Next
लोकमान्य टिळकांनी कार्यकर्तृत्वातून कर्मयोग साधला
योगतज्ज्ञ श्रीकांत क्षीरसागर यांचे प्रतिपादन
BOI
Saturday, August 03, 2019 | 05:41 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : लोकमान्य टिळकांची जन्मभूमी असलेल्या रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात लोकमान्यांच्या ९९व्या पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘टिळकांचा कर्मयोग’ या विषयावर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे योगतज्ज्ञ आणि योगप्रशिक्षक श्रीकांत श्रीसागर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कला शाखेच्या द्वितीय वर्षाच्या पत्रकारिता विषयाच्या विद्यार्थ्यांनी ‘लोकमान्य टिळकांची पत्रकारिता’ या विषयावर लिहिलेल्या भित्तिपत्रकाच्या अनावरणाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली.

लोकमान्य टिळकांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून कर्मयोग कसा साधला, याचे अनेक दाखले देताना श्रीसागर यांनी लोकमान्यांचा लोकसंग्रह, सार्वजनिक उत्सवांची सुरुवात, त्यांनी आपल्या तुरुंगवासाच्या काळात लिहिलेले ‘गीतारहस्य’ या प्रमुख गोष्टींचा आढावा घेतला. ‘विद्यार्थ्यांनी आपल्या गुणकौशल्याच्या माध्यमातून समाजासाठी कार्यप्रवृत्त झाले पाहिजे,’ असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. मानसिक ताणतणावांपासून मुक्त राहण्यासाठी करावयाच्या काही योगासनांचे सादरीकरणही त्यांनी करून दाखविले. 

या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्वरदा महाबळ हिला कै. उन्मेष घाटे आदर्श विद्यार्थी पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तीर्था सोमण आणि अपूर्वा आचार्य यांना कै. प्रभाकर करमरकर गणित पारितोषिक, सोनल ढोल्ये हिला लोकमान्य टिळक पारितोषिक आणि श्रद्धा शितप व तन्वी बेर्डे यांना कै. गणेशशास्त्री घाटे पारितोषिक प्रदान करून सन्मानित करण्यात आले. 

महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत वरिष्ठ महाविद्यालय गटातील अनुक्रमे वर्षा योगेश काळे, हृषीकेश विवेक वैद्य, सिद्धी जनार्दन साळवी, सोनल गोपाल ढोल्ये यांना विजेतेपदाची पारितोषिके देण्यात आली. शाहीन जाकीर अमिनगड हिला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. 

कनिष्ठ महाविद्यालय गटात अनुक्रमे आकांक्षा दीपक जावडेकर, सायली नीलकंठ रानडे, स्नेहल संतोष तवटे, जान्हवी दिगंबर मुणगेकर यांना विजेतेपदाची पारितोषिके, तर वैशाली रवाळू चोपडे हिला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. 

निबंध स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालय गटात अनुक्रमे हर्षदा प्रवीण कुबल, सायली नीलकंठ रानडे, दीप्ती अंकुश वळंजू, जान्हवी जितेंद्र साळवी यांना विजेतेपदाची पारितोषिके, तर सानिका कमलेश कोल्हटकर हिला उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. 

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ‘लोकमान्य टिळकांचा कर्म-आदर्श विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक असून, विद्यार्थ्यांनी त्याचे अनुकरण करावे,’ असे प्रतिपादन त्यांनी केले. विविध स्पर्धांतील पारितोषिकविजेत्या सर्व विद्यार्थ्याचे त्यांनी कौतुक केले.

या कार्यक्रमाला उपप्राचार्य विवेक भिडे, संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन कार्यक्रम समिती समन्वयक डॉ. निधी पटवर्धन यांनी केले. सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. तेजश्री भावे यांनी केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search