Next
‘शैक्षणिक संस्था आणि उद्योग जगताचे संबंध दृढ व्हावेत’
भारती विद्यापीठात आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेतील सूर
प्रेस रिलीज
Monday, May 20, 2019 | 01:18 PM
15 0 0
Share this article:

पुणे : भारती अभिमत विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे ‘एम्पॉवरिंग ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स’ विषयावरील राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या कार्यशाळेला चांगला प्रतिसाद मिळाला. ‘अभियांत्रिकी शैक्षणिक क्षेत्राने कल्पक मनुष्यबळ तयार करावे, त्यासाठी शैक्षणिक संस्था आणि उद्योग जगताचे संबंध दृढ व्हावेत,’ असा सूर कार्यशाळेत उमटला.
 
‘निटॉर इन्फोटेक’च्या सहाय्यक उपाध्यक्ष रोहिणी वाघ यांच्या हस्ते कार्यशाळेचे उदघाटन झाले. भारती विद्यापीठाच्या धनकवडी कॅम्पसमध्ये ही कार्यशाळा झाली. या वेळी फोकस इंटिग्रेटेड टॅलेंटचे जितेंद्र संधू, सिम्पलीसिटी कम्युनिकेशन्सचे अजिताभ दत्त, डिझाइन थिंकिंग कन्सल्टंट प्रभुलिंग झुंझा हे कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भारती अभिमत विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद भालेराव यांनी अध्यक्षस्थान भूषविले. कार्यशाळेला राज्यातील ५५ महाविद्यालयांचे ट्रेनिंग, प्लेसमेंट ऑफिसर्स आणि उद्योग क्षेत्रातून मनुष्य बळ विभागाचे वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते. 

उद्घाटनप्रसंगी बोलताना रोहिणी वाघ म्हणाल्या, ‘प्रशिक्षणाचा भाग व्यवस्थित हाताळला, तर प्लेसमेंट आपोआप होत राहते. उद्योग क्षेत्र आणि शिक्षण क्षेत्र हे सुरुवातीपासून एकमेकांशी संबंधित आहेत. हे संबंध अधिक दृढ होण्याची गरज आहे. त्यामुळे पदवीधर उमेदवारांची गुणवत्ता अधिक वाढण्यास मदत होईल. ट्रेनिंग प्लेसमेंट  ऑफिसर्सनी कार्पोरेट जगतातील वेगवान बदल आत्मसात करावेत आणि शाश्वत रोजगार उपलब्धतेकडे लक्ष केंद्रित करावे. प्रश्न, समस्या सोडवणारे प्रशिक्षित आणि कल्पक मन्युष्यबळ कार्पोरेट हे जगताला उपलब्ध करून देणे, हे देशाच्या प्रगतीलाही उपयुक्त ठरणारे आहे.’ 

जितेंद्र संधू म्हणाले, ‘तीन हजार अभियांत्रिकी महाविद्यालयातून निर्माण होणाऱ्या पदवीधरांपैकी ५१ टक्के पदवीधर काम मिळविण्यास पात्र ठरतात. त्यामुळे रोजगारक्षम गुणवत्ता निर्माण करणे हे आव्हान आहे. इंटर्नशिपमधून विद्यार्थ्यांना कामाचा नेमका आवाका येऊ शकतो.’

अजिताभ दत्त म्हणाले, ‘ट्रेनिंग आणि प्लेसमेंटमध्ये डिजिटल मार्केटिंगची मदत होऊ शकते. उद्योग जगत, शैक्षणिक संस्था, विद्यार्थी आणि ग्राहक या सर्वांना चांगल्या शब्दांमधून संदेश पोहोचवायचा असतो. त्यासाठी आपले डिजिटल धोरण तयार असले पाहिजे.’ 

प्राचार्य डॉ. भालेराव म्हणाले, ‘अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्यासाठी उद्योग क्षेत्र आणि शैक्षणिक क्षेत्राने एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत. भविष्यातील अडचणींचे निवारण करणारे हुशार आणि तज्ज्ञ इंजिनीअर्स घडवणे हे आव्हान आहे. त्यासाठी शैक्षणिक संस्थांनी प्रगतीला पूरक वातावरण तयार केले पाहिजे.’  

प्रा. नचिकेत कुलकर्णी यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search