Next
जिंदगी धूप तुम घना साया...
BOI
Thursday, October 11, 2018 | 06:45 AM
15 1 0
Share this article:आपलं मूल ऑटिस्टिक अर्थात स्वमग्न आहे हे कळल्यावर अंबिका टाकळकर यांना खूप मोठा धक्का बसला होता; पण त्यांनी जिद्दीनं या परिस्थितीवर मात केली. आपल्या मुलाला जास्तीत जास्त स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, त्यासाठी वेगळं शिक्षणही घेतलं आणि बरंच काही केलं. समाजातल्या बाकीच्या अशाच मुलांसाठी त्यांनी ‘आरंभ’ नावाची संस्थाही स्थापन केली. आता त्या माध्यमातून त्यांचं काम सुरू आहे. ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदरात आज औरंगाबादच्या अंबिका टाकळकर यांची प्रेरणादायी गोष्ट...
..................
जगण्याच्या वाटेवर सावलीचे क्षण कमी आणि रखरखीत कडक उन्हाचेच चटके जास्त बसावेत आणि तो प्रवास खूप दीर्घ, लांबलचक झाला तर? जगणं कठीण होईल ना? पण या वाटेवर चालताना आपल्याच नव्हे, तर इतरांच्याही आयुष्यात सावली निर्माण करण्याची जिद्द बाळगणारी माणसं आपल्या आसपास असतात. त्यातलीच एक म्हणजे अंबिका टाकळकर!

लेखिका दीपा देशमुख यांच्यासह अंबिका टाकळकर

अंबिका सर्वसामान्य मुलींप्रमाणेच होती. मराठवाड्यातल्या नांदेडमध्ये विज्ञान विषय घेऊन तिनं बीएस्सी केलं. त्यानंतर नौदलातल्या एका अधिकाऱ्याशी तिचं लग्न झालं. लग्नानंतर अंबिका ठाण्यात आली. तिथं तिनं अॅप्टेकचा डिप्लोमा केला आणि एका कंपनीत प्रोग्रॅमर म्हणून कामही सुरू केलं. अंबिकाच्या पतीची नोकरी कधी फिरतीची, तर कधी अनियमित वेळेची असल्यानं अंबिकानं हा निर्णय घेतला होता. काहीच दिवसांत घरात एका चिमुकल्याची पावलं प्रवेश करणार या बातमीनं सगळेच आनंदले. २००० साली श्रीहरीचा जन्म झाला. अंबिकाच्या सासरचे आणि माहेरचे आपल्याला नातू झाला म्हणून जास्तच खूश होते. अंबिकाचं आयुष्य सुखानं काठोकाठ भरून गेलं होतं. नऊ महिन्यांचा असताना श्रीहरी पलंगावरून खाली पडला आणि त्याला उलटी झाली. फिट्स आल्यानं त्यानं आपले इवलेसे हात-पाय वळवले. अंबिका घाबरली. श्रीहरीला ताबडतोब डॉक्टरकडे नेण्यात आलं. सगळ्या तपासण्या पार पडल्या. तपासण्यांचे निष्कर्ष नॉर्मल असल्याचं कळताच अंबिकानं समाधानाचा सुस्कारा सोडला; मात्र हे समाधान क्षणिकअसणार आहे याची अंबिकाला कल्पनाच नव्हती. यानंतर अंबिकाला स्वतःलाच जाणवायला लागलं, की आपलं मूल इतर मुलांच्या गतीनं वाढत नाहीये. त्याची प्रगती थोडी हळू होते आहे. अशा वेळी सगळ्यांनीच तिला समजावलं. काही मुलं उशिरा बोलतात, उशिरा चालतात असं सांगून तिची समजूत घातली गेली. अंबिकाला मात्र कुठे तरी काही तरी खटकत होतं. तिनं आणखी दोन-तीन डॉक्टरांना श्रीहरीला दाखवलं. ‘श्रीहरीमध्ये ऑटिझमची लक्षणं दिसताहेत’ असं एका डॉक्टरांनी अंबिकाला सांगितलं. अंबिका आणि तिच्या पतीला ऑटिझमविषयी काहीच माहिती नव्हती. मुळात हा शब्दच त्यांनी पहिल्यांदा ऐकला होता. त्यावर उपचार कोणते, कोणत्या थेरपीज याची काहीही माहिती नव्हती. सगळाच अंधार होता आणि या अंधारातून चाचपडत पुढे जायचं होतं. मुंबईत कुलाब्याला नौदलाचं हॉस्पिटल होतं. तिथं अंबिका श्रीहरीला घेऊन जायची. त्यानंतर सायन हॉस्पिटलला फिजिओथेरपीसाठी न्यायची. १५ मिनिटांच्या थेरपीसाठी तिचे प्रवासात जायचे आणि यायचे तीन-तीन म्हणजे सहा तास जायचे. त्यातच ओळखीचे, नातेवाईक, आसपासचे लोक सहानुभूतीनं बघायचे. त्या वेळी त्या नजरा अंबिकाला नको वाटायच्या. कधी देवाला दोष द्यावा वाटायचा, तर कधी आपलं दैवच वाईट असं म्हणून स्वतःला दूषणं दिली जायची. मग घरातल्यांनी, बाहेरच्यांनी आपापल्या परीनं अनेक उपाय सुचवायला सुरुवात केली. अंबिका आणि तिच्या पतीनं सगळे उपाय करून बघितले. मनात एकच आशा होती, की कुठल्या तरी उपायाला गुण येईल आणि आपला मुलगा चांगला होईल. 

दरम्यान श्रीहरी मोठा होत होता. दोन वर्षांचा झालेला श्रीहरी चालायला लागला होता; मात्र त्याच्या हायपर अॅक्टिव्हिटी वाढल्या होत्या. त्याला सांभाळणं म्हणजे तारेवरची कसरत असायची. अशा सगळ्या अवस्थेत अंबिकाच्या मनात मात्र नैराश्यानं प्रवेश केला. आपल्याच बाबतीत हे का घडावं, या विचारानं तिच्या डोळ्यांतलं पाणी थांबेना. एके दिवशी तिनं वर्तमानपत्रात एक बातमी वाचली. आपल्या दोन ऑटिस्टिक मुलांसह एका स्त्रीनं आत्महत्या केली होती. ‘संपवून टाकावं आयुष्य’ असे विचार अंबिकाच्या मनात वारंवार येऊ लागले. सगळ्या जगापासून लपून राहावंसं वाटण्याचा तो काळ होता. 

अशाच एका दिवशी अंबिकाच्या हातात ‘मुसाफिर’ नावाचं एक पुस्तक पडलं. अच्युत गोडबोले या आयटी तज्ज्ञ व्यक्तीच्या आयुष्याची ती गोष्ट होती. त्यांच्या निहार नावाच्या मुलाला ऑटिझम झाला, त्याविषयी त्या पुस्तकात सविस्तरपणे लिहिलेलं होतं. अंबिका ‘मुसाफिर’ वाचताना स्वतःला विसरून गेली. त्यातल्या एका वाक्यानं तिच्या मनावर खूप मोठा परिणाम केला. त्या पुस्तकात अच्युत गोडबोले यांनी म्हटलं होतं, ‘उद्या माझी ओळख काय होणार? अरेरे, बिच्चाऱ्या निहारचे वडील अशी की या माणसानं आपल्या आयुष्यात अमुक अमुक गोष्टी प्रयत्नपूर्वक साध्य केल्या, त्यांचा हा मुलगा निहार!!’ अंबिकालाही ‘अरेरे बिच्चाऱ्या श्रीहरीची आई’ अशी सहानुभूती दाखवणारी ओळख नको होती. तिनं आपली निराशा त्या क्षणी झटकली. हा क्षण तिच्या आयुष्याला फार मोठी कलाटणी देणारा ठरला. 

अंबिकानं आपली भल्या मोठ्या पगाराची नोकरी सोडली. आता तिला श्रीहरीवर लक्ष केंद्रित करायचं होतं. ती श्रीहरीला घेऊन संकल्प नावाच्या स्पेशल स्कूलमध्ये जाऊ लागली. तिथल्या प्राचार्यांनी तिला खूप चांगल्या तऱ्हेनं समजावलं. याच दरम्यान अंबिकानं ‘स्पेशल एज्युकेशन’मध्ये बीएड केलं. गतिमंद आणि स्वमग्न मुलांसाठीचे अनेक कोर्सेस तिनं केले. वेगवेगळ्या थेरपीज कोणत्या, त्या कशा आणि कधी वापरायच्या, हे ती शिकली. या सगळ्या काळात ‘मूल फक्त आईचंच असतं’ हे खोडून काढायला हवं, या विचारानं तिनं आपल्या घरातल्यांशी चर्चा केली आणि त्यांचं मन तयार केलं. मग काय, तिच्या शिकण्याच्या काळात कधी तिच्या सासूबाई, तर कधी आई, कधी पती, तर कधी वडील, असे सगळे श्रीहरीची जबाबदारी घेऊन त्याला सांभाळू लागले. अंबिका कधी बेंगळुरू, कधी दिल्ली, तर कधी हैदराबादला जाऊन वेगवेगळ्या गोष्टी शिकत राहिली. या सगळ्या काळात अंबिकाला ‘ऑटिझम’ म्हणजे काय याविषयी नीटपणे समजावून घेता आलं. ‘ऑटोस’ या ग्रीक शब्दापासून निर्माण झालेल्या या शब्दाचा अर्थ ‘स्वतः’ असा होतो. ‘ऑटिझम’ म्हणजे आत्ममग्न किंवा स्वतःमध्येच गुंतून असणं. नॉर्मल मूल आणि ऑटिस्टिक मूल यांच्यात सुरुवातीच्या काळात विशेष फरक जाणवत नाही. १९०८ साली युजिन ब्ल्यूलर यानं ‘ऑटिझम’ हा शब्द स्वतःत गुंग असणाऱ्या एका स्किझोफ्रेनिक माणसासाठी वापरला. प्रा. कॅनर या अमेरिकन संशोधकानं १९४३ साली हाच शब्द वेगळ्या तऱ्हेच्या मनोविकारासाठी वापरला. इतकंच नाही, तर त्यानं प्रथमच ‘ऑटिझम’चा खोलवर अभ्यास करून वर्गीकरणही केलं. यानंतर जगभर झालेल्या ऑटिझमच्या संशोधनात, ऑटिझम हा एक तर जन्मापासून असू शकतो किंवा सर्वसाधारणपणे मूल अडीच वर्षांचं झाल्यावर निर्माण होऊ शकतो, असं लक्षात आलं. साधारणतः ऑटिस्टिक मुलांचं प्रमाण मुलींपेक्षा चौपट असतं. तसंच हे प्रमाण आज १५० सर्वसामान्य मुलांमागे एक असं आहे आणि दिवसेंदिवस ते वाढत आहे.

ऑटिस्टिक मुलं एककल्ली असतात. ती इतर मुलांमध्ये मिसळत नाहीत. बहिरं असल्यासारखी वागतात. चटकन आणि जास्त शिकू शकत नाहीत. त्यांची भाषा खुंटलेली असते. एखादी वस्तू पाहिजे असल्यास आपल्या हाताने ओढत त्या वस्तूकडे नेतात. एखादा प्रश्न विचारला, तर उत्तराऐवजी तोच प्रश्न पुन्हा विचारतात (इकोलॅलिया). तू आणि मी यातला फरक त्यांना कळत नाही. ती नजरेला नजर देण्याचं टाळतात. फिरणाऱ्या वस्तूंबरोबर, पाण्याबरोबर अगर कुठल्याही निर्जीव वस्तूंबरोबर ही मुलं तासन् तास निरर्थकपणे खेळू शकतात आणि त्या वस्तू गोलगोल फिरवत बसतात. ही मुलं स्वाभाविकपणे आई-वडिलांना बिलगत नाहीत. त्यांना इतरांच्या भावना समजत नाहीत. खरं तर त्यांना बाहेरच्या जगाची कल्पनाच नसते. 

या मुलांना तोचतोचपणा आवडतो. त्यामुळे त्यांचा दैनंदिन कार्यक्रम थोडा जरी बदलला, तरी त्यांना राग येतो. काही मुलं यातून हिंसकही होतात. ऑटिस्टिक मुलांमध्ये काही वेळा मतिमंदत्व, हायपर अॅक्टिव्हिटी (सतत इकडून तिकडे धावणं), अटेंशन डेफिसिट डिसऑर्डर (एकाग्रतेचा अभाव) ही लक्षणं दिसून येतात. प्रत्येकात याचं प्रमाण कमी-जास्त असतं. या सर्व गोष्टींना ‘पर्व्हेजिव्ह डेव्हलपमेंट डिसऑर्डर’ असं म्हणतात. यातली काही मुलं विशिष्ट गोष्टी सफाईनं करू शकतात. उदाहरणार्थ, काही ठरावीक तऱ्हेची कोडी काही जणांना सोडवता येतात, काहींना शेकडो गाणी पाठ असू शकतात; पण या कौशल्यांचा मुलांच्या सर्वांगीण विकासाशी आणि वाढीशी संबंध नसतो. 

नॉर्मल आणि ऑटिस्टिक मुलं यांच्यातली सीमारेषा सुरुवातीला धूसर असते. त्यामुळे मूल सामान्यपणे, सहजपणे वाढत नाहीये हे पालकांच्या लक्षात येणं कठीण असतं. ऑटिस्टिक मुलं बाह्यदर्शनी नॉर्मल दिसतात; पण त्यांचे हावभाव, हात उडवणं, विचित्र हसणं असं सुरू झालं, की हे प्रकरण वेगळं आहे असा अंदाज इतरांना येऊ लागतो. कित्येक लोक त्यांना मतिमंद किंवा वेडा समजायला लागतात. मुलाला नीट वाढवता येत नाही, असा शेरा पालकांवर मारतात. यातून पालकांना अपराधी वाटायला लागतं. खरं तर मेंदूत होणाऱ्या बिघाडामध्ये ‘ऑटिझम’चं मूळ आहे, हे आता सिद्ध झालंय. 

ऑटिस्टिक मुलांना सातत्यानं कोणाचा ना कोणाचा आधार लागतो. अशी मुलं म्हणजे कुटुंबापुढे मोठा प्रश्न असतो. ऑटिझम पूर्णपणे बरा होण्यासाठी आज एकही औषध नाही. काही औषधांनी अशा मुलांमधली आक्रमकता कमी होऊ शकते. त्यातून त्यांची लक्षणं थोडी-फार नियंत्रित करता येतात. या मुलांवर औषधाबरोबरच अनेक थेरपीज वापरल्या, तर जास्त फायदा होतो. बिहेवियर मॉडिफिकेशन, ऑडिटरी इंटिग्रेशन ट्रेनिंग (एआयटी) थेरपी, डिसीट ट्रायल ट्रेनिंग थेरपी, व्हिटॅमिन थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी (ओटी), फिजिकल थेरपी, सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी, अँटियीस्ट थेरपी, म्युझिक थेरपी, डोमन-डेलक्टो थेरपी, ऑस्टेओपॅथी/कॅनिओसॅक्रल थेरपी, होल्डिंग थेरपी अशा अनेक थेरपीज ऑटिस्टिक मुलांवर उपचारांचं काम करतात. 

१९६० साली इव्हार लोवास या कॅफिफोर्निया विद्यापीठातल्या मानसशास्त्रज्ञानं विकसित केलेली अप्लाइड बिहेविअर अॅनालिसिस (एबीए) ही पद्धत अनेक पालकांना आणि डॉक्टरांना मान्य झाली आहे. आपल्याला हवा तसा प्रतिसाद मिळवण्यासाठी आपलं वागणं शिस्तबद्ध पद्धतीनं बदलणं, या कल्पनेवर ही एबीए थेरपी आधारित आहे. पुढच्या काही दशकांत स्टेम सेल थेरपीमुळे ऑटिझमवर बऱ्याच प्रमाणात मात करता येईल, असं काही संशोधकांना वाटतंय. अर्थात ते अजून निश्चितपणे सिद्ध झालेलं नाहीये. 

‘ऑटिझम’ या विकाराबद्दलची स्पष्टता आल्यानं अंबिका आणि तिच्या पतीनं वास्तव स्वीकारलं. त्यानंतर अंबिकानं ‘संकल्प’मध्ये जवळजवळ पाच वर्षं कामही केलं. त्यानंतर नवऱ्याच्या फिरतीच्या नोकरीमुळे तिला विशाखापट्टणमला जावं लागलं. तिथंही तिनं दोन वर्षं काम केलं. त्यानंतर मात्र तिच्या नवऱ्यानं स्वेच्छानिवृत्ती घ्यायचं ठरवलं. सतत होणाऱ्या बदल्यांचा श्रीहरीला खूप त्रास व्हायचा. कारण ऑटिस्टिक मुलांना बदल आवडत नाहीत; मात्र निवृत्तीनंतर राहायचं कुठे हा प्रश्नही समोर उभा होता. याच दरम्यान अंबिकानं दुसऱ्या मुलाला जन्म दिला होता. 

नौदलातल्या सुरक्षित नोकरीतून बाहेर पडल्यावर टाकळकर दाम्पत्याला बाहेरचं जग किती असुरक्षित आहे, याची जाणीव झाली. नौदलाच्या नोकरीत असताना घरापासून ते इतर अनेक मिळणाऱ्या सुविधा आता मिळणार नव्हत्या. मुंबईत राहायचं तर सगळं काही महागडं होतं. भाड्यानं घर घ्यायचं तर श्रीहरीकडे बघितल्यावर लोक नकार द्यायचे. एकदा तर नऊ महिन्यांच्या वास्तव्यात टाकळकर कुटुंबाला तीनदा घर बदलावं लागलं. सर्वसाधारण मुलानं गोंधळ केला, तर शेजाऱ्यांना चालायचं; पण श्रीहरीचा थोडा मोठा आवाज कानावर पडला तरी ‘आम्हाला त्रास होतो’ अशी तक्रार ते अंबिकाजवळ करायचे. श्रीहरीला घेऊन कुठे जायचं ठरवलं, तरी मुंबईच्या गर्दीत ते खूपच कठीण व्हायचं. मुंबईत राहायचं नाही हे निश्चित केल्यावर अंबिका आणि तिच्या नवऱ्यानं औरंगाबादला राहायचं ठरवलं. औरंगाबादला त्यांनी एक फ्लॅटही घेतलेला होता. आपल्या हक्काच्या घरात राहायला गेल्यावर कोणी बोलणार नाही हे एक समाधान असणार होतं. औरंगाबादला गेल्यावर तिथं गतिमंदांसाठी काही काम चालतं का, याची चाचपणी अंबिकानं केली. एका स्पेशल शाळेची माहिती कळताच अंबिका श्रीहरीला घेऊन तिथं जाऊ लागली. तिथे तिनं नोकरी सुरू केली. तिथे अनेक गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचं तिच्या लक्षात आलं. तिनं तसं संस्थाचालकांना सांगताच त्यांनी तिचं म्हणणं धुडकावून लावलं. काय करावं ते कळत नव्हतं. अशा वेळी अंबिका आपल्या मैत्रिणींबरोबर बोलत असताना त्यांनी ‘तूच काहीतरी का करत नाहीस’ असं विचारलं. याचं कारण यातल्या काही मैत्रिणींची मुलं ऑटिस्टिक होती. त्या मुलांना टॉयलेट ट्रेनिंगपासून अनेक गोष्टी कशा करायच्या, हे अंबिकानं सांगून करवून घेतलं होतं. आपल्या मुलांमधला चांगला बदल मैत्रिणींना दिसत होता. मैत्रिणींच्या बोलण्यातून अंबिकाला आणखी एक वाट मिळाली आणि यातूनच २०११ साली औरंगाबादमध्ये ‘आरंभ’ या संस्थेची सुरुवात झाली. 

सुरुवातीच्या काळात दोन खोल्यांमधून सुरू झालेल्या प्रवासात मैत्रिणींचीच चार मुलं ‘आरंभ’मध्ये दाखल झाली. इथे अंबिकाच संस्थापक, संचालक, स्पेशल एज्युकेटर सगळं काही होती. एका वर्षात मुलांची संख्या वाढून १८ झाली. दोन खोल्यांची जागा अपुरी पडायला लागली आणि मग अंबिकानं २०१३मध्ये आठ खोल्यांचा एक बंगला भाड्यानं घेतला. आज या ठिकाणी ४५ ऑटिस्टिक मुलं शिकत आहेत. १२ जणांचा स्टाफ अंबिकानं प्रशिक्षण देऊन तयार केलाय. मुलांना ट्रेनिंग, तसंच फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, डान्स थेरपी, ड्रामा थेरपी, म्युझिक थेरपी अशा अनेक थेरपीजबरोबरच आर्ट आणि क्राफ्ट शिकण्याचं कौशल्य द्यायला अंबिकानं सुरुवात केली. 

या सगळ्या काळात, आपलं मूल ऑटिस्टिक असेल तर त्याच्याबरोबर आई-वडिलांचं जगणंही एका कोषात बंदिस्त होतं, ही गोष्ट टाकळकर कुटुंबाच्या लक्षात आली होती. अंबिका आणि तिच्या नवऱ्यालाही नाटक, संगीत, चित्रपट, साहित्य अशा अनेक गोष्टींची आवड होती. त्यांना माणसांत मिसळणं आवडायचं. एकदा अंबिका आणि तिचे पती श्रीहरीला घेऊन एक चित्रपट बघायला गेले. पाचच मिनिटांत श्रीहरी चित्रपटगृहाच्या बाहेर आला. अशा परिस्थितीत आपलं समाजापासून तुटणं आपल्याला आवडणार आहे का, याचं उत्तर अर्थातच ‘नाही’ असं होतं. मग आता करायचं काय? कारण ऑटिस्टिक मुलं गर्दीला टाळतात. सोशल होणं, इतरांमध्ये मिसळणं त्यांना आवडत नाही. अशा वेळी ‘अशक्य’ या शब्दाला तिलांजली देऊन अंबिकानं आपल्या स्टाफच्या मदतीनं या सगळ्या मुलांना हळूहळू सार्वजनिक ठिकाणी न्यायला सुरुवात केली. बदल करताना त्यांना पूर्वसूचना देऊन त्यांची मानसिक तयारी करण्यात आली. यातूनच ही मुलं आज कार्यक्रमाच्या ठिकाणीही चुळबुळ न करता बसतात, चित्रपट बघतात, मॉलमध्ये एंजॉय करतात. आज श्रीहरीसह ‘आरंभ’मधली मुलं घरातल्या कामांमध्येही हातभार लावायला शिकली आहेत. भाज्या कापणं, लसूण सोलणं अशी कामं ती आनंदानं करतात. इतकंच नाही, तर या मुलांनी अनेक उपयुक्त वस्तूही बनवायला सुरुवात केली आहे. रोज १० ते साडेचार या वेळात ही मुलं आपलं ट्रेनिंग, थेरपीज याबरोबरच रंगकाम, फोटोग्राफी, गाणं, तबला अशा अनेक गोष्टी शिकतात. त्यांनी तयार केलेले दिवे, पेनस्टँड अशा अनेक वस्तूंची प्रदर्शनं भरवली जातात. इतकंच नाही, तर आता जर्मनीतही या वस्तूंना मागणी आली आहे. ही मुलं हाउसकीपिंगचं काम करण्यातही एक्स्पर्ट झाली आहेत. तसंच भाज्या निवडणं, कापून ठेवणं आणि झिप असलेल्या बॅगेत घालणं, ही काम ही मुलं करत असल्यानं अनेक बँकांतल्या कर्मचाऱ्यांना अशा भाज्या घेणं आवडायला लागलं आहे. इतकंच काय, पण ऑटिस्टिक मुलांना वस्तू जागच्या जागी हव्या असतात, त्यातले बदलही त्यांना आवडत नाहीत. त्यांच्या याच गोष्टीचा फायदा घेऊन मॉलमध्ये त्या त्या ठिकाणच्या वस्तू जिथल्या तिथे ठेवणं ही कामं करण्यातही ही मुलं तरबेज झाली आहेत. अंबिकानं अशा मुलांसाठी योग्य असे १५ जॉब (कामं) शोधून काढले आहेत.

अंबिका आणि तिचे सहकारी या मुलांच्या विविध कलागुणांच्या सादरीकरणाच्या कार्यक्रमाचं आयोजन करतात. मुलांच्या सहली काढल्या जातात. जेवढं शक्य आहे तेवढं या मुलांना स्वावलंबी बनवण्यात त्यांना यश मिळालं आहे. आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी व्याख्यानं आणि कार्यशाळा घेऊन अंबिका लोकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न करते आहे. वेगवेगळ्या वर्तमानपत्रांत आणि नियतकालिकांमध्ये ती सातत्यानं लिखाण करत असते. ‘स्वमग्नतेच्या जगात’ आणि ‘वयात येताना’ ही तिची दोन पुस्तकं प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. अंबिकाच्या कार्याची दखल घेऊन तिला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. आपल्याला मिळणाऱ्या पुरस्कारांचा आनंद तिला आहे; मात्र त्यामुळे तिच्या रोजच्या आयुष्यात कुठलाही बदल झालेलानाही. अंबिकाच्या कामात तिचे पती बाळासाहेब टाकळकर तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि अंबिका एखाद्या समईतल्या शांत ज्योतीसारखी आपली वाटचाल करते आहे. तिच्यातल्या चिकाटीनं, तिच्यातल्या जिद्दीनं आणि तिच्यातल्या संवेदनशीलतेनं तिनं केवळ आपल्याच कुटुंबाला या गर्तेतून बाहेर काढलं नाही, तर अनेक कुटुंबाची ती आशास्रोत बनली आहे. म्हणूनच या चटके देणाऱ्या उन्हात तिचं असणं एका थंडगार सावलीसारखं वाटतं आहे. 

संपर्क : अंबिका टाकळकर 
ई-मेल : ambikanidhu@gmail.com
मोबाइल : ८२७५२ ८४१७८

- दीपा देशमुख
मोबाइल : ९५४५५ ५५५४०
ई-मेल : deepadeshmukh7@gmail.com

(दीपा देशमुख या प्रसिद्ध लेखिका असून, त्या वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. दर १५ दिवसांनी, गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या त्यांच्या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/M3NCtW या लिंकवर उपलब्ध आहेत.)

(‘आरंभ’ संस्थेबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. स्वमग्न मुलांसाठी पुण्यात कार्यरत असलेल्या ‘प्रसन्न ऑटिझम सेंटर’बद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
सागर ओतारी About 281 Days ago
खूपच सुंदर, त्यांच्याबद्दल काय लिहायचे. लिहील तेवढे कमीच . ताईंचा वाटचाल पूर्ण वाचली. त्या म्हणजे जशा काही लक्ष सूर्य एवढी ऊर्जा त्यांच्यात सामावले. सदैव हसत मुख. आणि आरंभ म्हणजे दिव्यांगांसाठी आभाळमायच. तुमची प्रेरणा सर्वानी घेऊ देत हीच प्रार्थना. आपल्या कार्यास लक्ष लक्ष शुभेच्छा.
0
0
Bhausaheb Shelke About 281 Days ago
खूप छान लेख आहे अंबिका ताईने स्वतः बरोबर आमच्यासारख्या पालकांच्या त्या आधारवड बनल्या आहे
0
0

Select Language
Share Link
 
Search