Next
ऑस्ट्रेलियातील नवी कसोटी!
BOI
Monday, July 09, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this story

क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा हा सर्वांत कठीण मानण्यात येतो आणि तेथील कसोटी सामने हा त्यातही अवघड मामला असतो. ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आता लवकरच इंग्रजीची एक चाचणी अनिवार्य केली जाणार आहे. ती चाचणी म्हणजे ऑस्ट्रेलियात जाऊ पाहणाऱ्यांसाठी अशीच एक कसोटी ठरणार आहे. त्याचे विश्लेषण करणारा हा लेख...
.........
ऑस्ट्रेलिया या देशाबद्दल बहुतेक भारतीयांना वेगळेच आकर्षण असते. क्रिकेटमध्ये दादागिरी गाजविणाऱ्या या देशाची शानच वेगळी. एक तर पॅसिफिक महासागराच्या एका टोकाला वसलेला हा खंड. त्यात एकीकडे प्रगत जीवनशैली आणि दुसरीकडे कांगारूंसारख्या प्राण्यांचे जैववैविध्य आणि विशाल मोकळे भूभाग. क्रिकेटसारख्या खेळांमध्ये निर्विवाद वर्चस्व (अलीकडे ते कमी झाले असले तरी) आणि परकीय नागरिकांना बऱ्यापैकी मुक्त प्रवेश. त्यातच गेल्या काही वर्षांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या बहुतेक विद्यापीठांनी भारतीय विद्यार्थ्यांसाठी पायघड्या घालायला सुरुवात केलेली. या सर्व गुणांमुळे ऑस्ट्रेलिया हा भारतीयांच्या आवडत्या देशांमधील एक झाला नसता तर नवलच. 

या सर्व वैशिष्ट्यांमधील एक होती इंग्रजी भाषा... भारतीय लोक आणि ऑस्ट्रेलियन लोकांना जोडणारा समान दुवा! तांत्रिकदृष्ट्या आपल्याकडे प्रचलित असलेली राणीची इंग्रजी आणि ऑस्ट्रेलियन इंग्रजी भाषा वेगळी असली, तरी दोन्हींमध्ये ९० टक्के साधर्म्य आहे. त्यामुळे भारतीयांना ऑस्ट्रेलिया फारसा परका वाटत नाही. (आपण वापरत असलेला फूटपाथ हा शब्द ऑस्ट्रेलियन इंग्रजीतील आहे. ब्रिटिश इंग्रजीत त्याला पेव्हमेंट हा शब्द आहे, तर अमेरिकन इंग्रजीत त्याला म्हणतात साइडवॉक); मात्र इंग्रजांनी जिथे जिथे सत्ता गाजविली, त्या सर्व प्रदेशांतील लोकांनाही ऑस्ट्रेलिया असाच आपला वाटू लागला आणि त्यांचे लोंढे ऑस्ट्रेलियात एकामागोमाग आदळू लागले. आता तर चीन आणि इंडोनेशिया यांसारख्या गैर-इंग्रजी भाषक देशांतील स्थलांतरितांनाही तो आपला हक्काचा आसरा वाटू लागला. त्यामुळे आपल्या सीमा बंदिस्त करण्याची गरज ऑस्ट्रेलियाला वाटू लागली आणि त्यासाठी पहिले साधन ठरले ते इंग्रजी भाषा!

शरणार्थ्यांच्या आणि आगंतुकांच्या वाढत्या संख्येमुळे पहिला धोका पोहोचला तो या भाषेला. कारण ‘इंग्रजी भाषेची पार्श्वभूमी नसलेल्या सुमारे आठ लाख २० हजार ऑस्ट्रेलियन प्रौढांना इंग्रजीची पुरेशी माहिती नाही,’ अशी माहिती एका सरकारी अहवालात देण्यात आली होती. वर्ष २०२१ येईपर्यंत ऑस्ट्रेलियात १० लाखांपेक्षा अधिक लोक असे असतील, ज्यांना इंग्रजी अर्धवट तरी येईल किंवा मुळीच येणार नाही, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. या चिंतेने घेरलेल्या ऑस्ट्रेलियन सरकारने आता नवीन पाऊल उचलले असून, नवीन येणाऱ्या सर्व स्थलांतरितांना प्राथमिक इंग्रजी भाषेची चाचणी अनिवार्य करण्यात येणार आहे. 

सरकारने गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात आपल्या नागरिकत्व कायद्यामध्ये मुळापासून बदल करण्याचा एक प्रस्ताव ठेवला होता. त्यात इंग्रजी भाषेची स्वतंत्र चाचणी ठेवण्याचा प्रस्ताव होता. तो मंजूर झाला असता, तर सध्याच्या आयईएलटीएस या भाषा चाचणीत किमान सहा बँड मिळविल्यानंतरच कोणालाही देशाच्या कायम नागरिकत्वासाठी अर्ज करता आला असता; मात्र त्या वेळी लेबर पार्टी, ग्रीन्स आणि काही अपक्ष संसद सदस्यांनी कडाडून विरोध केल्यामुळे तो प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही. त्यानंतर सरकारने काहीसे नमते घेऊन या चाचणीत किमान पाच बँड मिळविण्याची अट घातली.

...मात्र अलीकडेच ‘एसबीएस न्यूज’ या वाहिनीला ऑस्ट्रेलियाच्या नागरिकत्व आणि बहुसांस्कृतिकता खात्याचे मंत्री अॅलन टज यांनी एक विशेष मुलाखत दिली. ‘प्राथमिक शाळा पातळीवरची एक चाचणी आणायचा विचार सुरू असून, त्यात संवादात्मक परीक्षा असेल,’ असे त्या वेळी त्यांनी सांगितले. ‘लोकांकडे प्राथमिक शाळांतील पातळीएवढे तरी इंग्लिशमध्ये संभाषण करता येण्याइतपत कौशल्य असावे,’ असे टज यांनी सांगितले. टज यांच्या योजनेनुसार ही चाचणी या वर्षीपासूनच सुरू व्हायची आहे; मात्र या योजनेचे तपशील अजूनही ठरलेले नाहीत. त्यामुळे ते सध्या तरी शक्य वाटत नाही. परंतु ती येणार याची खूणगाठ सर्वांनी बांधली आहे. 

‘चांगल्या लोकांनी ऑस्ट्रेलियात यावे, असे आम्हाला वाटते. त्यांनी ऑस्ट्रेलियन मूल्यांचा अंगीकार करावा आणि समाजामध्ये चांगले मिसळून जावे,’ असे टज म्हणाले. अन् हे मूल्य स्वीकारणे याचा अर्थ इंग्रजी भाषा आत्मसात करणे. या चाचणीची चर्चा चालू असतानाच ‘इप्सोस’ या सर्वेक्षण कंपनीने अलीकडेच एक पाहणी केली होती. त्यात बहुतांश प्रतिसादकर्त्यांनी सांगितले होते, की इंग्रजी भाषेतील कौशल्य आणि रोजगार असणाऱ्या व्यक्तीलाच ‘खरा ऑस्ट्रेलियन’ म्हणून पाहिले जाते. सर्वेक्षण केलेल्या एक हजारहून अधिक लोकांपैकी ७२ टक्के लोकांच्या मते, परदेशी स्थलांतरितांनी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविले, की ते खरे ऑस्ट्रेलियन होतात. 

ब्रिटीश शासनाची वसाहत असलेल्या ऑस्ट्रेलियात स्थलांतरितांना रोखण्याचा इतिहास मोठा आहे आणि रंजकही आहे. देशात १९९०च्या दशकात रुढीवादी पक्षांचे सरकार आल्यानंतर आगंतुकांच्या येण्यावर कडक निर्बंध लादण्यात आले. त्या सरकारची धोरणे एवढी कडक होती, की २००१ साली आगंतुकांना रोखण्यासाठी शस्त्रसज्ज लढाऊ जहाजे समुद्रात पाठविण्यात आली होती. त्याच वर्षी मुख्यतः अफगाणिस्तानातून आलेल्या ४३९ लोकांना घेऊन येणारे जहाज किनाऱ्यावर रोखण्यात आले आणि त्या लोकांना ऑस्ट्रेलियात उतरण्यास मनाई करण्यात आली होती. त्या वेळी स्थलांतरितांना रोखण्यासाठी तेव्हाचे पंतप्रधान जॉन हॉवर्ड यांनी नवीन धोरणाची आखणी केली होती. ऑस्ट्रेलियाच्या उत्तर किनाऱ्यावर नौदलाची जहाजे तैनात करून कडक पाहणी करायची आणि शरणार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी पॅसिफिक महासागरातील छोट्या बेटांवर करायची, अशी ही नीती होती. तिला ‘पॅसिफिक सोल्युशन’ असे नाव देण्यात आले होते.

तरीही २००६-०७ सालापर्यंत मोठ्या प्रमाणात परकीय नागरिक वस्तीसाठी येत असत. याच वर्षी हॉवर्ड यांच्या नेतृत्वाखालील सरकारने वादग्रस्त अशी नागरिकत्वाची चाचणी सुरू केली. त्या चाचणीत ऑस्ट्रेलियाच्या संगीत आणि कलेबद्दल अत्यंत भडक प्रश्न विचारण्यात येत असत. ऑस्ट्रेलियात २००६ साली उच्चांकी म्हणजे एक लाख ५९ हजार १०९ लोकांनी नागरिकत्व घेतले. या वर्षीच्या (२०१७-१८) पहिल्या आठ महिन्यांत नागरिकत्व मिळविण्यासाठीच्या केवळ ५४ हजार ४१९ अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. 
 
... मात्र २००७ सालच्या निवडणुकांत उदारवादी पक्ष सत्तेवर आल्यानंतर धोरणांमध्ये बदल करण्यात आला. त्यानंतर सरकारच्या धोरणात शिथिलता आल्यामुळे देशात उपऱ्यांचे प्रमाण वाढत चालल्याबद्दल विरोधी पक्षांनी चिंता व्यक्त केली होती. ऑगस्ट २०१०मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या निवडणुकीत एक अजब चित्र पाहायला मिळाले. या निवडणुकांत एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी निवडून आल्यास आगंतुकांच्या प्रवेशावर निर्बंध आणण्याचा प्रचार केला. विशेष म्हणजे हे दोन्ही नेते परदेशांतून येऊन ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले होते. 

त्या वेळी पंतप्रधान असलेल्या ज्युलिया गिलार्ड या मूळच्या ब्रिटिश नागरिक आणि ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महिला पंतप्रधान. ‘ऑस्ट्रेलियात येण्यासाठी आपला जीव धोक्यात घालू नका आणि इथे आल्यानंतर ताबडतोब तुमच्या देशात पाठवून देण्यात येणार नाही, अशी अपेक्षाही करू नका,’ असा संदेशच गिलार्ड यांनी संभाव्य स्थलांतरितांना दिला होता. त्या निवडणुकीत गिलार्ड विजयी झाल्या. त्यांनी नंतर हॉवर्ड यांचीच री ओढली. विरोधी पक्षाचे नेते असलेल्या टोनी अॅबॉट यांनीही तेच वेगळ्या भाषेत सांगितले होते.  

तेव्हापासून सुरू असलेल्या नागरिकत्व आणि इंग्रजीच्या या साहचर्याला आता नवीन वळण मिळाले आहे. क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा हा सर्वांत कठीण मानण्यात येतो आणि तेथील कसोटी सामने हा त्यातही अवघड मामला असतो. आता ही नवी चाचणी म्हणजे ऑस्ट्रेलियात येऊ पाहणाऱ्यांसाठी अशीच एक कसोटी ठरणार आहे. भारतीयांच्या दृष्टीने ती सोपे ठरते का अवघड, हे काळच ठरवेल.

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक असून, भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘बाइट्स ऑफ इंडियावर दर सोमवारी प्रसिद्ध होणारे त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Anagha Pabalkar About 229 Days ago
Good information for those who Want to migrate and dont know reality of migrating abroad....those who think its easy to migrate and settle there....its a hard work.....rules and regulations are very different,difficult and strict...
0
0

Select Language
Share Link