Next
टेनिसमधील उगवता तारा : शरण्या गवारे
BOI
Friday, August 24, 2018 | 06:45 AM
15 1 0
Share this article:

शरण्या गवारेपुण्यात आजवर अनेक उत्तम दर्जाचे टेनिसपटू घडले आहेत. नव्याने या खेळात येणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. शरण्या गवारे ही अशीच एक नवोदित खेळाडू या क्षेत्रात आपले पाय रोवू पाहत आहे. प्रचंड गुणवत्ता लाभलेली शरण्या ज्युनिअर गटात आपले सातत्य राखून आहे... ‘क्रीडारत्ने’ सदरात या वेळी पाहू या टेनिसपटू ‘शरण्या गवारे’बद्दल...
............
शरण्या गवारेने १८ वर्षांखालील गटाच्या नॅशनल क्ले कोर्ट चॅम्पियनशिप टेनिस स्पर्धेत दुहेरी मुकुट पटकावला. चेन्नईमध्ये ही स्पर्धा झाली. एकेरीच्या अंतिम लढतीत शरण्याने तेलंगणच्या हुमेरा शेखला ६-४, ७-५ असा पराभवाचा धक्का दिला आणि जेतेपद पटकावले. जवळजवळ पावणेदोन तास ही लढत चालली. हुमेराला दुसरे मानांकन होते.  

शरण्याची सुरुवात जोरदार झाली. पहिल्याच गेममध्ये शरण्याने हुमेराची सर्व्हिस ब्रेक केली. पाहता पाहता सहाव्या गेमअखेर शरण्याने ४-२ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर हुमेराने चिवट झुंज देऊन ४-४ अशी बरोबरी साधली. नवव्या गेममध्ये शरण्याने पुन्हा हुमेराची सर्व्हिस ब्रेक केली आणि त्यापाठोपाठ पहिल्या सेटमध्ये बाजी मारली. दुसऱ्या सेटमध्येही शरण्याने जोरदार सुरुवात केली. सहाव्या गेमअखेर शरण्याने ४-२ अशी आघाडी घेतली होती; मात्र पुन्हा एकदा हुमेराने झुंज दिली. दहाव्या गेमअखेर दोघींमध्ये ५-५ अशी बरोबरी होती. अकराव्या गेममध्ये शरण्याने हुमेराची सर्व्हिस ब्रेक कली आणि त्यापाठोपाठ सर्व्हिस राखून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.  

शरण्याचे हे पहिलेच राष्ट्रीय जेतेपद ठरले. नुकत्याच हैदराबादमध्ये झालेल्या सुपर सीरिज स्पर्धेतही शरण्याने दुहेरी मुकुट पटकावला होता. त्यापाठोपाठ राष्ट्रीय स्पर्धेतही शरण्याने घवघवीत यश मिळविले. या यशाबाबत शरण्या म्हणाली, ‘दोन वर्षांपूर्वी चौदा वर्षांखालील गटात माझे जेतेपद हुकले होते. मला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. या वेळी मी जिद्दीने खेळ केला आणि जेतेपदाला गवसणी घातली. हे यश नक्कीच आनंददायी आणि आत्मविश्वास उंचावणारे आहे. नुकतीच स्पर्धा खेळून आल्याने थोडी दमछाक झाली होती.  त्यातच पाऊस असल्याने, उपान्त्य फेरीपर्यंतचे सामने हार्ड कोर्टवर खेळविण्यात आले आणि उपान्त्य आणि अंतिम फेरीचे सामने क्ले कोर्टवर खेळविण्यात आले. त्यामुळे लय सापडण्यास वेळ लागला; मात्र मी आत्मविश्वासाने खेळ केला. एका वेळी केवळ एका सामन्याचाच विचार केला, त्याचा मला फायदा झाला,’ अशा शब्दांत शरण्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. सिम्बायोसिस महाविद्यालयामध्ये अकरावीत शिकणारी शरण्या ही पुण्याचे प्रसिद्ध खेळाडू आणि प्रशिक्षक आदित्य मडकेकर आणि के. सी. अफजल यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.

दुहेरीत प्रेरणाच्या साथीने यश
मुलींच्या दुहेरीच्या अंतिम लढतीत शरण्या गवारेने मुंबईच्या प्रेरणा विचारेच्या साथीने विजेतेपद पटकावले. शरण्या-प्रेरणा यांनी विपाशा मेहरा-सुदीप्ता कुमार या जोडीवर ६-३, ६-१ अशी सरळ सेटमध्ये मात केली आणि विजेतेपद पटकावले. मुलांच्या दुहेरीत कबीर हंस-दीपेंदर गरेवाल यांनी विजेतेपद पटकावले. त्यांनी अंतिम लढतीत गुंजन जाधव - दीपीन वाधवा यांच्यावर ३-६, ७-६ (६), १०-८ अशी मात केली.  

शरण्या गवारेचे सातत्य पाहता केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने तिला टीओपी (टार्गेट ऑलिंपिक पोडियम) या योजनेत सहभागी करून घेतले पाहिजे. तसेच भारतीय टेनिस महासंघानेदेखील आंतरराष्ट्रीय स्तरावर जास्तीत जास्त सामने खेळण्यासाठी शरण्याला आर्थिक पाठबळ आणि आवश्यक त्या सुविधा पुरवल्या पाहिजेत. हे सर्व जुळून आले तर भारताला लवकरच आणखी एक सानिया मिर्झा पाहायला मिळेल.  

- अमित डोंगरे
ई-मेल : amitdongre10@gmail.com

(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. 'क्रीडारत्ने' सदरातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search