Next
‘शिव-उन्नती’चा पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा गणेशोत्सव
प्रेस रिलीज
Saturday, September 22, 2018 | 11:46 AM
15 0 0
Share this story

पुणे : राष्ट्रीय एकात्मतेची भावना जागृत करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा सामाजिक प्रबोधन हा वसा जपत काळेपडळ, हडपसर येथील शिव-उन्नती को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीतर्फे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी गणेशमूर्ती आणि स्वच्छ भारत अभियानात सहभागी झालेला मूषक असा देखावा साकारण्यात आला आहे. हा देखावा काळेपडळ परिसरत आकर्षणाचा विषय ठरत आहे.   

शिव-उन्नती हाउसिंग सोसायटीतर्फे प्रतिवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. पर्यावरणपूरक गणेशोत्सव हे या उत्सवाचे वैशिष्ट्य आहे. येथे बसविण्यात आलेली या वर्षीची गणेशमूर्तीही शाडू मातीपासून बनवण्यात आली असून, सोसायटीमधील रहिवासी असलेले नरेंद्र हेडो यांनी ही कलात्मक मूर्ती घडवली आहे.

श्रीगणेश आपल्या आवडीचे मोदक आणण्यासाठी हातात कापडी पिशवी घेऊन निघाले आहेत. प्लास्टिक बंदीचे समर्थन व कापडी पिशव्यांचा वापर करण्याबाबतचा संदेश बाप्पांच्या हातातील पिशवीवर ठळकपणे झळकतो आहे. बाप्पांच्या एका हातात हिरवे रोप, तर दुसर्‍या हातात असलेले बीज हे वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश देत आहे. बाप्पांच्या या पर्यावरण संवर्धनाच्या मोहिमेत त्यांचे आवडते वाहन असलेला मूषकराजही बाप्पांसोबत निघाला आहे. पर्यावरण सुंदर ठेवायचा असेल, तर परिसर स्वच्छ ठेवावा लागणारच. म्हणूनच हातात झाडू घेऊन हा मूषकराज स्वच्छ भारत अभियानात सहभागी झाला आहे, असे देखाव्याचे स्वरूप आहे.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी श्री गणेशाची पर्यावरणपूरक मूर्ती, सर्व सदस्यांचा सक्रिय सहभाग, रोज सायंकाळी सामुदायिक आरती, त्यानंतर लहान-थोरांसह सर्वांसाठी असलेली वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची पर्वणी आणि विविध उपक्रम या सर्व पार्श्वभूमीवर शिव-उन्नती हाउसिंग सोसायटीचा गणेशोत्सव आनंददायी व समाजासमोर आदर्श ठरत आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link