Next
‘शिर्डीचे समाधी मंदिर १८ ऑक्‍टोबरला रात्रभर खुले’
प्रेस रिलीज
Friday, October 12, 2018 | 03:07 PM
15 0 0
Share this article:

शिर्डी : ‘श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था यांच्या वतीने १७ ते १९ ऑक्‍टोबर २०१८ या काळात शंभरावा पुण्‍यतिथी उत्‍सव साजरा करण्‍यात येणार आहे. या काळात साईभक्‍तांची होणारी संभाव्‍य गर्दी लक्षात घेऊन १८ ऑक्‍टोबरला समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले राहणार आहे,’ अशी माहिती संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली.

त्या म्‍हणाल्‍या, ‘साईबाबांनी ९९ वर्षांपूर्वी दसऱ्याच्या दिवशी दुपारी दोन वाजून ३५ मिनिटांनी शिर्डी येथे आपला देह ठेवला. त्‍या दिवशी मंगळवार होता. १९१९ साली तिथीप्रमाणे बाबांची पहिली पुण्‍यतिथी साजरी करण्‍यात आली. त्‍यानंतर आजतागायत हा पुण्‍यतिथी उत्‍सव नव्‍या उत्‍साहात साजरा केला जात आहे. विजयादशमी म्‍हणजे श्री साईबाबांची पुण्‍यतिथी अशी एक नवी ओळख या सणाची निर्माण झाली आहे. देशभरातील व जगातील साईभक्‍त हा उत्‍सव साजरा करतात.’

‘श्री साईबाबांच्‍या समाधीस १८ ऑक्‍टोबर २०१८ रोजी शंभर वर्ष पूर्ण होत आहे. संस्‍थानतर्फे समाधीचा शताब्‍दी सोहळा एक ऑक्टोबर २०१७ ते १८ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत साजरा करण्‍यात येत असून, हा शताब्‍दी सोहळा भव्‍य स्‍वरूपात साजरा व्‍हावा या उद्देशाने वर्षभर धार्मिक, सांस्‍कृतिक, सामाजिक व प्रबोधनात्‍मक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात येत आहे. १८ ऑक्‍टोबरला शंभरावा पुण्‍यतिथी उत्‍सव साजरा करण्‍यात येत असून, यानिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.’

उत्‍सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे १७ ऑक्‍टोबरला पहाटे ४.३० वाजता श्रींची काकड आरती, पाच वाजता श्रींच्‍या फोटोची व पोथीची मिरवणूक, ५.१५ वाजता द्वारकामाईत श्री साईसच्‍चरिताचे अखंड पारायण, ५.२० वाजता श्रींचे मंगलस्‍नान व नंतर दर्शन, दुपारी १२.३० वाजता मध्‍यान्‍ह आरती व तीर्थप्रसाद, सायंकाळी चार ते सहा या वेळेत कीर्तन समाधी मंदिराच्या शेजारील स्‍टेजवर होणार आहे. सायंकाळी ६.१५ वाजता धुपारती, रात्री ७.३० ते १०.१५ यावेळेत निमंत्रित कलाकारांचा कार्यक्रम होईल. ९.१५ वाजता गावातून पालखीची मिरवणूक निघेल. १०.३० वाजता श्रींची शेजारती होईल. उत्‍सवाचा हा पहिला दिवस असल्‍यामुळे अखंड पारायणासाठी द्वारकामाई मंदिर रात्रभर खुले राहील.

१८ ऑक्‍टोबरला पहाटे ४.३० वाजता श्रींची काकड आरती, पाच वाजता अखंड पारायण समाप्‍ती व श्रींच्‍या फोटोची व पोथीची मिरवणूक, पहाटे ५.२० वाजता श्रींचे मंगल स्‍नान व नंतर दर्शन, सकाळी नऊ वाजता भिक्षा झोळी कार्यक्रम, सकाळी १० वाजता कीर्तनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता आराधना विधी व दुपारी १२.३० वाजता मध्‍यान्‍ह आरती व तीर्थप्रसाद, तर सायंकाळी पाच वाजता खंडोबा मंदिर येथे सिमोल्‍लंघन व मिरवणूक कार्यक्रम होईल. सायंकाळी ६.१५ वाजता धुपारती, रात्री ७.३० ते १०.३० यावेळेत निमंत्रित कलाकारांचा कार्यक्रम होईल. दरम्यान, ९.१५ वाजता श्रींच्‍या रथाची गावातून मिरवणूक निघेल. उत्‍सवाचा हा मुख्‍य दिवस असल्‍याने समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले राहील. रात्री ११ ते पहाटे पाच या वेळेत श्रींसमोर कलाकारांची हजेरी कार्यक्रम होईल.

उत्‍सवाच्‍या सांगता दिवशी १९ ऑक्टोबरला पाहते पाच वाजता श्रींचे मंगल स्‍नान व नंतर दर्शन, सकाळी ६.४५ वाजता गुरुस्‍थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा होईल. सकाळी १० वाजता गोपाळकाला कीर्तन व दहीहंडीचा कार्यक्रम होणार असून, दुपारी १२.१० वाजता मध्‍यान्‍ह आरती व तीर्थप्रसाद, सायंकाळी ६.१५ वाजता श्रींची धुपारती, रात्री ७.३० ते १०.१५ यावेळेत निमंत्रित कलाकार कार्यक्रम होणार असून, १०.३० वाजता शेजारती होईल.

हा उत्‍सव यशस्‍वी होण्यासाठी संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ. सुरेश हावरे, उपाध्‍यक्ष चंद्रशेखर कदम, मुख्‍य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल व सर्व विश्‍वस्‍त यांच्‍या मार्गदर्शनाखाली उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकम आणि मनोज घोडे पाटील, उप कार्यकारी अधिकारी बाबासाहेब घोरपडे, सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी मेहनत घेत आहेत.

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search