना साबडे, लीना केतकर, मंजिरी कारुळकर, सुचित्रा दाते आदी उपस्थित होत्या. भारतीय शास्त्रीय नृत्य कलेचे संगोपन, संवर्धन, प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने पुणे शहरातील शास्त्रीय नृत्याच्या सर्व शैलींच्या कलाकारांनी एकत्र येत शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेची स्थापना केली आहे.

संस्थेविषयी माहिती देताना अध्यक्षा भाटे म्हणाल्या, ‘आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये महत्त्वाचे स्थान असलेल्या शास्त्रीय नृत्य शैलींचा प्रचार, प्रसार व्हावा, या शैलींचे संगोपन, संवर्धन व्हावे, त्या समृद्ध व्हाव्यात व आपला आपला वारसा वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने आम्ही सर्व शैलीच्या कलाकारांनी एकत्र यायचे ठरविले आणि शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरांपर्यंत शास्त्रीय नृत्यकलेचा प्रसार व्हावा, अभिरुचीसंपन्न प्रेक्षक तयार व्हावा, रसिकांना या नृत्य शैली पहायला, शिकायला मिळाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत.’

‘हे सर्व करीत असताना पुण्यासारख्या शहरात खास नृत्याच्या कार्यक्रमांसाठी एक चांगली, सर्व सोयींनी उपयुक्त अशी वास्तू असावी यासाठीदेखील आम्ही प्रयत्न करणार आहोत. याबरोबरच नृत्याकडे शैक्षणिकदृष्ट्या पाहिले जावे, नव्या कलाकृती निर्माण होण्यासाठी अर्थसाह्य आणि मदत मिळावी अशीदेखील आमची अपेक्षा आहे,’ असे डॉ. सुचेता यांनी नमूद केले.

‘या सर्व उद्दिष्टांसह सुरू झालेली शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था या वर्षी आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाचे औचित्य साधत पुणे शहर आणि उपनगरात ‘डान्स सीझन २०१९’ अंतर्गत नृत्याच्या अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करीत आहे. याची सुरुवात २० एप्रिलला होणार असून, ३० एप्रिलला याचा समारोप होईल. या अंतर्गत संपूर्ण शहरात सर्वांसाठी खुले आणि विनामूल्य नृत्यविषयक कार्यक्रम, कार्यशाळा, निबंध व चित्रकला स्पर्धा, व्याख्याने, चर्चासत्रे हे कार्यक्रम होतील,’ अशी माहिती कथक नृत्यांगना साठे यांनी दिली.

‘डान्स सीझन २०१९’दरम्यान होणाऱ्या कार्यक्रमांची सूची अशी : २० एप्रिल– सुचित्रा दाते यांच्या ‘नृत्य प्रेरणा अकादमी ऑफ भरतनाट्यम्’तर्फे ‘नृत्य संध्या’ हा कार्यक्रम पर्वती पायथा येथील मित्र मंडळ कॉलनीमधील नृत्य प्रेरणा अंगण मंच येथे सायंकाळी पाच वाजता होईल. गुरू रोहिणी भाटे यांनी अनुवादित केलेल्या ‘इसाडोरा डंकन’ यांच्या ‘माय लाइफ’ पुस्तकाचे वाचन सिंहगड रस्त्यावरील सरिता ऑर्नेटे येथील बेलवलकर रेसिडेन्सी येथे सायंकाळी सात वाजता  होईल. नादरूप कथक संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. ‘व्हाय डू आय डान्स?’ (मी नृत्य का करते?) या विषयावरील निबंध स्पर्धा कमला नेहरू उद्यान, ताथवडे उद्यान, चित्तरंजन वाटिका, डॉ. राम लोहिया गार्डन, हडपसर, पु. ल. देशपांडे उद्यान या शहरातील विविध उद्यानांमध्ये सायंकाळी ७.३० वाजता होईल. रूपक नृत्यालयाने ही स्पर्धा आयोजित केली आहे. वैशाली पारसनीस यांच्या नृत्यांजली नृत्य संस्थेतर्फे हिंगणे येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था आणि कोथरूड येथील अभिनव विकास फाउंडेशनच्या चंद्रकांत दरोडे प्रायमरी शाळेत आर्थिक दुर्बल घटकातील लहान मुलांसाठी नृत्य कार्यशाळेचे आयोजन केले आहे. सायंकाळी ६.३० वाजता ओंकारेश्वर मंदिरात गुरू शमा भाटे यांच्या ‘नादरूप’तर्फे महाराष्ट्रातील सात संतांच्या जीवनावर आधारित ‘संत वाणी’ या नृत्याविष्काराचे सादरीकरण होईल.

२१ एप्रिल– अमला शेखर यांच्या ‘अनुगामिनी नृत्यभारती’तर्फे पासोड्या विठोबा मंदिराजवळील प्रार्थना समाज येथे सायंकाळी चार वाजता ‘नृत्य उपासन’ हा कार्यक्रम, स्नेहल फाटक-कळमकर यांच्या ‘स्नेहललित कला केंद्रा’तर्फे ‘मार्गम्’वरील संवाद मालिकेचा कार्यक्रम होईल. २२ एप्रिल– तेजस्विनी साठे यांच्या ‘शांभवीज् इंटरनॅशनल स्कूल ऑफ कथक’तर्फे ताथवडे उद्यानात सायंकाळी सहा वाजता ‘नृत्य रंग’ हा कार्यक्रम होईल. सिंहगड रस्त्यावरील तब्बल ११ नृत्यसंस्थांतर्फे निवारा वृद्धाश्रमात सायंकाळी चार वाजता ‘अवघा रंग एक झाला’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. स्नेहल कळमकर यांच्या शिष्या असलेल्या जान्हवी, दीक्षा आणि पूजा यांच्या ‘जान्हवी नृत्यमंदिर’, ‘नृत्यदीक्षा कला केंद्र’ आणि ‘पूज्यम नृत्यालय’ यांच्यातर्फे सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती या देवींवर आधारित ‘त्रिदेवी’ या भरतनाट्यम् नृत्याविष्काराचे आयोजन सातारा रस्त्यावरील अण्णाभाऊ साठे सभागृहात सायंकाळी सहा वाजता केले आहे. ‘नृत्यशाळा स्कूल ऑफ भरतनाट्यम्’तर्फे बाणेर येथील नाट्यशाळा स्कूल ऑफ भरतनाट्यम् येथे सायंकाळी ४.३० वाजता श्रीमती गायत्री यांची ‘कुचीपुडी तरंगम्’ यावर कार्यशाळा होईल.

२३ एप्रिल– सिंहगड रस्त्यावरील ११ नृत्यसंस्थांतर्फे मातोश्री वृद्धाश्रमात सायंकाळी चार वाजता ‘अवघा रंग एक झाला’ या कार्यक्रम होईल. याच संस्थांतर्फे ‘ओळख नृत्याची’ यावर कार्यशाळाही आयोजित केली आहे. २४ एप्रिल- शिल्पा दातार यांच्या ‘शिल्पा नृत्यालया’तर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्त्यावरील बालशिक्षण संस्थेच्या विशेष विद्यार्थ्यांसाठी सकाळी १० वाजता संस्थेच्या आवारात नृत्यविषयक कार्यशाळा होईल. मानसी गदो, पूर्वा शाह आणि पद्मश्री जोशी यांच्यातर्फे सिंहगड रस्त्यावरील प्रगती विद्यालयात सायंकाळी ५.३० वाजता ‘गुरू चरणन’ यावर कार्यशाळा होईल. यामध्ये डॉ. माधुरी आपटे या नटराज पंडित ‘पं. गोपी कृष्ण यांची नृत्य शैली’ या विषयावर उपस्थितांशी संवाद साधतील.

२५ एप्रिल- माधुरी आपटे यांच्या ‘नृत्यवेध’ आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्यातर्फे सेनापती बापट रस्त्यावरील भारती विद्याभवन येथे ‘संगत संगोष्टी’ या कार्यक्रम सायंकाळी ५.३० वाजता होईल. २६ एप्रिल- ‘मुद्रा कथक नृत्यालय’ आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्यातर्फे सेनापती बापट रस्त्यावरील भारती विद्याभवनात सायंकाळी ६.३० वाजता ‘नृत्यदिग्दर्शन– काल, आज आणि उद्या’ या विषयावर कथक गुरू शमा भाटे यांची मुलाखत होईल. मुकुंद नगर येथील सॅलिसबरी पार्क जवळील महावीर प्रतिष्ठान येथे सायंकाळी सहा वाजता ‘कथक नृत्य संध्या’ या कार्यक्रम होईल.

२७ एप्रिल- वारजे नाका येथील आंबेडकर चौकातील बी स्केअर हॉलमध्ये सायंकाळी चार वाजता नृत्याचे शिक्षण घेणाऱ्यांसाठी नृत्य कार्यशाळा होईल. यात केतकी कुलकर्णी यांचे विशेष व्याख्यानदेखील होणार आहे. ‘नादरूप’ आणि ‘कलायन’तर्फे हिराबाग चौकातील जोत्स्ना भोळे सभागृहात सकाळी १० वाजल्यापासून नृत्य विषयावर वक्तृत्व व कला प्रदर्शन स्पर्धा होतील. नीलिमा प्रोडक्शनतर्फे ‘संगीत पर्व- उमलते कथक’ या कार्यक्रमाचे आयोजन ज्ञानेश्वर मंदिर येथे सायंकाळी सहा वाजता करण्यात आले आहे. ‘त्रिमिती’तर्फे मध्यमा व प्रथमाच्या पुढील नृत्याच्या विद्यार्थीनींसाठी गणंजय सभागृहात सायंकाळी सहा वाजता प्रश्नमंजुषा होईल.

२८ एप्रिल- स्मिता महाजन आणि स्नेहल कळमकर यांच्यातर्फे कोथरूड येथील बालशिक्षण मंदिर सभागृहात सकाळी १० वाजता ‘नाद नृत्य महोत्सव’ होईल. २९ एप्रिल- कोथरूडमधील कुमार परिसर क्लब हाउस येथे सायंकाळी ५.३० वाजता संध्या धर्मा यांच्यातर्फे नवोदित कलाकारांसाठी नृत्य विषयक कार्यशाळा होईल. ‘मनीषा नृत्यालय’तर्फे यशवंतराव चव्हाण सभागृहात सायंकाळी पाच वाजता ‘अणु वेध’ हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले आहे. ३० एप्रिल- पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नृत्याशी संबंधित तब्बल २९ संस्थांचे प्रतिनिधी ईशान्य मॉल येथील क्रेटा सिटी या ठिकाणी आपली नृत्य कला सादर करतील. या वेळी कला क्षेत्राशी निगडीत अनेक कलाकार उपस्थित असतील. या कार्यक्रमाने ‘डान्स सीझन’चा समारोप होईल.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search